"सोने की चप्पल और चांदी की चप्पल"...धीरूभाई अंबानींनी रामनाथ गोयंकांना काय ऐकवलं होतं ??
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/thugee5451%20%285%29.jpg?itok=O-92fqFj)
धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित गुरु हा चित्रपट आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. हा सिनेमा धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित आहे असा दावा निर्मात्यांनी कुठेही केला नव्हता, परंतु ज्यांना धीरूभाई अंबानी ही काय चीज होती हे माहिती आहे त्यांना वेगळे काही सांगावे लागलेच नाही. धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त एक खास किस्सा आज आम्ही बोभाटाच्या वाचाकांसमोर सादर करत आहोत. या किश्श्याचं नाव आहे, "सोने की चप्पल और चांदी की चप्पल".
हा किस्सा नेमका कसा घडला होता हे समजण्यासाठी आपल्याला १९८५ सालापर्यंत मागे जावे लागेल. त्याकाळात धीरूभाई अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीचा) आणि बॉम्बे डाईंगचे नस्ली वाडिया यांचा व्यावसायिक संघर्ष पराकोटीला पोचला होता. कृत्रिम धाग्याच्या निर्मितीत बॉम्बे डाईंगचा मार्ग DMT(DiMethyl Terephthalate) च्या मार्गाने जात होता आणि रिलायन्स PTA (Purified Terephthalic Acid) च्या मार्गाने जात होता. ही दोन्हीही धागे तयार करण्यासाठी लागणारी मूलभूत रसायने आहेत. तोपर्यंत वाडियांना धीरूभाई अंबानींच्या चतुराईचा अंदाज आला नव्हता. या दोन्ही उद्योगपतींचे गॉडफादर होते इंडियन एक्सप्रेसचे मालक रामनाथ गोयंका! वाडियांवरती गोयंकांचे पुत्रवत प्रेम होते असं म्हणतात. याच दरम्यान मुरली देवरा यांनी धीरूभाई अंबानींचा परिचय रामनाथ गोयंका यांच्यासोबत करून दिला. धीरूभाईंच्या धडाडीचा प्रभाव गोयंकांवर इतका पडला की वाडियांप्रमाणेच धीरूभाईंचेही गोयंकांसोबत स्नेहबंध प्रस्थापित झाले.
(नस्ली वाडिया)एकदा वाडियांच्या आणि गोयंकांच्या भेटीत गोयंकांनी सहज प्रश्न विचारला की धंदा कसा चाललाय? यावर वाडियांचे उत्तर होते की, "बाकी सगळं ठीक आहे, परंतु त्यांच्याच पेपरमधून म्हणजे इंडियन एक्स्प्रेसमधून बॉम्बे डाईंगच्या कारभारावर चिखलफेक केली जात आहे". या चिखलफेक करणाऱ्या बातम्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (PTI) माध्यमातून सर्व वृत्तपत्रांपर्यंत पोहोचायच्या. रामनाथ गोयंका जसे इंडियन एक्सप्रेसचे मालक होते, तसेच राष्ट्रीय पातळीवरच्या स्वायत्त संस्थेचे म्हणजे PTI चे अध्यक्षही होते. गोयंकांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आणि त्यांच्या लक्षात आले की PTI चे वृत्तसंपादक धीरूभाईंनी “मॅनेज” केले आहेत.
(रामनाथ गोयंका)
धीरूभाईंच्या या माणसं वापरण्याच्या कौशल्याचा थेट तडाखा ३१ ऑक्टोबर रोजी रामनाथ गोयंका यांना बसला. त्यावेळी PTA च्या गैरव्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीची सीबीआयतर्फे चौकशी चालली आहे अशी कुणकुण होती. धीरूभाईंनी PTI च्या वृत्तसंपादकाला पटवून एक बातमी पसरवली. या बातमीचा सारांश असा होता,
"आमच्या असे लक्षात आले आहे की PTA च्या गैरव्यवहाराबद्दल आमच्या(रिलायन्स इंडस्ट्री)विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात येत आहे. अशी बातमी आमचे व्यावसायिक शत्रू कंपनी मुद्दाम सर्वत्र पसरवत आहे. या कंपनीच्या गोदामात ५००० टन DMT चा साठा पडून असल्याने त्यांनी ही बातमी हेतुपुरस्सर पसरवली आहे."
रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती अंबानी यांनी ही बातमी PTI ला दिली हे गोयंकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी PTI च्या वृत्तसंपादकाला फैलावर घेतले. ही बातमी देण्यापूर्वी योग्य ती शाहनिशा करण्यात आली आहे का, अशीही विचारणा केली. PTI ने अर्थातच शहानिशा केली नव्हती. कारण धीरूभाई अंबांनींनी त्यांना पूर्णपणे “मॅनेज” केले होते. दुसऱ्याच दिवशी PTI ने अधिकृतरीत्या चुकीचे वृत्त दिले अशी क्षमायाचना केली. गोयंका एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी धीरूभाई अंबांनींना प्रत्यक्ष बोलवून जाब विचारायचे ठरवले. रामनाथ गोयंका यांना धीरूभाई अंबानी भेटायला आले. या प्रकरणात अंबानींचे उत्तर होते,
“मी एक बिझनसमन आहे. माझ्याकडे दोन प्रकारच्या चपला मी हातात ठेवतो. एक चप्पल सोन्याची, तर दुसरी चांदीची! ज्याची जशी लायकी असेल त्याप्रमाणे ती चप्पल मी वापरतो.”
थोडक्यात धीरूभाईंना हे सांगायचे होते, की त्यांच्या व्यवसायात त्यांनी प्रत्येक माणसाची किंमत ठरवली आहे. ती किंमत दिल्यावर माणसं ते सांगतील तसेच वागतात. अप्रत्यक्षरीत्या त्यांनी गोयंकांना हे पण सूचित केले की त्यांचीही एक “किंमत” आहे. यापलीकडे त्यांचे काहीही महत्त्व नाही.
धीरूभाईंचे फॅन असणारे रामनाथ गोयंका या उत्तराने त्यांचे ‘दुश्मन’ झाले. यानंतर एस. गुरुमूर्ती यांना नेमून गोयंकांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे गैरव्यवहार उघडकीस आणणारी एक मालिका इंडियन एक्सप्रेसमध्ये सुरु केली. बाकीचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे.
‘सोने की चप्पल और चांदी की चप्पल’ हा प्रसंग प्रत्यक्षात घडला अथवा नाही याबद्दल अनेकांना शंका आहेत. अंबानी परिवाराने असे काही घडले नाही, असे म्हटले आहे. परंतु रामनाथ गोयंकांच्या मर्जीतील दोन व्यक्तींच्या मते हा प्रसंग असाच घडला होता. हा उल्लेख ‘The Polyester Prince’ या Hamish McDonald यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या आठव्या प्रकरणात आहे. हे पुस्तक भारतात प्रतिबंधित आहे. परंतु या पुस्तकाच्या अनधिकृत प्रती सध्या बाजारात सहज उपलब्ध आहेत. आता गुरु सिनेमा पाहिलात तर हा प्रसंग पाहायला तुम्ही विसरू नका.