मंत्रभूमी ते यंत्रभूमी!! काय काय आहे आपल्या नाशिक जिल्ह्यात?
मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा प्रवास करणारा नाशिक जिल्हा महाराष्ट्राच्या विकासात महत्वाचे योगदान देत आहे. नाशिक जिल्हा अनेक गोष्टींमुळे विशेष आहे. नाशिकला धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक असा मोठा वारसा लाभलेला आहे.
असे म्हटले जाते की समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचे चार थेंब जमिनीवर पडले आणि त्यातला एक थेंब नाशिकला पडला होता. याच कारणाने इथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो. कुंभमेळ्यासोबत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आणि साडेतीन पीठांपैकी एक सप्तश्रृंगी माता या देवस्थानांमुळे नाशिक हे धार्मिक दृष्टीने फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशात वेगळे महत्व राखून आहे.
नाशकात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते हे तर महाराष्ट्राला पाठ झालेले वाक्य आहे. द्राक्ष पाहिली म्हणजे नाशिकची असतील हा समज राज्यात पक्का आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव (ब) येथे द्राक्ष संशोधन केंद्र आहे. पण इतरही पिके नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. लासलगाव येथील कांद्याची बाजारपेठ राज्यात प्रसिद्ध आहे. सोबतच गहू, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, टोमॅटो, मिरची डाळिंब असे विविध पिके जिल्ह्यात घेतली जातात. कळवण आणि सुरगणा हा भाग स्ट्रॉबेरी उत्पादक म्हणून ओळखला जात आहे.
सह्याद्रीमुळे नाशिक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. महाराष्ट्रातली सर्वात मोठी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात उगम पावते. याव्यतिरिक्त गिरणा, दारणा, वैतरणा, भीमा या नद्या नाशिक जिल्ह्यात वाहतात. खनिज संपत्तीचा विचार करायचा झाल्यास इथे चुनखडी आणि कंकर सापडतात.
जिल्ह्यात कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, कलेक्टर जॅक्शनचा खून करणारे अनंत कान्हेरे, वसंत कानेटकर अशी महान व्यक्तिमत्त्वे होऊन गेली आहेत. जगातील सर्वात पहिले मातीचे धरण गंगापूर या नाशिक जिल्ह्यातील ठिकाणी आहे.
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन हा पुस्तकाचा विषय होऊ शकतो. जगभरातील लोक नाशिक येथील विवीध ठिकाणांना भेटी देण्यासाठी येत असतात. नाशिक येथील अनेक मंदिरे देशात धार्मिकदृष्टीने महत्वाची आहेत. म्हणून भाविकांसाठी हे शहर नेहमीचे येण्याजाण्याचे आहे. श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारण्यासाठी भाविक येत असतात.
नाशिक रोड भागात असलेले १९७१ साली स्थापन झालेले मुक्तीधाम मंदिर हे संपूर्ण संगमरवरी बांधकाम असलेले आहे. शहरातच असलेल्या पंचवटी येथील रामकुंडाला मोठे महत्व आहे. याठिकाणी गोदावरी नदी वाहते. येथे स्नानाला विशेष महत्व आहे.
औद्योगिकदृष्ट्या नाशिक मुंबई पुणे यानंतर सर्वात विकसित जिल्हा समजला जातो. येथे महिंद्रा सारख्या अनेक कंपन्या नाशिकच्या संपन्नतेत भर घालत असतात. लहानमोठ्या करून असंख्य कंपन्या नाशिक येथे असल्याने राज्यभरातील लोकांना इथे रोजगार मिळत असतो.
तर, हा होता आपला नाशिक जिल्हा. तुम्ही नाशिककर असाल आणि या माहितीत आणखीही काही भर पडावीशी तुम्हांला वाटत असेल, तर कमेंटबॉक्स आपला आहे!! आणि हो, नाशिक जिल्ह्याची ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा.
--उदय पाटील