Test cricket history: टीम इंडियाच्या पदार्पणापूर्वी किती संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे? जाणून घ्या...
कसोटी क्रिकेटची सुरुवात सुमारे १४६ वर्षांपूर्वी झाली होती. हा ऐतिहासिक सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये १८७७ रोजी मेलबर्नच्या मैदानावर पार पडला होता. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या १२ वर्षांपर्यंत हे दोन संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळायचे. यानंतर हळूहळू नवीन संघ सामील होण्याची प्रक्रिया सुरू झाली.
साल १८८९ रोजी दक्षिण आफ्रिका संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा पदार्पणाचा सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. ३९ वर्षानंतर १९२८ साली वेस्टइंडिज संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तर २ वर्षानंतर न्यूझीलंड संघाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर १९३२ मध्ये भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त झाला. भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सहावा संघ ठरला.
हा तो काळ होता जेव्हा क्रिकेट म्हणजे फक्त कसोटी क्रिकेट होते. क्रिकेटचे जनक म्हणवल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याने सर्वच देशांनी कसोटी पदार्पण केले. १८७७ पासून सुरू झालेल्या या क्रिकेटच्या प्रवासात १९३२ पर्यंत म्हणजेच संपूर्ण ५५ वर्षे एकूण ६ देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला होता. नंतर त्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश सारखे संघ सामील झाले.
भारतीय संघाने आपला पहिला सामना खेळला तोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण २१८ कसोटी सामने खेळले गेले होते. त्यापैकी सर्वाधिक १९२ कसोटी सामने इंग्लंडने खेळले होते. ऑस्ट्रेलियाचा संघही १४८ सामने खेळले होते. या ५५ वर्षांच्या कालावधीत दक्षिण आफ्रिका संघाने ७५, वेस्ट इंडिज संघाने १२ आणि न्यूझीलंड संघाने ९ कसोटी सामने खेळले होते. त्या काळात इंग्लंड संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ होता.
तर पाकिस्तान संघाने १९५२ मध्ये भारतीय संघाविरूध्द खेळताना पदार्पण केले होते. तर ३० वर्षानंतर म्हणजेच १९८२ रोजी श्रीलंका संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. तर बांगलादेश संघाला २००० साली आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली.
भारताचा पहिला वनडे सामना कोणत्या संघाविरुद्ध पार पडला होता? कमेंट करून नक्की कळवा.