चार मिनिटांच्या सर्जरीत एक नाही,दोन नाही, तीन माणसं दगावली !

ही आहे एका डॉक्टरची, म्हणजे एका सर्जनची विचित्र सत्यकथा. वैद्यकीय इतिहासात अक्षरशः शून्य मिनिटात सर्जरी करणारा डॉक्टर अशी याच्या नावाची नोंद आहे. ज्या काळात हे डॉक्टरसाहेब सर्जरी करत, त्या काळी अॅनेस्थेशियाचे तंत्र विकसित झालेच नव्हते. त्यामुळे रुग्णाला कमीतकमी वेळात वेदनेतून मोकळे करण्याला फारच महत्व होते. तर या डॉक्टरचे नाव - रॉबर्ट लिस्टन. शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात आजही त्याचे नाव आदराने घेतले जाते. कमीतकमी वेळात रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात याचा हात कोणीही धरू शकत नसे. तो शस्त्रक्रिया करताना त्याचे विद्यार्थी हातात स्टॉप वॉच घेऊनच उभे रहायचे. पण या वेगवान डॉक्टरची जी कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती थोडी वेगळीच आहे.
त्याचं झालं असं की एका रुग्णाच्या पायाचे गुडघ्यापासून 'अॅम्पुटेशन' करायचे होते. म्हणजेच गुडघ्यापासून पाय कापून काढायचा होता. आता हे करताना रक्त तर मोठ्या प्रमाणात जाणार, आणि वेदनाही असह्य होणार. हे लक्षात घेता केवळ तीन चार मिनिटांत सर्जरी संपवायची असं ठरलं. झालं! सर्जरीला सुरुवात झाली. हातातल्या सुरीने पहिलाच घेतलेला छेद इतका भारी होता की ऑपरेशन बघायला उभ्या असलेल्या एका डॉक्टरच्या कोटाचे टोकच कापले गेले आणि तो इसम भीतीनेच गार झाला. भोवळ येऊन खाली पडला आणि गेलाच. सुरीच्या त्याच छेदात रुग्णाचा पाय घट्ट धरलेल्या दुसर्या डॉक्टरची बोटंच छाटली गेली. दोनच दिवसांत त्या डॉक्टरला आणि रुग्णाला, दोघांनाही गँगरीन झाले आणि त्यांचाही जीव गेला! थोडक्यात, एका शस्त्रक्रियेमुळे तीन माणसं दगावली.
आता त्या काळी मेडिकल रेकॉर्डस् लिहून ठेवण्याची पध्दतच नव्हती. त्यामुळे या घटनेचा कागदोपत्री पुरावा कुठेच नाही. पण आजही Liston's most famous case म्हणून ही गोष्ट मेडिकलच्या विद्यार्थ्यांना सांगितली जाते.