computer

तृतीयपंथीयांचे शिलेदार: भेटा भारतातील पहिल्या तृतीयपंथीय पोलीस अधिकारी प्रीतिका यशिनी यांना!!

तृतीयपंथी समुदायातील लोकांना अनेकवेळा अडचणींचा, अपमानाचा सामना करावा लागतो. चांगली नोकरी मिळणे, घर भाड्याने किंवा विकत घेता येणे, समाजामध्ये आदरपूर्वक वागणूक मिळणे, सहज कुणाशी मैत्री किंवा ओळख करुन घेणे या वरवर साध्यासोप्या वाटणाऱ्या गोष्टीही त्यांच्यासाठी कमालीच्या अवघड असतात. पण अर्थातच सर्वांप्रमाणे या समुदायातील व्यक्तींना देखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यातील गुणांना वाव देणे, त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. बदललेल्या काळानुसार अनेक तृतीयपंथी यशस्वी होत जगापुढे एक आदर्श उभा करत आहेत. तसेच तृतीयपंथी समुदायातील इतरांनादेखील प्रेरणा देत आहेत. अशाच काही कर्तृत्ववान तृतीयपंथीयांची ओळख करून देण्यासाठी बोभाटा नवीन लेखमालिका घेऊन येत आहे.

आज आपण भारतातील पहिली तृतीयपंथीय पोलीस अधिकारी प्रीतिका यशिनी यांचा प्रवास वाचणार आहोत.

समाजात मानाने जगायचे असेल तर आपल्याला आहे त्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढणे गरजेचे आहे. ही गोष्ट तृतीयपंथीयांसाठी तंतोतंत लागू होते. समाजात तृतीयपंथीयांना कशी वागणूक मिळते हे आपल्याला माहित आहेच, पण काही तृतीयपंथीय स्वतः संघर्ष करून समाजात मान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हे वाटते तितके सोपे नाही. ज्यांना मुळात जगण्याचा संघर्ष करावा लागतो, त्यांना मानाची पदे मिळणे किती कठीण होऊ शकते हे वेगळे सांगायला नको. पण या अनंत अडचणींवर मात करूनही काही तृतीयपंथीय स्वतःला सिद्ध करत आहेत.

२९ वर्षीय प्रीतिका यशिनी यांनी आजपासून ३ वर्षांपूर्वी २०१७ साली स्वतःचे नाव इतिहासात कोरले होते. तमिळनाडू येथील धर्मपुरी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. ही कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्याच तृतीयपंथीय आहेत. त्यांना मात्र इथेच थांबायचं नाही. अजून कठीण मेहनत करून आयपीएस होण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

प्रीतिका यांचा जन्म मुलगा म्हणून झाला होता. त्यांचे नाव प्रदीप असे होते. वयात येत असताना त्यांना आल्या लैंगिकतेची जाणीव झाली. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या आई वडिलांना समजली तेव्हा घरात मोठा गहजब झाला. त्यांचे आई वडील आता पूजापाठ, मांत्रिक यांच्यामागे आपल्या मुलासाठी लागले. या सर्व गोष्टी मात्र प्रीतिका यांना सहन होत नव्हत्या. त्यांनी घरातून पळ काढला आणि त्या चेन्नई येथे एका तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेत राहायला लागल्या. त्यांच्या मार्फतच त्यांनी वॉर्डन म्हणून नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करण्यास सुरूवात केली.

मोठी लढाई लढून प्रीतिका इथवर पोहोचल्या आहेत. तमिळनाडू येथील भरती प्रक्रिया करणाऱ्या बोर्डाने त्यांना परीक्षेला बसू दिले नव्हते. राज्य लोकसेवा आयोगाच्या नियमावलीत तृतीय पंथीयांसाठी कोणतेही नियम किंवा आरक्षण नसल्याने प्रीतीका यांचा अर्ज ताबडतोब फेटाळण्यात आला. याच प्रकारे त्यांना विविध कारणे देऊन टाळले जात होते. शेवटी त्यांना न्यायालयात जावे लागले. तिथून त्यांनी लेखी परीक्षेला बसण्याची परवानगी मिळवली. पुढे ग्राउंडमध्ये परत त्यांना 1.1 सेकंद उशीर झाला म्हणून डिस्क्वालिफाईड करण्यात आले. त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली. शेवटी न्यायालयाने परत त्यांना दिलासा दिला. मद्रास न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर प्रीतिकाचा पोलीस उपनिरीक्षक बनण्याचा मार्ग सुरळीत तर झालाच पण पोलीस दलात तृतीयपंथीच्या समावेशाबद्दल आवश्यक बदलही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

जॉईनिंग झाल्यावर त्यांनी सांगितले होते, 'आपण लहान मुलांना दिला जाणारा त्रास आणि लैंगिक अत्याचारांविरुद्ध कठोर पाऊले उचलणार आहोत. तसेच आपल्याला अजून भरपूर कामे करायची आहेत.'

प्रीतिका यांच्या रूपाने तृतीयपंथीयांना पोलीस दलात देखील प्रयत्न केले तर भरती होता येते याचा आत्मविश्वास मिळाला आहे. पुढील काळात प्रीतिका यांच्यापासून प्रेरणा घेऊन अधिकाधिक तृतीयपंथीय समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील.

सबस्क्राईब करा

* indicates required