computer

ओळख जिल्ह्यांची: पांढरे सोने पिकवणारा जिल्हा ते दोन दोन मुख्यमंत्री देणारा जिल्हा....यवतमाळमध्ये काय खास आहे?

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे. त्यात यवतमाळ जिल्हा म्हटला म्हणजे अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा जिल्हा. लोकनायक बापूजी अणे तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक, असे अनेक महान व्यक्तिमत्वे यवतमाळ जिल्ह्याने देशाला दिली आहेत. याच यवतमाळबद्दल आज आपण काही नवीन गोष्टी माहीत करून घेणार आहोत. 

पांढरे सोने म्हणजेच कापसाचे माहेरघर असे यवतमाळचे वर्णन केल्यास गैर ठरणार नाही. इतक्या प्रमाणावर येथे कापसाचे उत्पादन केले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात शिरायचे म्हटल्यास वाकाटक, चालुक्य, गोंड, राष्ट्रकूट, यादव अशा सर्व महत्त्वाच्या घराण्यांची यवतमाळवर सत्ता होती. पुढे इंग्रजांच्या कालखंडात वऱ्हाड प्रांतात हा जिल्हा होता. १९०५ साली या जिल्ह्याचे अधिकृतपणे यवतमाळ असे नामकरण झाले. यवतमाळचा प्रवास आधी मध्यप्रदेश, मुंबई राज्य आणि मग महाराष्ट्र असा राहिला आहे. 

बापूजी अणे, वसंतराव नाईक यांच्याप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातून अनेक महत्त्वाची व्यक्तिमत्वे होऊन गेली आहेत. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने एकाच जिल्ह्यातून दोन मुख्यमंत्री देण्याचा विक्रम यवतमाळच्या नावे आहे. राज्यभर प्रसिद्ध असलेल्या लोकमत समूहाचे संस्थापक जवाहरलाल दर्डा, आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने राज्यभर आदर प्राप्त असलेले राम शेवाळकर हे देखील यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.

(सुधाकरराव नाईक आणि वसंतराव नाईक)

मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळख असणारा यवतमाळ बालाघाट डोंगररांगांपासून तयार झाला आहे. वर्धा आणि वैनगंगा या विदर्भात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दोन्ही नद्या यवतमाळमधून वाहतात. यवतमाळची प्रमुख भाषा मराठी असली तरी बंजारी, कोलामी या भाषा सुद्धा बोलल्या जातात. 

यवतमाळ पिकांच्या बाबतीत खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण आहे. जिल्ह्यात कापूस आणि ज्वारी ही जरी प्रमुख पिके असली, तरी त्याचबरोबरीने जिल्ह्यातील विविध भागात द्राक्ष, संत्री, केळी, ऊस अशी पिके घेतली जातात. वर्धा, वैनगंगा खोऱ्यामुळे येथील माती काळी कसदार झाली आहे. 

जिल्ह्यातून जाणारा प्रमुख महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७. मूर्तीजापूर- यवतमाळ हा लोहमार्ग जिल्ह्याला दळणवळणासाठी महत्त्वाचा आहे. वनांच्या बाबतीत यवतमाळ राज्यात अग्रेसर आहे. बांबू, मोह, हिरडा, तेंदू ही महत्वाची वनस्पती आहेत. यवतमाळ जिल्हा खनिजसंपत्तीचे वरदान लाभलेला आहे. चुनखडी मोठ्या प्रमाणावर सापडणारा जिल्हा यवतमाळ आहे. तसेच दगडी कोळसा आणि काळा दगड सुद्धा याठिकाणी मुबलक प्रमाणात सापडतो. 

पर्यटनाचा विचार केल्यास कळंब येथे असलेले अष्टविनायकांपैकी एक मंदिर जिल्हा आणि जिल्हाबाहेरील लोकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे पैनगंगा नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी वेळोवेळी गर्दी उसळत असते. वणी, राळेगाव, अंजी येथील नृसिंग मंदिर ही अजून काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. 

वरील सर्व माहीती वाचून यवतमाळ बद्दल तुम्हाला पुरेशी माहिती मिळाली असेल अशी आशा आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required