computer

'जय भीम' चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर बेतला आहे त्या न्यायमूर्ती के. चंद्रूंबद्दल आणखी जाणून घ्या..

दिवाळीत बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. थिएटर्स नुकतीच उघडल्यामुळे गेल्या दीड वर्षांचा सिनेउपवास सोडायचा लोकांचा उत्साह आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही अनेक चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत. यातच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतला सुपरस्टार सूर्या शिवकुमारचा चित्रपट 'जय भीम' दिवाळीत प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटात सूर्याने एका वकिलाची भूमिका साकारली आहे, के. चंद्रू हे त्या वकिलाचे नाव. हा वकिल नेहमीच गरीब आणि आदिवासी लोकांसाठी उभा राहतो. त्यांच्या न्यायासाठी लढा देतो. म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने हिरो आहे. सूर्याने साकारलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या चित्रपटात सूर्याने साकारलेली वकिलाची भूमिक ज्यांच्या आयुष्यावर बेतली आहे, म्हणजे के. चंद्रू हे खऱ्या आयुष्यात कोण आहेत, त्यांनी कार्य कसे होते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

वकील आणि न्यायाधीशांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि यशोगाथांबद्दल फारसे बोलले जात नाही. कदाचित त्यामुळेच न्यायमूर्ती चंद्रूंबद्दल अजूनही अनेकांना माहिती नव्हती. के. चंद्रू हे फक्त पात्र नाही, ही व्यक्ती खरोखरीच अस्तित्वात आहे. ते मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी अनेक वर्षे वकील म्हणून आदिवासींच्या हक्कांसाठी आवाज उठवला, त्यांना न्याय मिळवून दिला आणि तेही एक पैसाही मोबदला न घेता! आजच्या काळात वकिल म्हणले की त्यांची अव्वाच्या सव्वा फी आठवते, पण के. चंद्रू एकही पैसा न घेता या समाजाच्या हक्कासाठी लढले. कितीतरी लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे.

या चित्रपटात चंद्रू यांच्या एका प्रकरणाची कथा घेण्यात आली आहे. १९९३ मध्ये तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका घटनेवर ही कथा आधारित आहे. न्यायमूर्ती चंद्रू त्यावेळी वकील होते. त्यांनी मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध धैर्याने लढा दिला. इरुलर समाजातील एका आदिवासी महिलेने पोलिसांकडून कोठडीतील छळ आणि पोलिस कोठडीत पतीचा मृत्यू याविरोधात न्यायालयात लढा दिला. या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी के. चंद्रू यांनी सर्वतोपरी मदत केली होती. अनेक अवघड प्रसंगांत त्यांनी हार न मानता त्या महिलेला न्याय मिळवून दिला. तामिळनाडूच्या मुदान्नी गावातील कुरवा आदिवासी समाजातील राजकन्नू आणि सेंगाई असे त्या जोडप्याचे नाव आहे. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू यांची भूमिका करण्यापूर्वी सूर्या यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांचे काम समाजापुढे आले पाहिजे हे त्यांना जाणवले.

के. चंद्रू यांनी न्यायव्यवस्थेशिवाय स्वतःची वेगळी ओळख ठेवली आहे. वकील असताना आणि आता निवृत्त होऊनही ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात. आजपर्यंत चंद्रू यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला आहे. चंद्रू एक वकिल बनले आणि नंतर मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. न्यायाधीश चंद्रू हे भारतातील प्रख्यात न्यायाधीशांपैकी एक आहेत आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. न्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक निकालांसह सुमारे ९६,००० प्रकरणे निकाली काढली आहेत. दिवसाला ते तब्बल ७५ केस ऐकत असत. काही ऐतिहासिक निर्णयांमध्ये स्मशानभूमीच्या उपलब्धतेबाबत दिलेला निर्णय महत्वाचा ठरला. स्मशानभूमी सर्वांसाठी खुली करावी, मग ती व्यक्ती कोणत्याही जातीच्या असो, त्यात सर्वांना प्रवेश मिळावा असा त्यांनी एका प्रकरणात निकाल दिला होता.

अनेकदा चित्रपटातील व्यक्ती, राजकारणी, खेळाडू आणि समाजसेवक हे लोकांच्या जीवनातील प्रेरणास्थान असतात, पण न्यायव्यवस्थेतून कोणीही प्रेरणास्थान बनू शकेल, हा विचार नवीन होता. सूर्याच्या या चित्रपटानंतर न्यायमूर्ती के. चंद्रू यांना आता भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात लोक ओळखू लागतील. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. तुम्ही पाहिलात का हा सिनेमा? तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required