computer

एकेकाळी दुर्लक्षित पण आता धडाडीने पुढे येणारा उस्मानाबाद जिल्हा !

संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत असलेल्या भवानी मातेचे मंदिर ज्या जिल्ह्यात आहे त्या उस्मानाबाद जिल्ह्याची माहिती आज तुम्ही वाचणार आहात. तुळजाभवानीचे हे मंदिर १२व्या शतकापासून अस्तित्वात आहे. अष्टभुजा आणि सिंहावर आरूढ असलेली आई भवानी माता राज्यातील कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास बघायचा म्हटलं या ठिकाणी मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट आणि यादव या घराण्यांचे राज्य होते. नंतर इथे राज्य केले ते बहामनी आणि विजापूरच्या राजांनी! पुढील काळात इथे निजामाचे अधिपत्य होते. १९४८ साली संपूर्ण मराठवाडा मुक्त झाला तसे उस्मानाबादही मुक्त झाले.

उस्मानाबाद शहराच्या जवळच धाराशिव नावाच्या जैन लेण्या आहेत. या जिल्ह्याचे पूर्वीचे धाराशिव हे नाव यावरूनच पडले असे सांगण्यात येते. तर उस्मानाबाद हे नाव हैदराबादचा सातवा नवाब उस्मान अली खान याच्या नावावरून पडले आहे.

जिल्ह्याचा मोठा भूभाग हा बालाघाट या डोंगराने व्यापलेला आहे. जंगलसंपत्ती ही तुळजापूर, कळंब तालुक्यात थोडया प्रमाणात आढळते. तर खनिजसंपत्ती ही चुनखडी, माती, वाळू, दगड अशी सापडते. समुद्रसपाटीपासून पठारी प्रदेश ६०९ मीटर उंच आहे.

मांजरा आणि तेरणा यांना जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचा दर्जा आहे. मांजरा नदी या जिल्ह्यातून १०६ किलोमीटरचा प्रवास करते. मन्याड, तावरजा, सीना, बाणगंगा या इतर नद्या जिल्ह्यात आहेत. विहिरी आणि तलाव इथे बऱ्यापैकी प्रमाणात आढळून येतात. विशेष म्हणजे चांदणी, हरणी या नद्यांवर पाटबंधारे प्रकल्प सुरू आहेत. उस्मानाबाद शहराच्या मध्यातून भोगावती नदी वाहते.

पिकांचे म्हणायचे झाल्यास इतर महाराष्ट्राप्रमाणे मिश्र पिके इथेही पाहायला मिळतात. ज्वारी, कापूस, ऊस, भुईमूग, भात, मका, बाजरी, तंबाखूची आणि मसाल्याची पिके, फळे, भाजीपाला अशी पिके इथे घेतली जातात.

घरगुती उद्योगधंदे उस्मानाबाद जिल्ह्यात बऱ्यापैकी जम बसवून आहेत. हातमाग, लोकरीच्या वस्तू विणणे, मातीची भांडी बनवणे, साबण, बांबूकाम असे उद्योग, तर बिदरी येथे हस्तकला व्यवसाय अस्तित्वात आहे. येथील गुलाबजाम प्रसिद्ध आहे. उस्मानाबादची शेळी महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे. जिल्ह्याला इतर शहरांशी जोडण्यासाठी रेल्वेसेवा आणि बससेवेचे साधन आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ आणि २११ हे जातात.

पर्यटनाच्या दृष्टीने इथे असणारे किल्ले महत्वाचे आहेत. हे किल्ले महाराष्ट्रासाठी महत्वाचा वारसा आहेत. परांडा किल्ला हा लहान असला तरी वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. खूप कमी ठिकाणी दिसणारी दुहेरी तटबंदी इथे दिसते. भुईकोट किल्ल्यांमधील देखणा असा किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे.

नळदुर्ग हा अजून एक किल्ला जिल्ह्यात आहे. याठिकाणी नदी मादी नावाचा धबधबा प्रसिद्ध आहे. तसेच तिथे असणारा जलमहाल हा देखील वास्तुशास्त्राचा इतक्या जुन्या काळातील सुंदर नमुना समजला जातो. हा किल्ला बोरी नदीला नैसर्गिक खंदक समजून त्याप्रमाणे बांधला आहे. बोरी नदीवरील धरण आणि महाल हा बेसॉल्ट दगडांनी बांधला आहे.

ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास जरूर शेअर करा.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required