computer

आयकिया (IKEA) बद्दल ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

घरात नविन सोफा किंवा फर्निचर बदल करण्याचा विचारात आहात? कपाट, सोफा,दिवाण, किचन,डायनिंग टेबल बदलायचा आहे. मग घरात चर्चा सुरू होते, सुतार शोधा,विश्वासाने त्याला काम द्या.त्याच्या वेळेनुसार तो काम करणार. एक महिन्याच्या कामाला दोन महिने लावणार. त्यात तो सारखा आवाज, ती धूळ, घरातले हैराण. कधी एकदा काम संपतंय असं होऊन जातं ना? बर अचानक शेवटच्या मिनिटाला येणारे खर्च तर वेगळेच आणि शेवटी काम मनासारखं नाही झालं तर मनस्ताप वेगळाच होतो ना?

या सगळ्या मनस्तापातून जाण्यापेक्षा सर्व प्रकारचे रेडिमेड फर्निचर एकाच छताखाली मिळाले तर? तेही रास्त दरात.अगदी चांगल्या दर्जाचे काम. धक्का बसला ना ? पण हे खरच होत आहे.

काय म्हणता IKEA बद्दल पहिल्यांदाच ऐकताय? आजच्या लेखातून  IKEA बद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

आयकिया ही स्वीडिश मल्टिनॅशनल कंपनी आहे. ५.३ लाख स्क्वेअर फुट इतक्या मोठ्या जागेवर ते उभारले गेले आहे. आइकिया फर्निचर आणि घरसजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या वस्तू खिशाला परवडणाऱ्या तसेच चांगल्या दर्जाच्या म्हणून नावाजलेल्या आहेत. जगभरात याची स्टोर्स पसरलेली आहेत.

पण आइकिया (IKEA)  असं विचित्र नाव का, असा प्रश्न पडला असेल ना?I

KEA मधलं IK म्हणजे इंग्वर कंप्राड(IE) नावाचे पहिले अक्षर आणि EA (Elmtaryd,Agunnaryd) म्हणजे त्यांच्या गावाचे आणि ते जिथे मोठे झाले त्या जागेचे नाव आहे. हे अद्याक्षरांचे संक्षिप्त रूप आहे.

१९४३ मध्ये ही स्वीडिश कंपनी कम्पनी इंग्वर कंप्राड यांनी वयाच्या फक्त १७ व्या वर्षी स्थापन केली. त्यावेळेला ते फक्त फोटो फ्रेम बनवायचे आणि विकायचे. १९५४ पर्यंत फारसे काही विकले गेले नाही. पण निराश न होता त्यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपले काम सुरू ठेवले. नवीन नवीन उत्पादने ते आणत राहिले. तेव्हा पाहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केले. पहिल्या दुकानाच्या जागेवर जिथे त्यांनी काम सुरू केले होते तिथे आता संग्रहालय आहे. इंग्वर कंप्राड यांचे निधन अलिकडेच २०१८ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी झाले. IKEA ही एक कंपनी लाखो लोकांच्या उत्पन्नाचे साधन बनली आहे.

(इंग्वर कंप्राड)

IKEA ची काही ठळक वैशिष्ट्ये पाहुयात ...

आइकिया गटाचे स्टोर्स जगभरातील ४२ देशांमध्ये आहेत. २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७१.६ कोटी ग्राहकांच्या भेटी, तर आयकेई डॉट कॉमला १.५ अब्ज लोकांच्या भेटी  होत्या.

कमी किंमतीत अतिशय उत्कृष्ट दर्जा अशी आयकियाची खासियत आहे. आयकियामध्ये ७००० पेक्षा जास्त उत्पादने आहेत. जागतिक स्तरावर २००० उत्पादने दर वर्षी नव्याने बनवली जातात. प्रत्येक देशाच्या उपयोगानुसार वस्तूंच्या श्रेणी निवडल्या जातात. तसेच वस्तूंच्या किंमतीही ठरवल्या जातात. प्रत्येक देशात स्टोर उघडण्यापूर्वी सर्वे केला जातो. भारतातही १००० घरात सर्वे केला गेला. आधी हैदराबाद, आता मुंबई आणि अजून ४० शहरात हे स्टोर उघडले जाणार आहेत.

