फिजिक्सवाला : १०१ वी भारतीय युनिकॉर्न कंपनी उभारणारा अवलिया शिक्षक !
स्टार्टअप आणि युनिकॉर्न हे शब्द गेली काही वर्षं सतत कानावर पडत असतात.आता स्टार्ट अप ही संकल्पना थोडीफार ओळखीची झाली आहे पण त्यातही युनिकॉर्न स्टार्ट अप म्हणजे काय, ते आधी समजून घ्या.ही संकल्पना २०१३ मध्ये काऊबॉय चे संस्थापक आयलीन ली यांनी अस्तित्वात आणली. त्यावेळी त्यांनी ३९ कंपनींचा समावेश त्यामध्ये नमूद केला होता. युनिकॉर्न म्हणजे एक बिलीयन डॉलर म्हणजे सुमारे ८५०० करोड रुपयांपेक्षा जास्त ज्या स्टार्टपचे मूल्यांकन आहे अशी कंपनी ! भारतात टॅलन्टची कमी नाहीच त्यामुळे गेल्या काही वर्षात अशा १०० युनिकॉर्न कंपन्या उभ्या राहिल्या आणि २०२२ मध्ये फिजिक्सवाला (Physics wallah) नावाची १०१ वी कंपनी युनिकॉर्नच्या यादीत दाखल झाली आहे. पण या कंपनीची कहाणी थोडी हतकेच आहे . चला वाचू या Physics wallah युनिकॉर्न कंपनीच्या संघर्षाची गोष्ट !आपल्या शालेय जीवनातले सगळेच शिक्षक आपल्या लक्षात राहतात का? तर नाही आपल्या लक्षात तेच राहतात ज्यांनी एखाद्या अवघड विषयात आपली रुची निर्माण केली आणि ज्यांची शिकवण्याची शैली खूपच वेगळी आणि प्रभावी होती. तर आजची ही माहिती अशाच एका अवलिया शिक्षकाची आहे. तुम्ही शास्त्र शाखेचे विद्यार्थी असाल किंवा एखाद्या आयआयटी -बिट्स पिलानीसारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अलख पांडे हे नाव तुमच्या नक्कीच चागले ओळखीचे असेल.
उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथील मध्यमवर्गीय घरात अलख पांडे यांचा जन्म झाला. त्यांचे लहानपण खूपच गरिबीत हालाखीचे गेले, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने लहान वयातच कुटुंबाचा आधार देण्यासाठी त्यांनी काम करायला सुरवात केली. ते शाळेत असताना त्यांच्या वडिलांनी घराचा काही भाग विकला, नंतर काही कारणांमुळे घर विकून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ सुध्दा एकेकाळी आली होती. जेव्हा अलख ६वी मध्ये होते तेव्हा त्यांना २००रुपये कमावण्यासाठी रोज ५ मैल सायकलवरून प्रवास करावा लागायचा. शेजारच्या मुलांचीसुद्धा ते शिकवणी घ्यायचे.त्यांनी अनेक कोचिंग सेंटर मध्ये अध्यापनाचे कार्य केले त्यावेळी त्यांना मासिक ५००० रुपये पगार हातात पडायचा. कुटुंबाला करता येईल ती सर्व मदत अगदी लहान वयातच प्रगल्भ झालेल्या अलख यांनी केली.आज त्यांची गगनभरारी दिसते पण लहानपणी केलेल्या कष्टापासून आजच्या सुखाच्या दिवसांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
दहावी आणि बारावीत अलख हे त्यांच्या वर्गातील टॉपर होते.१२वीनंतर त्यांनी बटलर टेकनिकल इन्स्टीट्यूट (HBTI) कानपुर मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला पण लवकरच त्यांच्या शिकवण्यात आपल्याला यामध्ये रस नाही हे लक्षात आले, आणिइंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षात येऊन त्यांनी कॉलेज सोडून दिले एका मुलाखती मध्ये त्यांना त्याबद्दल विचारले असता ' माझ्या आयुष्यातील तो काळ मला आठवावासा वाटत नाही,खूपच त्रासदायक असा तो काळ होता. मी कॉलेज ड्रॉप आउट आहे आणि तरीही यशस्वी झालो म्हणून कुणीही विनाकारण कॉलेज सोडू नये., ते खूपच मूर्खपणाचे ठरेल.' असे सांगितले.
२०१६ पासून त्यांनी YouTube वर आपल्या अध्यापनाचे व्हिडिओ टाकायला सुरवात केली.आज आपल्याला मॉनिटायझेशन हा शब्द नवा नाही (Monetization)
पण youTubeवर पैसे कमावता येतात हे सुरवातीला त्यांना माहिती नव्हते. तरीही फक्त आपले ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून त्यांनी सुरवात केली. त्यांची शिकवण्याची पद्धत विदयार्थ्यांच्या मध्ये खूपच लोकप्रिय झाली आणि हळूहळू त्यांना हवी तशी ओळख मिळाली.आज त्याचे रूपांतर ब्रँड मध्ये झाले आहे.
Physics Wallah नावाने सुरु केलेलं Youtube चॅनेलला आज १.०८ कोटी सबस्क्रायबर आहेत.कोविडच्या काळात त्यांनी त्यांचे सहकारी प्रतिक माहेश्वरी यांच्या सोबत मिळून PW ॲप ची निर्मिती केली.PW -JEE/NEET, UPSC, GATE, Bank या नावाने असलेले त्यांच्या ॲपवरून आज लाखो विदयार्थी कोचिंग घेत आहेत. ॲपवर आजही ९०% माहितमोफत स्वरूपात आहे. तसेच कोर्स सुद्धा माफक दरात उपलब्ध आहेत.
प्रत्येक यशस्वी माणसाला प्रतिस्पर्ध्याशी सामना करावाच लागतो.अलख यांच्या Youtube वरची growth बघून त्यांना Unacademy कडून 75 करोड रुपयांची ऑफर करण्यात आली होती. पण त्यांची तळमळ तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याची होती जे Unacademy सोबत शक्य झाले नसते.(एका मुलाखतीत त्यांनी कंपनीचे अधिकृतरित्या नाव न घेता हे खरे आहे असे सांगितलेले आहे)
त्यांना त्यांच्या या कामगिरी बद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.अलख यांनी त्यांची पत्रकार मैत्रीण शिवानी दुबे हिच्याशी विवाह केला.
आयुष्य कितीही खडतर असेल तर स्वतःवर असलेल्या विश्वासा मुळे तुम्ही तुमचे इच्छित ध्येय प्राप्त करू शकता,याचं जिवंत उदाहरणं म्हणजे फिजिक्सवाला अलख पांडे.!!
छोट्या छोट्या कारणा मुळे आज आपण अगदी तरुण मुलांना आत्महत्या करताना पाहतो, पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक परीक्षेचा काळ येतो त्यातून आपण स्वतःवर विश्वास ठेवून काम केले तर नक्कीच बाहेर पडू शकतो अशी प्रेरणा अलख पांडे यांनी तरुणांना दिली आहे.
अलख पांडे यांच्या संघर्षमय जीवनाची कथा आपल्याला Amazon mini TV वर Physics Wallah या वेब सिरीज मधून पाहायला मिळेल.
-मोनाली कुलकर्णी