computer

समर्थ रामदासांचे गाव, महिको बियाणे उद्योग, सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन, मोसंबी उत्पादक.. जालना जिल्हा आणखी कशांसाठी प्रसिद्ध आहे??

महाराष्ट्र राज्याच्या नकाशात बरोबर मध्यभागी दिसणारा जिल्हा म्हणजे जालना. मराठवाड्यातील जालना इतर शहरांप्रमाणे कधीकाळी निझामाच्या राज्याचा भाग होते. पुढे मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला.

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा जालना जिल्हा नव्हता. पण बरोबर २१ वर्षांनी १ मे १९८१ औरंगाबादमधून जालना वेगळा करत त्याला जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली. जालना जिल्ह्याने राज्यासाठी सर्वबाजूंनी मोठे योगदान दिले आहे.
 

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातल्या जांब या गावचा. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामात आपल्या प्राणाची आहुती देणारे जनार्दन मामा नागपूरकर हे जालना जिल्ह्याचे भूषण आहे. भारतातील बियाणे उद्योगातील मोठी कंपनी महिको उद्योगपती बद्रीनारायण बारवाले यांनी जालना जिल्ह्यात स्थापन करून जालन्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले होते.

जालना जिल्ह्यात असणाऱ्या सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशनमुळे जालन्याची वेगळी ओळख तयार झाली आहे. कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावर जालना हे शहर वसले आहे. येथील मोती तलाव प्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या काही भागातून गोदावरी नदी वाहते. खान्देशात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी अहिराणी भाषा जालनाच्याही काही भागांत बोलली जाते.

शेती हाच या जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. करडई उत्पादन हे या जिल्ह्यात प्रामुख्याने घेतले जात असते. ज्वारी हे मुख्य अन्नधान्य पीक आहे, तर कापूस हेच मुख्य नगदी पीक आहे. या पिकांबरोबर बागायती भागात उसाचे पण उत्पादन घेतले जाते. डाळिंब, द्राक्षे, केळी अशी फळपिकेही काही भागांत दिसतात. अनेकांना माहीत नसेल, पण मोसंबीखाली असणारे सर्वाधिक क्षेत्र हे जालना जिल्ह्यात आहे.

गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी राजूर हे पूर्ण पीठ जालना जिल्हयात येते. राज्यभरातील लोक याठिकाणी दर्शनाला येत असतात. अंबड येथील मत्स्योदरी मंदिर नवरात्रीवेळी दिवसरात्र गजबजलेले असते. या मंदिराच्या नावामागील सांगितली जाणारी गोष्ट अशी की ज्या डोंगरावर हे मंदिर वसले आहे ते माशाच्या आकाराचे असल्याने मंदिराला नाव पडले आहे.

जालन्याला सिटी ऑफ स्टील म्हणून ओळखले जाते. तसेच याठिकाणी हातमाग आणि यंत्रमागद्वारे कपडे बनविण्यात येतात. जालन्याची अजून एक विशेषता म्हणजे येथे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही प्रचंड कडक असतात.

तर ही होती जालना जिल्ह्याची माहिती. तुम्हाला जालन्याची आणखी काही विशेषता माहित असेल तर आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही लेखात भर घालू. तसेच तुमच्या जालना जिल्ह्यातील मित्रांना हा लेख शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required