जगभरातील आइकिया स्टोर हे कमीत कमी ३,००,००० स्क्वेअर फुट इतक्या अवाढव्य जागेत उभे केलेले आहेत. म्हणजे जवळपास ४२ टेनिस कोर्टची जागा. सगळ्यात मोठे स्टोर हे स्टॉकहोम  येथे ५,९४,००० स्क्वेअर फुट इतके मोठे आहे.

आइकिया स्टोर मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक भेट द्यायला येतात, फिरतात. पण दमल्यामुळे भूक लागल्यावर खायची सोय नसल्यामुळे ग्राहक स्टोर सोडून निघून जायचे. त्यामुळे ग्राहकांसाठी १९६० साली प्रत्येक स्टोर मध्ये रेस्टॉरंट सुरू करण्यात आले. तिथे मिटबॉल खूप विकले जायचे. फक्त UK मध्ये ११ अब्ज स्विडिश मिटबॉल विकले जातात. भारतात त्यांनी हैदराबादमध्ये चिकनबॉल ठेवले आहेत तसेच शाकाहारी पदार्थही आहेत.

रेस्टॉरंट बरोबरच इथे मुलांना खेळायचीही सोय आहे. आईवडील स्टोअर मध्ये फिरत राहिली तर मुलं कंटाळतात त्यामुळे त्यांना खेळायला ही जागा वेगळी ठेवली आहे.

IKEA UK च्या फोटो फ्रेम ह्या जगात सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या आहेत. तसेच IKEA चे एक पानांच्या आकाराचे साइड टेबलही सगळ्यात विक्रमी विकले जाणारे लाकडी टेबल आहे. बिली बुककेस नावाने ते प्रसिद्ध आहे. गेल्या पाच वर्षात, स्टोअरने यूकेमध्ये जवळजवळ ६६ लाख बिली बुककेसेस विकल्या आहेत. तिथे लोक अभिमानाने सांगतात की त्यांच्याकडे बिली बुककेस आहे.

पूर्ण घराचे फर्निचर एकाच छताखाली विकले जाते. प्रत्येक उत्पादनाचे नाव स्वीडिश शब्दांनुसार ठेवले गेले आहे. उत्पादने नावावरून ओळखता यावीत म्हणून नावे त्या वस्तूशी निगडित दिली आहेत जसे स्नानगृह उत्पादनांना तलाव, नद्या आणि खाडीच्या नावांनी नावे दिली आहेत.तसेच वस्तूंच्या टॅग मध्येप्रथम वस्तूची किंमत येते.त्यानंतर वस्तूची माहिती येते.

असे म्हणतात की आइकियाचा उत्पादनांचा कॅटलॉग सुमारे २९ वेगवेगळ्या भाषांमध्ये छापला जातो. जो दरवर्षी  तब्बल १८ कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवला जातो. हा खप बायबलच्या विक्रीपेक्षा जास्त आहे. बायबलच्या १० कोटी प्रति छापल्या जातात. आता ही अफवा आहे का खरं, हे माहीत नाही.

या अवाढव्य स्टोरला भेट द्यायच्या विचारात असाल तर हे लक्षात असू द्या.

कोविडमुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी आइकियाने ग्राहकांना भेटीसाठी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. आयकियाच्या वेबसाईटवर बुकिंग करता येऊ शकते. बुक केलेल्या वेळेनुसारच भेट द्यावी लागेल..

पुढच्या दोन आठवड्यासाठी नवी मुंबईचे स्लॉट बुकिंग फुल्ल झाले आहे.त्या मुळे प्रतीक्षा करावी लागेल. वेबसाईटवर वेळ बघूनच जा.

ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. नेहमीप्रमाणे शेयर करायला ही विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required