तृतीयपंथीयांचे शिलेदार: भेटा भारतातील पहिल्या तृतीयपंथीय कॅब ड्रायव्हरला!!
तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. पण अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. अशाच काही कर्तृत्ववान तृतीयपंथीयांची ओळख करून देण्यासाठी बोभाटा नवीन लेखमालिका घेऊन येत आहे.
आज भेटूया भारतातील पहिल्या तृतीयपंथीय कॅब ड्रायव्हरला
तृतीयपंथीयांबद्दल समाजाचा दृष्टीकोण आजही काही प्रमाणात संकुचित असलेला बघायला मिळतो. पण हा दृष्टीकोण बदलण्यासाठी समाजाला भाग पाडणारे अनेक कर्तृत्ववान तृतीयपंथीय समाजात आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे मेघना साहू!!!
तृतीयपंथीय आणि संघर्ष हे समानार्थी शब्द आहेत की काय असे वाटावे इतका प्रचंड संघर्ष त्यांच्या वाट्याला येत असतो. मेघना उच्चशिक्षित असून देखील तिला पावलोपावली संघर्ष करावा लागला. ती मुळची भुवनेश्वरची. तिने एमबीए केले आहे. पण तृतीयपंथीय असल्या कारणाने तिला शिक्षणात देखील वेळोवेळी त्रासाला सामोरे जावे लागत होते.
मेघना साहू ही एवढे सगळे अडथळे पार करून देशातील पहिली तृतीयपंथीय कॅब ड्रायव्हर ठरली आहे. एमबीए होऊन एका फार्मा कंपनीत ती कामाला लागली, पण तिथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून हिंमत न हरता तिने दुसऱ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला. तिच्या याच प्रयत्नांनी ती देशातील पहिली तृतीयपंथीय कॅब ड्रायव्हर बनू शकली.
कॅब ड्रायव्हर होणे देखील सोपे नव्हते. तृतीयपंथीय असल्याने तिला व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. पण सर्व अडचणींना पार करत ती शेवटी इथवर पोहोचली आहे. ती सांगते की, 'तृतीयपंथीय ड्रायव्हर असल्याने महिलांना माझ्या कॅबमध्ये सुरक्षित वाटतं'.
मेघनाला आधीपासून माहीत होते की आपल्याला त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, पण आपण हिंमत केली नाही तर आपल्याला पूर्ण आयुष्य असेच काढावे लागेल या विचाराने तिने स्वतःला तयार केले. तृतीयपंथीयांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यासाठी मेघना सातत्याने प्रयत्न करत असते.
मेघनाने एक पुरुषासोबत लग्न केले आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यात ती अतिशय सुखी असून दोघांजवळ एक ५ वर्षांचा मुलगा देखील आहे. मेघना फक्त तृतीयपंथीयांसाठीच नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणा आहे हेच म्हणावे लागेल.