computer

खेळण्यातले फुगे ते टायरचे उत्पादन, या कंपनीची घौडदौड कोणीही रोखू शकलेले नाही. 

मैं समय बोल रहा हुं | वाक्य कानावर पडताच आज साधारण पन्नाशीत असलेल्यांना एक आठवण नक्की येईल. महाभारत या मालिकेची ही सुरुवातीला छोट्या पडद्यावर फिरणारं एक चाक ! चाक आणि गती यांचा अतूट संबंध आहे. या चाकाचा शोध माणसाला लागला आणि माणसाचे आयुष्य गतिमान झाले.काळानुरूप माणसाच्या, विज्ञानाच्या प्रगतीबरोबर चाकातही अनेक बदल होत गेले. अगदी चाकाच्या शोधापासून ते आताच्या टायरपर्यंत अनेक स्थित्यंतरे झाली. 
साधे टायरचेच उदाहरण घ्या.उपयोग आणि वाहन यानुसार टायरचे स्वरूप बदलत जाते.मात्र टिकाऊपणा हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा निकष! आणि त्यासाठीच प्रसिद्ध असलेली, टायरच्या क्षेत्रात आपल्या कामाने स्वत:चा दबदबा निर्माण करणारी कंपनी म्हणजेच एम आर एफ टायर्स.
एम आर एफ कंपनीची संपूर्ण माहिती 'वाचायलाच हवी' या पठडीतील आहे.म्हणूनच बोभाटाच्या वाचकांसाठी खास ह्या कंपनीची गोष्ट.

तिरुवोट्टीयूर हे तामिळनाडू येथील एक गाव. ह्या परिसराला बंगाल उपसागराच्या किनारपट्टी लाभलेली आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच्या काळात येथे उद्योग विकासाला सुरुवात झाली. तत्कालीन मद्रास आणि आता विस्तारत जाणारी चेन्नई हे अनेक लहान मोठ्या उद्योगांचे माहेरघर आहे. या शहराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे टायर इंडस्ट्रीतील एका ख्यातनाम कंपनीची मुहूर्तमेढ याच ठिकाणी रोवली गेली. ही कंपनी म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही नसून एमआरएफ होती. या कंपनीची गंमतीची गोष्ट अशी, की आज जगभरात एम आर एफ टायर्स म्हणून ख्यातनाम असलेल्या कंपनीची सुरुवात १९४९ मध्ये के एम मॅमेन मॅप्पीलाई यांनी एका शेडमध्ये लहान खेळण्याचे बलून बनवण्याचे युनिट उघडून केली होती.आज एमआरएफ देशांतर्गत बाजारपेठेतली टायरचे उत्पादन करणारी एक प्रमुख कंपनी आहे.७५ व्या वर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना कंपनीने अजून एक इतिहास रचला आहे.

१३ जून या दिवशी दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या कंपनीच्या शेअरने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. असा टप्पा ओलांडणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. हा प्रवास सोपा सरळ निश्चितच नव्हता. 

मद्रास रबर फॅक्टरी या नावाने स्थापित झालेल्या या कंपनीची सुरुवात केली ते एका प्रकाशन संस्थेच्या -मनोरमा पब्लिकेशनच्या- मालकाच्या सर्वात लहान म्हणजे नवव्या मुलाने. त्याचे नाव होते  मे मॅमेन मॅप्पीलाई. बरोबर त्याची पत्नी होती. अगदी सुरुवातीच्या काळात हे दाम्पत्य खेळण्यांचे फुगे तयार करून ते मद्रास मध्ये विकत असे. पुढे १९४९ पर्यंत कंपनी लॅटेक्स कास्टपासून बनवलेली खेळणी, हातमोजे अशा गोष्टींचे उत्पादन करत होती. \आता त्यांनी आपले पहिलेवहिले कार्यालयही ३३४,थंबू चेट्टी स्ट्रीट इथे सुरू केले.

लवकरच १९५२ मध्ये कंपनीने ट्रेड रबरचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली. जुन्या, वापरात असलेल्या टायर्सचे आयुष्य वाढवण्याची क्षमता या रबरात होती. यामुळे अवघ्या पाच वर्षातच कंपनीची भरभराट झाली.या स्थिर वाढीमुळे साहजिकच कंपनीकडे बाजारपेठेचे नेतृत्व आले. १९६१ मध्ये एम आर एफ चे पब्लिक लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले आणि मॅन्स फिल्ड टायर अँड रबर या अमेरिका स्थित कंपनीबरोबर एम आर एफने तंत्रज्ञानाचा सहकार्य करार केला. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत के कामराज यांनी तिरुवोट्टीयूर येथील नवीन पायलट प्लँटमधून पहिले टायर सोडले. कंपनीच्या दृष्टीने हे खरंतर धाडसी पाऊल होते. कारण त्या काळात भारतामध्ये फायर स्टोन आणि डनलॉक यांच्यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बोलबाला होता. पण मॅन्स फिल्ड बरोबरच्या करारामुळे कंपनीची या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याची हिंमत वाढली हे मात्र खरे.

१२ जून १९६३ या दिवशी कारखान्याच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ पंडित नेहरूंनी रबर संशोधन केंद्राची पायाभरणी केली, तेव्हा कंपनीने त्यांचे यजमानपद भूषवले होते. 
नंतर बैरुतमध्ये कार्यालय सुरू केल्यावर कंपनी आंतरराष्ट्रीय झाली. त्यामुळे एम आर एफ खऱ्या अर्थाने या क्षेत्रातील बापमाणूस म्हणता येईल अशी कंपनी ठरली. तेव्हापासूनच भारतीय टायर उत्पादकांचा प्रवास हा प्रगतीच्या दिशेने सुरू झाला. १९७० पर्यंत अमेरिकेसारख्या टायर तंत्रज्ञानाच्या उगमस्थानीच टायर निर्यात करणारी ही पहिली भारतीय कंपनी बनली. आज एमआरएफचे संपूर्ण दक्षिण भारतातच नऊ प्लँट्स आहेत.

आजूबाजूचे वातावरण व्यवसायासाठी चांगले नसताना मॅप्पीलाई यांनी एमआरएफ ची स्थापना केली आणि तिला चांगल्या प्रकारे वाढवले.पाश्चात्य देश आणि जपान ज्या गोष्टी करू शकतात त्या भारत का नाही? हा प्रश्न त्यांना राहून राहून सतावत असे. मार्च १९९८ मध्ये भागधारकांच्या ३७ व्या ए जी एम मध्ये बोलताना ते म्हणाले,
स्पर्धेला सर्वप्रकारे प्रोत्साहन दिले पाहिजे. जर इतर प्रगत देश हे सगळं करू शकतात तर आपण स्वतःसाठी हे सगळं करताना का लाजतो?
मॅप्पीलाई आर्थिक राष्ट्रवादाचेही प्रखर पुरस्कर्ते होते. एमआरएफने फ्रान्सच्या मिशेलीनशी करार केला होता.पण पुढे एकमेकांमधील विश्वास हळूहळू डळमळित व्हायला लागला. एम आर एफ कंपनीला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मिशेलीन सुरुवातीला एम आर एफ बरोबर आली ते तांत्रिक सहकार्याच्या हेतूने. एम आर एफ ला विमानाच्या टायर उत्पादनात उतरण्याची इच्छा होती. त्यावेळी मिशेलिननी त्यात ५१% हिश्शाची मागणी केली. एमआरएफ  त्यासाठी अजिबातच तयार नव्हती. त्यापेक्षा एमआरएफने एक अंकी भाग भांडवल देऊन मिशेलिनला सामावून घेतलं. काळ पुढे  सरकला तशी मिशेलिनच्या महत्त्वाकांक्षेतही वाढ व्हायला लागली. याचे पर्यवसान अर्थातच दोघांच्या नात्यांमधील दुराव्यात झाले. हा दुरावा इतका झाला, की एमआरएफला हा मुद्दा नवी दिल्ली दरबारी न्यावा लागला. अखेरीस मिशेलिनला हार पत्करावी लागली आणि तिने तिचे शेअर्स परत विकून एम आर एफला कायमची सोडचिठ्ठी दिली.

 

आजमितिला एमआरएफ हा टायरच्या देशांतर्गत बाजारपेठेतील कदाचित एकमेव खेळाडू आहे, जो बाहेरच्या सहकार्याशिवायही भल्याभल्यांशी स्पर्धा करू शकतो. तिरुवोट्टीयूरमध्ये जन्मलेल्या या छोट्या कंपनीची ही खरोखरच मोठी कामगिरी म्हणावी लागेल. आज कंपनीच्या व्यवस्थापन मॅप्पीलाई यांची पुढची पिढी- के एम विनू मॅमेन आणि अरुण मॅमेेन ही दोन्ही मुले- सांभाळत आहेत. यात त्यांना के एम यांची राहुल आणि वरूण ही मुले मदत करत आहेत. तिरुवोट्टीयूरची छोटीशी मूळ बलून फर्म आता दक्षिण भारतातील जवळपास तीन अब्ज डॉलर्सची टायर कंपनी बनली आहे. त्यांच्या यशामागचं कारण काय माहिती आहे? अर्थातच उत्तर आहे, कंपनी घेत असलेली कर्मचाऱ्यांची काळजी.

एका माजी कार्यकारिणीच्या सदस्याच्या म्हणण्यानुसार एम आर एफ मधून कोणालाही काढून टाकले जात नाही. आजकालच्या काळात ही दुर्मिळ गोष्ट आहे. याशिवाय कोणत्याही गोष्टीचा निर्णय झटपट घेणे, हित डोळ्यासमोर ठेवून इतर अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष न घालणे, योग्य वेळी योग्य गोष्टी करणे यामुळे कंपनीची वाढ  होण्यास मदत झाली आहे.कंपनीसाठी हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. देशांतर्गत बाजारपेठेतील तीव्र स्पर्धा, संस्थापकांचा दुसरा मुलगा रवी मॅमेन याचं अकाली निधन, शिवाय मिशेलिनकडून कंपनी ताब्यात घेण्याचा धोका अशा संकटांवर यशस्वी मात करत कंपनी काळाच्या कसोटीवर आजही आपले पाय भक्कमपणे होऊन उभी आहे. एका अर्थाने ही 'मेक इन इंडियाची'च कथा म्हणायला हवी. नाही का?


- राधा परांजपे

सबस्क्राईब करा

* indicates required