computer

सोलापूरच्या रणजीत दिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालाय... त्यांचं कार्य बघून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल !!

समाजात शिक्षक/शिक्षिका हे महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. नवीन पिढी घडवणे, त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवून त्याचं भविष्य उज्वल करणे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे, पण शिक्षकांचा हवा तसा सन्मान होताना दिसत नाही अशी एक तक्रार ऐकू येत असते. आता मात्र चित्र बदलत आहे आणि शिक्षकांना जागतिक स्तरावर त्यांच्या कामासाठी गौरवण्यात येतंय.

असाच एक सन्मान आपल्या सोलापूरच्या शिक्षकांचा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील परिटेवाडी येथील शिक्षक रणजितसिंग दिसले यांना तब्बल ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिले शिक्षक आहेत. मुलींच्या शिक्षणात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान म्हणजे हा पुरस्कार.

ग्लोबल टीचर पुरस्काराची घोषणा लंडन येथे डिजिटल कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ब्रिटिश अभिनेता स्टीफन फ्राय याच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. वर्की फाउंडेशन कडून २०१४ सालापासून पासून हा पुरस्कार दिला जातो.  

या पुरस्काराचा उद्देश हा अशा शिक्षकांचा शोध घेणे आहे ज्यांनी आपल्या शिक्षकी पेशात भरीव असे योगदान दिले आहे अशा शिक्षकांचा गौरव करणे हा आहे. जगभरातून निवडलेल्या १० नावांमधून दिसले यांची निवड झाली आहे. दिसले सरांच्या मनाचा मोठेपणा असा की त्यांनी आपल्याला मिळालेली पुरस्काराची ५० टक्के रक्कम ही आपल्या इतर फायनलीस्टांसोबत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

दिसले सरांच्या या मोठेपणामुळे प्रत्येक फायनलिस्टला ५५,००० डॉलर मिळणार आहेत. आपली विजयी रक्कम शेयर करणारे ते पहिले शिक्षक ठरले आहेत. वर्कि फाउंडेशनचे संस्थापक भारतीय शिक्षणतज्ञ सनी वर्कि यांनी सांगितले की, असे करून दिसले मास्तरांनी दानाचे महत्व सिद्ध केले आहे.  

कोरोना काळात मुलांच्या शिक्षणाचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काहींना योग्य शिक्षण मिळत नाहीये. अशाही काळात दिसले यांच्या सारखे शिक्षक आपल्या अथक परिश्रमातून मुलांपर्यंत शिक्षण पोचावण्याचं काम करताना दिसतात.

दिसले सरांनी २००९ साली जेव्हा जिल्हा परिषेदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली, त्यावेळी या शाळेची अवस्था एखाद्या स्टोररूमसारखी होती. त्यांनी हळूहळू बदल करत पुस्तकांमध्ये थेट क्यूआर कोड पद्धत आणली. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑडिओ, विडिओ लेक्चर देखील उपलब्ध होऊ लागले.

दिसले सरांनी केलेल्या कामाचा परिणाम असा झाला की, आता त्या गावात एकाही मुलीचे लवकर लग्न केले जात नाही. तसेच शाळेत येणाऱ्या मुलींचे प्रमाण देखील १०० टक्के असते. दिसले सरांची शाळा ही २०१७ साली क्यूआर कोडचा अवलंब करणारी राज्यातील पहिली शाळा ठरली होती.

त्यांनंतर राज्यभरात देखील या गोष्टीची अंमलबजावणी केली होती. पुढे २०१८ साली केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देखील क्यूआर कोड आणला होता. एखाद्या शिक्षकाने अभिनव योजना आणली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे सिद्ध करणारी ही घटना आहे.

एका सामान्य जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असणाऱ्या दिसले यांचे कार्य मात्र एखाद्या आंतरराष्ट्रीय समाजसेवकाला साजेसे आहे. 'lets cross the border' या प्रोजेक्टच्या माध्यमातून ते भारत पाकिस्तान, इस्रायल पॅलेस्टाईन, इराण इराक या देशांमधील तरुणांना एकमेकांमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी एकत्र आणत असतात.

यासाठी सहा आठवड्यांचा एक उपक्रम घेण्यात येत असतो. या उपक्रमातून दुसऱ्या देशांतील मुलांना व्यवस्थित समजून घेणे, बोलणे अशा गोष्टी केल्या जात असतात. दिसले यांनी ८ देशांतील तब्बल १९ हजार तरुणांना अशा पद्धतीने एकत्र आणले आहे.

या सर्व कामांव्यतिरिक्त त्यांनी आपल्या घरी एक लॅब देखील तयार केली आहे. त्याठिकाणी ते विविध प्रयोग करत असतात.

दिसले सरांची निवड ही जगभरातील १४० देशांतील १२ हजार शिक्षकांमधून करण्यात आली आहे. भारतात दिसले मास्तरांसारखे अजून काही शिक्षक तयार झाले तर निश्चितच शिक्षण क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही.

बोभाटा तर्फे दिसले सरांचे मनःपूर्वक अभिनंदन.

सबस्क्राईब करा

* indicates required