computer

टायटॅनिकवरचा वाचलेला वरिष्ठ अधिकारी - जे. ब्रूस इस्मे. वाचा त्यांच्या आयुष्यातल्या वादग्रस्त-रोचक ११ गोष्टी!!

टायटॅनिक जहाजाबद्दल लोकांच्या मनातील कुतूहल कधीच कमी होऊ शकत नाही. जय्यत तयारीनिशी आपल्या पहिल्याच प्रवासाला निघालेल्या या जहाजाचा असा अपघात होण्याची घटना ही खरोखरच दुर्दैवी आहे. या जहाजाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरीच माहिती वाचली किंवा ऐकली असेल. या अपघताचे खापर हे फक्त एकाच व्यक्तीवर फोडले गेले ती व्यक्ति म्हणजे, जे. ब्रूस इस्मे.

कोण होता हा जे. ब्रूस इस्मे आणि त्याला शेवटपर्यंत या अपघातासाठी कसे जबाबदार धरण्यात आले, याबरोबरच इस्मे बद्दलच्या आणखी काही गोष्टी आज आम्ही या लेखातून घेऊन आलो आहोत.

टायटॅनिकचा अपघात होण्या आधीपर्यंत इस्मेचे आयुष्य आणि अपघात झाल्यानंतरचे इस्मेचे आयुष्य यात बरीच मोठी तफावत आहे. या एका घटनेने इस्मेच्या आयुष्याला पूर्णत: वेगळी कलाटणी दिली. कोणी त्यांना पळपुटा म्हटले तर कोणी क्रूर... आयुष्यभर त्यांना पत्रकारांचा आणि प्रसारमाध्यमांचा रोष सहन करावा लागला. खरं तर इस्मे याचं आयुष्य अशाच चमत्कारिक आणि विरोधाभासी घटनांनी भरलेलं होतं. या लेखातून त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

. वडिलांकडून वारसाहक्काने मिळालेला व्यवसाय
इस्मे यांच्या वडिलांनी १८६८ साली दिवाळखोरीत निघालेली व्हाईट स्टार लाईन ही कंपनी विकत घेतली. अटलांटिक समुद्रात सफर घडवून आणणाऱ्या महत्वाच्या कंपनीपैकी ही एक. दिवाळखोरीत निघालेली ही कंपनी विकत घेऊन सिनियर इस्मेंनी तिला समुद्राची राणी बनवले. अवघ्या काही वर्षांच्या कालावधीत या कंपनीने चांगली प्रगती तर केलीच आणि समुद्री सफरीत स्वतःचा वेगळा दबदबा निर्माण केला. १८९९ साली सिनियर इस्मे यांचे निधन झाले आणि जे. ब्रूस इस्मे यांनी व्हाईटस्टार लाईनच्या चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर१९०२ मध्ये जे. पी. मॉर्गन यांनी ही कंपनी विकत घेतली. त्यानंतरही चेअरमनपदाची सूत्रे इस्मे यांच्याकडेच राहिली.

२. दोघा भावाभावांनी सख्ख्या बहिणींशी लग्न केले
इस्मे यांनी न्यूयॉर्कमधील एका प्रथितयश कुटुंबातील मुलीशी १८८८ साली विवाह केला. त्यानंतर बारा वर्षांनी त्यांच्या सर्वात धाकट्या भावाने सी. बॉवर इस्मे यांनी तिच्याच धाकट्या बहिणीशी विवाह केला. दोघी बहिणींनी स्वप्नात देखील जावा-जावा होण्याचा विचार केला नसेल.

३. राजकीय वादाच्या भोवऱ्यात
१८८९ साली इस्मे एका राजकीय वादात अडकले. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या प्रथितयश दैनिकाने त्यांच्याबद्दल अशी अफवा पसरवली की त्यांनी अमेरिकन कॉंग्रेसच्या सदस्यांचा अपमान केला आहे. जे. ब्रूस यांनी अमेरिकन कॉंग्रेसमधील सदस्यांपेक्षा ब्रिटीश राजकारणी उत्तम असल्याचे विधान करून अमेरिकन कॉंग्रेसच्या सदस्यांचा अपमान केल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात हे विधान जे. इस्मे यांनी केले नसून त्यांच्या वडिलांनी केल्याचा खुलासा नंतर करण्यात आला. या एका कारणावरून अमेरिकन पत्रकारांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.

