आजच्याच दिवशी सचिनने वनडेत चौकार अन् षटकारांचा पाऊस पाडत केली नव्या पर्वाची सुरुवात
वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अर्धशतक आणि शतक पूर्ण करणं इतकं कठीण काम नाहीये. मात्र दुहेरी शतक झळकावणं खूप कठीण काम आहे. टी-२० क्रिकेटची क्रेझ वाढल्यापासून आता वनडे क्रिकेटमध्येही दुहेरी शतक झळकावणं सोपं झालं आहे. मात्र सचिनने जेव्हा पहिल्यांदा हा पराक्रम करून दाखवला होता. त्यावेळी कोणी या आकड्यापर्यंत पोहचलं देखील नव्हतं. सचिनच्या या ऐतिहासिक खेळीला आज १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज आहेत ज्यांनी दुहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये अधिकांश भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. मात्र सुरुवात ही सचिन तेंडुलकरनेच केली होती. डेल स्टेन, पार्नेल आणि जॅक कॅलिस सारख्या दिग्गज गोलंदाजांचा झोड घेत त्याने २५ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले होते.
या ऐतिहासिक खेळीसह सचिनने अनेक मोठ मोठे विक्रम मोडून काढले होते. त्यावेळी ही वनडेतील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी होती. त्याने या खेळीसह सईद अनवरचा सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम मोडून काढला होता. सचिनने नाबाद २०० धावांची खेळी केली होती. तर सईद अनवरने १९४ धावांची खेळी केली होती.
ऐतिहासिक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने मिळवला विजय ..
२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द झालेल्या सामन्यात सचिनने या सामन्यात २०० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी बाद ४०१ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४२.५ षटकात अवघ्या २४७ धावांवर संपुष्टात आणला होता. हा सामना भारतीय संघाने १५३ धावांनी आपल्या नावावर केला होता.
सचिन तेंडुलकरनंतर वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि ईशान किशनने देखील दुहेरी शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. मात्र सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे.