computer

भूतदया -माणुसकी हरवत चालली आहे असं तुम्हालाही वाटतं का? मग नक्की वाचा ही कहाणी!

आजकाल आपल्याला एक तक्रार कायमच ऐकायला मिळते की माणुसकी संपत चाललीये! कलियुग आलंय आणि आता सगळं कसं संपुष्टात येणार आहे अशाही मनोरंजक गप्पा ऐकायला मिळतात! तुम्हाला देखील असं मनापासून वाटत असेल की मानवता खरंच संपत चालली तर आज आम्ही सांगत असणारी कहाणी तुम्ही वाचायलाच हवी, ही कहाणी वाचून तुमचा मानवतेवरील विश्वास पुन्हा निर्माण होईल हे नक्की!आफ्रिकेतल्या केनिया या देशातील ही घटना, केनिया मधील बॅरिंगो नावाच्या सरोवराभोवती पूर आल्याने तेथील बेटावर ९ जिराफ अडकून पडलेत!आणि लवकरात लवकर त्यांची सुटका केली नाही तर त्यांच्या जीवाला धोका होता! सुरुवातीला काही काळ तिथल्या निसर्गप्रेमींनी जिराफांना अन्न उपलब्ध करून दिले; पण हा तात्पुरता पर्याय होता.त्या जिराफांना तिथून सोडवणे गरजेचे होते. इतकेच नाही तर हे अडकून पडलेले जिराफ Rothschild या  लुप्त होत चाललेल्या प्रजातींचे होते.संपूर्ण आफ्रिका खंडात या प्रजातीचे सुमारे ३००० तर केनिया मध्ये सुमारे ८०० जिराफ उरले आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रजातीला वाचवायचे असेल तर प्रत्येक जिराफाला वाचवणे अतिशय महत्वाचे झाले होते.
       

आता या जिराफांना वाचवायचं म्हणजे त्यांना या ठिकाणावरून सुरक्षित ठिकाणी पोहचवणे गरजेचे होते पण खरी अडचण होती ती आकाराने इतक्या मोठ्या प्राण्याला न्यायचे कसे? अशी कुठली सुविधा उपलब्ध नव्हती तर अशी सुविधा तयार करावी लागणार होती. म्हणून मग या बचावकार्यात निसर्ग व प्राणी प्रेमी स्थानिक लोक व काही संस्था एकत्रित येऊन ही जबाबदारी उचलली, त्यांनी सर्वप्रथम जिराफांना नेण्यासाधी साधन बनवायचे ठरवले व त्यासाठी एक मोठ्ठी नौका-तराफा- बनवायचे ठरवले, या नौकेसाठी त्यांनी ६० रिकामे ड्रम्स वापरून त्यांच्यावर स्टील च्या मदतीने सुरक्षित अशी बांधणी केली व नौका चालण्यासाठी त्याला मोटार बसवली,अशाप्रकारे ‘बार्ज’ या संकल्पनेची एक नौका तयार झाली व या लोकांनी या नौकेला “GiRaft” असे सूचक नावही दिले. आता जिराफ नेण्याचे साधन तर तयार झाले पण जिराफ त्या नौकेत बसवून खरोखरी वाहून न्यायचे कसे हा प्रश्न आव्हान म्हणून उभा होताच.

जिराफ हा आकाराने खूप मोठा प्राणी आहे त्यामुळे त्याला नौकेच्या आतमध्ये आणावं कसं हा पेच सर्वांना पडला होता कारण आकाराने लहान असणाऱ्या प्राण्यांना आपण जाळ्यात अडकवून आणू शकतो पण जिराफाचा आकार लक्षात घेता ते काही शक्य नव्हते म्हणून अगोदर त्या लोकांनी जिराफाला आंबे दाखवून नौकेत आणण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही; म्हणून त्यांनी शक्य असलेला एकमेव पर्याय निवडण्याचं ठरवलं ते म्हणजे बेशुद्ध करणाऱ्या औषधी डार्ट चा वापर करणे. हे औषधी डार्ट मारून जिराफाला अगोदर बेशुद्ध करण्यात आले आणि त्याला दोरीने बांधण्यात आले, परंतु यातही एक मोठी अडचण ही होती की जिराफांना माहीत नाही की त्यांची मदत केली जातेय त्यांच्या दृष्टीने तर त्यांची शिकार केली जातेय असेच त्यांना वाटणार ज्यामुळे जिराफ प्रतिकार करून लोकांना अडथळा आणू शकले असते, म्हणून मग यावर उपाय म्हणून कार्यकर्त्यांनी जिराफाचे डोळे झाकण्यासाठी त्याचे पूर्ण तोंड बारदानाने झाकून टाकले व सोबतच कानात देखील सॉक्स कोंबण्यात आले जेणेकरून जिराफाला आजूबाजूचे काहीही दिसणार नाही आणि ऐकूही येणार नाही.अशाप्रकारे पहिल्या जिराफाला त्यांनी नौकेत चालत आणले व पुढे सुमारे चार मैल नौकेत प्रवास करून एका मोठ्या अभयारण्यात आणून सोडले आणि पहिल्या जिराफाला सुरक्षित व यशस्वीरीत्या वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

     

पण अजून आठ जिराफांना वाचवायचे होते. दुसऱ्या जिराफाला देखील अशाचप्रकारे वाचवण्यात आले. परंतु तिसऱ्या जिराफाच्या वेळेस कार्यकर्त्यांनी पुन्हा पहिला प्रयोग करून बघितला व औषधी डार्ट न वापरता त्याला खाण्यासाठी अन्न दाखवून चालवण्यात ट्रेन केले व नौकेत आणले यावेळी ते प्रयत्नात यशस्वी झाले व केवळ अन्नाच्या मदतीने या जिराफाला सुरक्षित अभयारण्यात पोहोचवण्यात आले. 
पुढे देखील कार्यकर्त्यांनी औषधी डार्ट न वापरता प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक जिराफाकडून एकसारखा प्रतिसाद न मिळाल्याने एकूण ९ पैकी ३ जिराफांना अन्नाच्या मदतीने तर ६ जिराफांना औषधी डार्टच्या मदतीने हलवण्यात आले!

डिसेंबर २०२० ला सुरु झालेले हे बचावकार्य अखेर १२ एप्रिल २०२१ ला पूर्ण झाले आणि सर्व ९ जिराफांना सुरक्षित अभयारण्यात हलवण्यात आले, मुक्या प्राण्यांना वाचवण्याचे हे कार्य निश्चितच आपल्याला मानवतावादाचे दर्शन घडवते! या कार्यात ‘Save Giraffes Now’ ‘Northern Rangeland Trust’ ‘Kenya Wildlife Service या संस्थांनी व तसेच स्थानिक प्राणीप्रेमी लोकांनी सांघिक मदत केली.

लेखक : सुमित शेटे 

सबस्क्राईब करा

* indicates required