४. भरमसाठ लाइफबोट्समुले टायटॅनिक जहाज खूपच विचित्र दिसेल म्हणून त्यांनी त्यावरील लाइफबोट्स कमी केले.
टायटॅनिकचा अपघात झाला तेव्हा लाइफबोट्सच्या अपुऱ्या संख्येमुळे सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात अपयश आल्याचे म्हटले जाते. टायटॅनिकवरील लाइफबोट्सची संख्या कमी करण्याचा निर्णय हा जे. इस्मे यांचा होता आणि म्हणून या दुर्दैवी घटनेत जे जीव विनाकारण मृत पावले त्यांच्यामागे इस्मे यांचा हाच निर्णय कारणीभूत असल्याचे मानले जाते. या कारणाने नेहमीच त्यांच्यावर या अपघातातील जीवितहानीचे खापर फोडण्यात आले.
लाइफबोट्स ठेवण्यासाठी जास्त जागा वापरण्यापेक्षा जहाजावरील डायनिंग रूम अधिक प्रशस्त करण्याचा निर्णय इस्मे यांनी घेतला. त्यांच्या कल्पनेनुसार जहाजावरील डायनिंग रूम ही अडेल्फी थिएटर रेस्टॉरंटसारखी हवी होती आणि त्यांनी ती तशी करवून घेतली. ज्यामुळे लाइफबोट्स ठेवण्यासाठी जागा अपुरी पडू लागली. जहाजाच्या प्रवासी क्षमतेनुसार त्यावर ४८ लाइफबोट्स आवश्यक असल्याचे डिझायनरने सांगूनही इस्मे यांनीच जहाजावर अवघ्या २० लाइफबोट्स ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी जर जहाजावर पुरेशा लाइफबोट्स असत्या तर नक्कीच यातील मृत व्यक्तींचा आकडा थोडा कमी झाला असता.

५. त्यांनीच कॅप्टनला जहाज वेगाने चालवण्याची सुचना दिली होती.
जहाज बुडाल्यानंतर इस्मे यांना दोषी ठरवणारी अनेक कारणे समोर आली त्यात हेही एक होते की, जहाज वेगाने चालवण्याची सूचना इस्मे यांचीच होती. जहाजावरील एका प्रवाशाने अमेरिकन चौकशी समितीला साक्ष देताना असा दावा केला होता की, त्याने इस्मे यांना कॅप्टनला वेगाने जहाज चालवण्याच्या सूचना देताना ऐकले होते. ज्या दिवशी जहाज बुडाले त्याच्या आदल्याच दिवशी इस्मे कॅप्टनला म्हणाले होते की, आपण ऑलिम्पिकला (अटलांटिक सागरातून प्रवास करणारे आणखी एक जहाज) मागे टाकून मंगळवारीच न्यूयॉर्कला पोहोचू. यावर आपली साक्ष देताना इस्मे म्हणाले होते की, मी कॅप्टनला अशा कोणत्याच सूचना दिल्या नव्हत्या. ठरलेल्या वेळेआधी इप्सित ठिकाणी पोहोचण्याची घाई करण्यात कोणताच शहाणपणा नव्हता. त्यामुळे मी हे करणे शक्यच नाही. असे स्पष्टीकरण त्यांनी चौकशी समितीला दिले होते.

६. प्रवासादरम्यान इस्मे प्रेमात पडल्याची देखील शक्यता होती
जहाजाच्या अपघाती घटनेनंतर या अपघातातून बचावलेल्या एका महिलेशी इस्मे यांचा नेहमीच पत्रव्यवहार होत असे. त्या महिलेचे नाव होते मारियन थायर. मारियनने या अपघातात आपला पती गमवला होता तर तिचा १७ वर्षांचा मुलगा एका लाइफबोटला कसाबसा लटकून बचावला होता.
तिच्याशी इस्मे यांचा अनेकदा पत्रव्यवहार होत असे. या पत्रात ते नेहमी आपण निर्दोष असल्याचा दावा करत. एका पत्रात तर त्यांनी लिहिले होते की, "हा अपघात झाला नसता तर आपल्या मैत्रीला देखील एक सुंदर वळण मिळाले असते. मला वाटते होते की, तू माझ्याकडे आकर्षित झाली होतीस.” त्यांच्या या विचित्र विधानानंतर मरीयनने त्यांच्याशी संवाद थांबवला. पण त्यांना सतत इतरांसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची सवयच जडली होती.

७. स्त्रियांना आणि मुलांना जहाजावरून बाहेर पाडण्यासाठी त्यांनी मदत केली होती.
जहाज बुडणार असल्याची भनक लागताच इस्मे आहे त्या कपड्यानिशी आपल्या लाईफबोटमध्ये चढले. पण तत्पूर्वी त्यांनी काही स्त्रियांना आणि मुलांना आपल्या लाइफबोटमध्ये घेतले होते असा त्यांचा दावा होता. आपण सर्वाना मृत्यूच्या दाढेत ढकलून सुखरूप निसटल्याचा आरोप त्यांना अजिबात मान्य नव्हता. ते सतत या आरोपातून स्वतःचा बचाव करण्याचा पवित्रा घेत. त्यांनी जर लाइफबोटमध्ये बसण्याचा निर्णय घेतला नसता तर तेही मृतांच्या यादीत समाविष्ट झाले असते. यापलीकडे जहाजावर राहून ते काहीही साध्य करू शकले नसते असे स्पष्टीकरण ब्रिटिश चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी दिले होते.

