computer

लंडनच्या लिलावात रेकॉर्डब्रेक किंमतीत विकली गेली टिपू सुलतानाची तलवार !

जगभर नेहमीच ऐतिहासिक वस्तूंचा लिलाव सुरू असतो.अनेक हौशी आणि अतीश्रीमंत लोकं कोट्यवधी रुपये मोजून या वस्तू घेतात.त्यांच्या दृष्टीने हा एक गुंतवणूकीचा मार्ग असतो. आजवर भारतातील देखील अनेक वस्तूंचा लिलाव पार पडला आहे. या वस्तूंना कोट्यवधींचा भाव मिळाला आहे. मात्र नुकत्याच पार पडलेल्या एका लिलावात मात्र आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. टिपू सुलतान हा १७ व्या शतकात म्हैसूर या राज्याचा राजा होऊन गेला. या राजाबद्दल अनेक गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या-वाचल्या असतील. या राजाची सुखेला नावाची तलवार इंग्लंडमध्ये झालेल्या लिलावात तब्बल १४० कोटींना विकली गेली आहे.

बोनहम्स इस्लामिक एंड इंडियन आर्ट यांच्या वतीने हा लिलाव आयोजित करण्यात आला होता. १७८२ ते १७९९ या काळात टिपू सुलतानचे म्हैसूर येथे राज्य होते. या काळात इंग्रजांसोबत त्यांच्या अनेक लढाया झाल्या. टिपू सुलतानच्या खोलीत ही तलवार सापडली होती. या तलवारीला इस्ट इंडिया कंपनीच्या सेनेचे मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड याला सोपविण्यात आली होती.

टिपू सुलतानच्या इतर वस्तुंपेक्षा या तलवारीचे विशेष महत्व सांगण्यात येते. ही सुखेला सोन्याचा मुलामा लावलेली स्टीलची तलवार आहे. या तलवारीची घडण देखील आकर्षकरीतीने करण्यात आली होती. १५ ते २० कोटींमध्ये ही तलवार विकली जाईल अशी अपेक्षा असताना तब्बल १४० कोटी किंमत मिळाल्याने जगभर या तलवारीकडे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.१६ व्या शतकात मुघल तलवार कारागिरांकडून ही तलवार तयार करण्यात आली होती. जर्मन ब्लेड मॉडेलची ही तलवार आहे. यावर सोन्याची कॅलिग्राफी देखील करण्यात आली आहे. त्यावेळच्या सतत लढाईच्या परिस्थितीमुळे टिपू सुलतान आपल्या शेजारी ही तलवार ठेऊन झोपत असे.

या लिलावाचे ज्यांनी आयोजन केले, त्यांनी या तलवारीची विक्री ही अपेक्षेपेक्षा अनेक पटीने झाली आहे, असे सांगितले आहे. या तलवारीने आजवरचे लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले असून आजवर विकली गेलेली सर्वात महाग भारतीय वस्तू ठरण्याचा विक्रम देखील या तलवारीने केला आहे.


गेले २०० वर्ष इंग्रजांकडे असलेली ही तलवार आता भरभक्कम किमतीत विकली गेली आहे. रेकॉर्डब्रेक किंमत मिळाल्याने या तलवारीची नाव जगासमोर आले आहे. भारतातील वस्तूंचे विशेष महत्व अजूनही जगभर टिकून  आहे, हे देखील या निमित्ताने समोर आले आहे


उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required