कोण होते इंग्लंड आणि भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे जगातील एकमेव क्रिकेटपटू? वाचा..
क्रिकेट विश्वात तुम्ही अनेक क्रिकेटपटूंना दोन देशांकडून खेळताना पाहिलं असेल. या यादीत अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. मात्र भारतीय संघातील कुठल्याही खेळाडूने इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? बोभाटाच्या या लेखात आज आम्ही तुम्हाला अशाच एका दिग्गज खेळाडूबद्दल सांगणार आहोत,ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
१६ मार्च १९१० रोजी पंजाबमधील शाही पतौडी खंडार येथे जन्मलेले इफ्तिखार अली खान पतौडी हे भारताचे माजी कर्णधार टायगर पतौडी यांचे वडील होते. १९३२ साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या प्रतिष्ठित ॲशेस मालिकेत त्यांनी इंग्लंडकडून खेळताना पहिल्यांदाच मैदानात पाऊल ठेवले होते.
पतौडी यांनी पदार्पणातच आपला दमखम दाखवत, जोरदार शतक झळकावले. सिडनीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या पदार्पणाच्या सामन्यात इफ्तिखार अली खान पतौडी यांनी ३८० चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्यांनी ६ चौकार मारले होते. इफ्तिखारन अली खान पतौडी यांना इंग्लंडकडून ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे हे तिन्ही सामने ॲशेस मालिकेतील होते.
भारतीय कसोटी संघाचे तिसरे कर्णधार..
इंग्लंडनंतर इफ्तिखार पतौडी भारतात आले आणि त्यांनी १९३६ भारतीय संघाची धुरा हाती घेतली. ते सीके नायडू नंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारे तिसरे कर्णधार ठरले होते. त्यांना १ वर्ष भारतीय कसोटी संघाचे कर्णधार होते. यादरम्यान त्यांना ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
त्यांच्या कर्णधारपदाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ३ पैकी २ कसोटी सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर १ सामना हा अनिर्णीत राहिला होता. तसेच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत.