computer

'लॅब ग्रोन डायमंड'-म्हणजे मानव निर्मित हिरे कसे तयार केले जातात ?

एखाद्याला गिफ्ट द्यायची असेल तर किती मनात किती गोंधळ उडतो ना! त्यातून अमेरिकेच्या अध्यक्षाच्या बायकोला गिफ्ट द्यायची म्हटल्यावर आपल्या पंतप्रधानांना - श्री नरेंद्र मोदींना- किती प्रश्नांना सामोरे जायला लागले असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो.कारणही तसेच गंभीर असते. त्यांनी दिलेली भेटवस्तू 'डिप्लोमॅटीक रिलेशन'च्या तराजूत मोजली जाणार असते. आता बघा : काही दिवसांपूर्वी  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन व त्यांच्या पत्नी जिल बायडन यांना भेट दिली व सोबतच त्यांनी जिल बायडन यांना एक हिरव्या रंगाचा ७.५ कॅरेटचा हिरा गिफ्ट दिला.आता ७.५ कॅरटचा हिर्‍यासाठी काही कोटी रुपये मोजावे लागतात. अशी कोट्यावधी रुपयांची वस्तू देणं पण राजनैतिक शिष्टाचारात योग्य समजलं जात नाही. बरं हिरा दिलाच तर तो आफ्रीकेच्या कोणत्या खाणीतून आलाय आणि त्यासाठी किती रक्तपात झाला आहे याची चर्चा सुरु होते.त्याखेरीज देशाचा नेता जेव्हा भेटवस्तू देतो ती देशाचे प्रतिनिधित्व करणारी असली पाहीके असा शिष्टाचार आहे.म्हणून मोदींनी  जो हिरा दिला तो “लॅब ग्रोन डायमंड (Lab Grown Diamond)” होता. किंमत किती -कुठून आला याची चर्चाच नाही आणि भारत लॅब ग्रोन डायंंदच्या क्षेत्रात किती पुढे गेलाय हे आपोआपच जगाला कळलं.

लॅब ग्रोन डायमंड (Lab Grown Diamond) चा अर्थ समजण्यासाठी अगदी सोपा आहे म्हणजे जसे याचे नाव आहे - लॅब ग्रोन – म्हणजे हा हिरा एका लॅब अर्थातच लॅबोरेटरीमध्ये म्हणजे प्रयोगशाळेत निर्माण  केला जातो! आता लॅब मध्ये तयार केलेल्या हिऱ्याविषयी जाणून घेण्याआधी आपल्याला नैसर्गिक हिरा म्हणजे नॅचरल डायमंड विषयी थोडं जाणून घ्यायला लागेल! नॅचरल डायमंड म्हणजे खाणीत सापडणारे निसर्ग निर्मित हिरे भूगर्भाच्या सुमारे १५० ते ५०० कि.मी. च्या आत बनतात.लाखो-करोडो वर्ष प्रचंड उष्णता व दबावात राहून कार्बनचे हिऱ्यांमध्ये रुपांतर होते, आणि खाणकाम करून हे हिरे भूगर्भातून मिळवले जातात.खाणीतून खणलेल्या सुमारे १ टन मातीतून फक्त १ किंवा २ कॅरेट हिरे मिळतात. नंतर   त्यांची कारखान्यात 'घिसाई' केली जाते.या हिर्‍यांवर पैलू पाडण्यात येतात.नंतर तो आपल्यापर्यंत येतो. ही सर्व प्रक्रिया महागडी तर आहेच सोबत १ कॅरेट हिरे खणण्यासाठी सुमारे ९ स्क्वेअर मीटर माती निकृष्ट होते तर सुमारे ५०० लिटर पाणी देखील वापरले जाते! याशिवाय या खाणीत काम करणाऱ्या मजुरांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते तर बऱ्याच देशांमध्ये या खाणींभोवती घडणारे गुन्हे देखील आपल्याला ऐकायला मिळतात! अगदी याउलट लॅब ग्रोन डायमंड हे एका प्रयोगशाळेत  तयार केले जातात! मग प्रश्न असा आहे की भूगर्भाच्या आत नैसर्गिकरीत्या बनणारे हे हिरे लॅब मध्ये कसे बनविले जात असतील?

