computer

नयन तुझे जादूगार ...

सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यात आपल्या जादुई नजरेने घायाळ करणारी मोनालिसा अजूनही आठवतच असेल तुम्हाला!  तिच्या  सुंदर डोळ्यांनी रातोरात  महाकुंभमेळ्यात सामील होणाऱ्या लोकांना एक वेगळीच भुरळ पाडलीये ..!!तर सांगायचा मुद्दा असा की.. कोणत्या व्यक्तीला वाटत नाही की आपले ही "डोळे" असे सुंदर आणि आपल्याला आवडणाऱ्या रंगछटेमधे असावे..??
तुम्हाला पण असंच वाटत असेल तर मग आता "नो फिक्र"... कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक झक्कास बातमी..!!

आता 'केराटोपिग्मेंटेशन' नावाच्या एका प्रक्रियेद्वारे आपल्याला स्वतःच्या डोळ्यांचा रंग  हव्या त्या रंग छटेमध्ये कायम स्वरूपी बदलता येऊ शकतो. युरोपमध्ये ही प्रक्रिया किमान दहा वर्षांपासून केली जात आहे. आता ही प्रक्रिया  अमेरिकेत सुद्धा लोकप्रिय होत आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील संपत्ती सल्लागार उल्कू डोगन २० वर्षांपासून रंगीत कॉन्टॅक्ट लेन्स घालत होती कारण तिला निळे डोळे हवे होते. न्यूयॉर्क ला जाऊन तिने तिचे निळ्या डोळ्यांचे स्वप्न पूर्ण केले.तिला ही स्वतःसाठी केलेली सर्वोत्तम "गुंतवणूक" वाटते!

डॉ. अलेक्झांडर मोवशोविच यांनी न्यूयॉर्क येथील प्रेस्बिटेरियन हॉस्पिटलमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेजमध्ये "नेत्ररोगशास्त्र आणि व्हिट्रिओरेटिनल रोग आणि शस्त्रक्रिया" या विषयात फेलोशिप पूर्ण केली आहे आणि तिथे ते आता नेत्ररोगशास्त्र विभागात क्लिनिकल असोसिएट प्रोफेसर आहेत.२०१९ मध्ये डॉ. मोवशोविच यांनी 'केराटोची' स्थापना केली,जी अमेरिकेतील पहिली केराटोपिग्मेंटेशन देणारी आणि सुरक्षित कॉस्मेटिक द्वारे डोळ्यांचा रंग बदलण्यात विशेषज्ञता असलेली एकमेव संस्था आहे. डॉ. मोवशोविच यांनी आता ७५० हून अधिकवेळा ही प्रक्रिया केली आहे, असे त्यांनी ऑप्थॅल्मोलॉजी टाईम्सला सांगितले .
'केराटोपिग्मेंटेशन' ही प्रक्रिया एक कॉर्नियल रेफ्रॅक्टिव लेझरचा वापर करून केली जाते,यामध्ये एक खनिज आधारित पिगमेंट अर्धपारदर्शक कॉर्नियामध्ये कॅन्युलाच्या मदतीने प्रविष्ट केला जातो.ही कायमस्वरूपी प्रक्रिया वेदनारहित आणि जलद आहे.

 

 

जर तुम्ही सुद्धा रोज रोज विविध रंगाच्या लेन्स वापरण्याला कंटाळला असाल तर 'केराटोपिग्मेंटेशन' तुमच्या साठी वरदान ठरू शकते... फक्त असे रंगीबेरंगी डोळे कायमस्वरूपी मिळवण्यासाठी तुमच्या खिशात १२,०० डॉलर्स म्हणजे जवळपास १० ते १२ लाख हवेत बरं का..!
थोडक्यात काय तर 'केराटोपिग्मेंटेशन' प्रक्रिया ही "वेगवान, सुरक्षित आणि कस्टमायझेबल" तर आहेच पण तेवढीच "खर्चिक" सुद्धा आहे. पण "हौसेला" मोल नसतं..!
तर मंडळी आहात का तुम्ही तय्यार, आपल्या आवडीच्या स्वप्नवत वाटणाऱ्या नेत्र-छटा कायमस्वरूपी सत्यात उतरवण्यासाठी! 
मग कोणीतरी तुमच्यासाठी सुद्धा या ओळी नक्कीच गुणगुणेल... 
ये आँखें देख कर हम सारी दुनिया भूल जाते हैं...!!

लेखिका - श्रेया भिडे 

सबस्क्राईब करा

* indicates required