८. इस्मे यांचा स्वतःचा एक टेलिग्राम कोड होता – YAMSI.
जेव्हा केव्हा इस्मे एखादा व्यावसायिक संदेश पाठवत तेव्हा त्याखाली YAMSI अशी सही केलेली असे. याचा अर्थ होता, त्यांच्यावतीने हा संदेश त्यांच्या कर्मचाऱ्याने पाठवला आहे. पण जेव्हा टायटॅनिक बुडणार असल्याची बातमी लागली आणि ते आपल्या लाइफबोटमध्ये बसले तेव्हा त्यांनी न्यूयॉर्कच्या व्हाईट स्टार ऑफिसला या अपघाताची सूचना देणारा संदेश पाठवला तेव्हा मात्र त्यासोबत ISMAY अशीच सही केली. याचा अर्थ होता हा संदेश थेट इस्मे यांच्याकडून आला आहे.

९. बचावल्यानंतर त्यांच्यावर अंमलीपदार्थांचा अतिरिक्त मारा करण्यात आला.
या अपघातातून बचावल्यानंतर इस्मे यांना अजिबात झोप लागत नव्हती. झोपेची औषधे देऊनही त्यांना क्षणभर चैन पडत नव्हते. स्वप्नात एखादे भूत पाहिल्यावर दचकून उठावे त्याप्रमाणे ते सतत दचकून उठत असत. भान हरपल्याप्रमाणे, “मी सुद्धा जहाजासोबतच का बुडालो नाही”, असे बरळत असत. कदाचित त्यांना झाल्या प्रकाराचा धक्का बसला असावा किंवा त्यांनी अतिरिक्त अंमलीपदार्थांचा वापर केल्याचा हा परिणाम असावा असे त्यांच्या डॉक्टरांचे मत होते. या अपघातानंतर इस्मे २५ वर्ष जगले पण त्यांचे हे जीवन म्हणजे जिंवतपणी मरण अनुभवण्याचाच प्रकार होता.

१०. वृत्तपत्रांनी त्यांच्यावर नेहमीच जहरी टीका केली
इस्मे यांना वृत्तपत्रातून कायमच टीकेचे धनी व्हावे लागले. भित्रा, पळपुटा, नामर्द अशा विशेषणांनी नेहमीच त्यांचा पिच्छा पुरवला. वृत्तपत्रांनी नेहमीच त्यांचा तिरस्कार केला. अगदी मरेपर्यंत. याचा त्यांच्या मानसिकतेवर खूपच गंभीर परिणाम झाला. वरवर ते याबद्दल कितीही बेफिकीर असल्याचे दाखवत असले तरी आतल्या आत त्यांना याचा प्रचंड पश्चाताप आणि मनस्ताप होत असे.

११. इस्मे किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनी पुन्हा कधीच या घटनेबद्दल ब्र शब्दही उच्चारला नाही
या घटनेने इस्मे यांच्या मानसिकतेवर असा काही परिणाम झाला होता की, त्यांनी जहाजाचे नावच काय जहाज पाहणेही बंद केले होते. त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीला जहाजाविषयी बोलण्याची मनाई होती. विशेषत: त्यांच्यासमोर या घटनेचा उल्लेख होणार नाही, याची त्यांची पत्नी कटाक्षाने काळजी घेत असे. या घटनेनंतर इस्मे यांच्या व्यावसायिक जीवनालाही घरघर लागली. कोणेकाळी समुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी ते आसुसलेले असत. पण या घटनेनंतर त्यांनी कधीच समुद्र प्रवास केला नाही. ते कधी घराबाहेरही पडले नाहीत. या घटनेने त्यांना पुरते एकलकोंडे करून टाकले.

१९३७ मध्ये लंडन येथील त्यांच्या काऊंटी गॅलवे या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांचे हे निवासस्थानही रहदारीपासून दूरच होते. इस्मे यांना नेहमी असे वाटत होते की, देवाची इच्छा म्हणून ते या अपघातातून बचावले. पण त्यांचे हे म्हणणे वृत्तपत्रांनी कधीच मान्य केले नाही.

‘देव तारी त्याला कोण मारी’ म्हणतात, पण देवाने तारूनही इस्मे जगू शकले नाहीत हेच खरे.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required