हिरे लॅबमध्ये बनवण्यासाठी निसर्गनिर्मित हिरे ज्या वातावरणात बनतात अगदी तसेच वातावरण लॅबमध्ये निर्माण करावे लागते! अनेक वर्षांपासून जगभरातल्या अनेक वैज्ञानिक व तज्ञांनी नॅचरल डायमंड सारखे हिरे बनवण्याचा प्रयत्न केलाय, त्यातल्या काहींनी १८ व्या शतकाच्या शेवटी व १९ व्या शतकाच्या सुरुवातीस तसा हिरा बनवल्याचा दावा देखील केला परंतु त्याबद्दलचा कुठलाही पुरावा नाहीये!  पुढे १९५४ मध्ये General Electric या कंपनीने सर्वात पहिला कृत्रिम हिरा म्हणजेच लॅब ग्रोन डायमंड बनवला! General Electric कंपनीने HPHT म्हणजेच High Pressure / High Temperature या पद्धतीचा वापर केला. परंतु या पद्धतीमध्ये नावाप्रमाणेच अतिदाब व अतितापमान निर्माण करावे लागत असल्याने परिणामी ही पद्धत खर्चिक स्वरुपाची होती शिवाय या पद्धतीद्वारे बनणारा हिरा आकाराने अत्यंत लहान व कमी गुणवत्तेचा होता! 
पुढे १९७१ मध्ये General Electric या कंपनीनेच त्यांच्या प्रक्रियेत सुधारणा करून उत्तम गुणवत्तेचा हिरा बनवला! जगभरातले अनेक वैज्ञानिक व तज्ञ यावर काम करत असल्याने अजून एक आधुनिक पद्धत विकसित झाली ती म्हणजे “Chemical Vapour Deposition-CVD” या पद्धतीमध्ये हिऱ्याच्या बीजाला कार्बन गॅसने तापवले जाते ज्याचे रुपांतर हिऱ्यात होते.या पद्धतीमध्ये दाब व तापमान यांच्यावर अधिक नियंत्रण असते त्यामुळे HPHT च्या तुलनेने कमी दाब व तापमानात देखील हिऱ्यांची निर्मिती करणे शक्य झाले. साहजिकच  ज्याचा थेट परिणाम असा झाला की हिरे निर्मितीचा खर्च कमी झाला. सध्या सर्व आधुनिक लॅब याच पद्धतीचा वापर करून “लॅब ग्रोन डायमंड” बनवतात.

नॅचरल डायमंड च्या तुलनेने लॅब ग्रोन डायमंड लोकांच्या अधिक पसंतीस पडतोय त्याची कारणंही अगदी स्वाभाविक आहेत की लॅब ग्रोन डायमंड हा किमतीने अधिक स्वस्त आहे शिवाय नॅचरल डायमंड मिळवण्यासाठी जी नैसर्गिक हानी होते ती लॅब ग्रोन डायमंड बनवताना होत नाही. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे लॅब ग्रोन डायमंड व नॅचरल डायमंड हे दोन्ही एकाच कच्च्या मालापासून  पासून बनवलेले असल्याने दोघांमधील फरक केवळ उघड्या डोळ्यांनी ओळखणे अशक्य आहे दोघांमधील फरक ओळखण्यासाठी विशिष्ट उपकरणे वापरावी लागतात. त्यामुळे दोन्ही प्रकारचे हिरे हे रासायनिक, दृश्य, व भौतिक दृष्ट्या अगदी एकसारखे असतात.
 
लॅब ग्रोन डायमंड च्या निर्मितीमुळे डायमंड क्षेत्रात नवीन उद्योजक व तज्ञांना संधी निर्माण झालेली आहे, ज्यामध्ये भारत देश देखील मागे नाहीये. तर भारतात नेमके कुठे व कोण या प्रकारचे हिरे बनवतात? हे देखील जाणून घेऊया! सध्या लॅब ग्रोन डायमंड बनवणारे बहुतांश उद्योजक हे भारतातील डायमंड हब म्हटल्या जाणाऱ्या गुजरातच्या सुरत या शहरात आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रीनलॅब डायमंड (Greenlab Diamond), लाईमलाईट लॅब ग्रोन डायमंड (Limelight Lab Grown Diamond), आणि क्यूपीड डायमंड (Cupid Diamond) या कंपन्यांचा समावेश आहे! मोदींनी बायडन यांना गिफ्ट दिलेला हिरा यापैकीच ग्रीनलॅब डायमंड (Greenlab Diamond) या कंपनीने बनवला होता.

आता समस्या आपली होणार आहे कारण घरोघरी  'नाही परवडत ना  खरे हिरे तर कमीतकमी ते मोदीवाले हिरे तरी आणा माझ्यासाठी' अशा मागण्या सुरु होणार आहेत. 

लेखक -सुमित शेटे

 

सबस्क्राईब करा

* indicates required