computer

एकेकाळी या दिवशी: २ ऑगस्ट १९९०! इराक-कुवेत युद्धाची सुरुवात! सद्दामने या युद्धात ६०० तेलविहिरी जाळल्या!!

सद्दाम हुसेन हा इराणचा जगप्रसिद्ध हुकूमशाह कुवेत ताब्यात घेण्यासाठी आतुर होता. अशात त्याला एकेदिवशी अमेरिकन राजदूत एप्रिल ग्लिसपी म्हटले की इराक आणि कुवेत सीमाविवादासोबत आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. यातून सद्दाम हुसेनला चेव चढला. अमेरिका विरोधात नसेल तर कुवेतला आपण सहजासहजी ताब्यात घेऊ असा विचार करून त्यांनी थेट हल्ला केला.

सद्दाम हुसेनला दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने दणका देत इराकविरुद्ध ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म सुरू केले. यात तब्बल ३८ देश इराकविरुद्ध एकवटले होते. पण सद्दाम हुसेन पण काही मागे हटणारा नव्हता. त्याने आठवड्याच्या आत कुवेत ताब्यात घेतले. आता अमेरिका जबरदस्त चिडली होती. यावेळी अमेरिकेने २८ देशांचे तब्बल ६,२५,००० सैन्य युद्धात उतरवले. 

यावेळी अरबो-खरबो रुपयांचे फंडिंग होत होते. युद्ध तुफान चालले आणि जवळपास ८ महिन्यात शेवटी इराकला गुडघे टेकावे लागले. या युद्धात १ लाखांपेक्षा जास्त इराकी सैनिकांचा मृत्यु झाला होता. इराकला जबरदस्त झटका या युद्धात बसला होता.

एकीकडे सद्दाम हुसेन विरुद्ध इतर सर्व असे तुफान घमासान सुरू असताना, आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांचा मात्र जीव मुठीत होता. आपले काय होणार असा प्रश्न त्यांना यावेळी पडला होता. भारताचे आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या नेहमीच मोठी राहिली आहे.

याच युद्धातून भारतीयांना सहीसलामत परत आणण्याच्या घटनेवर आधारित अक्षयकुमारचा एयरलिफ्ट हा सिनेमा तयार करण्यात आला होता. ऑगस्ट ते ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये तब्बल पावणेदोन लाख भारतीयांना भारतात परत आणले गेले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही घटना नोंदवली गेली. इतका मोठा पराक्रम आपण त्याकाळी देश म्हणून केला होता. 

दुसरीकडे ७ महिने प्रयत्न करूनही सद्दाम हुसेन बॅकफूटवरच होता. त्याला काय आपला निभाव लागेल असे वाटत नव्हते. आता त्याला माघार घेण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय दिसत नव्हता. यावेळी त्याने कुवेतमध्ये तब्बल ६०० तेलविहीरींना आग लावली. आखाती देशांची पूर्ण अर्थव्यवस्था ही या तेलविहिरींवर चालते. 

यामुळे भयंकर आग लागली होती. आजूबाजूचा पूर्ण परिसर यामुळे काळवंडला होता. जिकडेतिकडे फक्त काळे धूर दिसत होते. ही आग विझवण्यासाठी एकावेळी १०,००० लोक दहा महिने कामावर होते, तेव्हा कुठे ही आग आटोक्यात आली होती. यात भारतावर झालेला अजून एक परिणाम म्हणजे काही काळाने भारताच्या कश्मीरमध्ये चक्क काळा बर्फ पडला होता. यावरून तुम्ही ही आग किती जबरदस्त असेल याचा अंदाज लावू शकता.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required