‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?

२० वर्षांपूर्वी आदित्य पांचोली आणि त्याच्या सोसायटीचा एक सदस्य या दोघात गाडी पार्कींगवरून काहीतरी झकाझकी झाली.आदित्य पांचोलीने शेजार्याला मारहाण केली.जखमी झालेल्या शेजार्याने पोलीसात तक्रार केली.केस कोर्टात गेली.आरोप सिध्द झाले आणि आदित्य पांचोलीला एक वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली.आदित्य पांचोली हायकोर्टात गेला.हायकोर्टाने खालच्या कोर्टाने दिलेली शिक्षा योग्य असण्याचा निर्वाळा दिला पण आदित्य पांचोली जेलमध्ये गेला नाही कारण.. कोर्टाने त्याला चांगल्या वर्तणूकीच्या बाँडवर सोडून दिले. अशीच केस सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत झाली असती तर ???
******

काही वेळा असं वाटतं की,आपल्याकडे दोन इंडियन पीनल कोड आहेत. एक आयपीसी व्हाइट -सेलेब्रिटी आणि व्हि.आय.पी.यांच्यासाठी आणि दुसरा आयपीसी ब्ल्यू -तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी !
२००१ सालच्या मे महिन्यातील एका रात्रीची गोष्ट.जुहूच्या एका रस्त्यावर फरदीन खानला अटक करण्यात आली.झडती घेतल्यावर त्याच्या खिशातून काही ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले.मुंबईच्या फिल्मी विश्वाला हादरवून टाकणारी ही बातमी बहुतेक सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर छापली गेली.चाहत्यांची गर्दी कोर्टात झाली.अपेक्षेप्रमाणे त्याची ताबडतोब जामिनावर सुटकाही झाली.खटला उभा राहण्यासाठी दहा वर्षं लागली.गेल्या वर्षी २०११ साली फरदीनवरचे आरोपपत्र कोर्टासमोर आले.मामुली प्रमाणात अमली पदार्थ विकत घेण्याच्या आरोपाखाली खटला पुढे चालवण्यात आला.या वर्षी फरदीन मार्च महिन्यात कोर्टापुढे हजर झाला.कोर्टासमोर त्याने निवेदन दिले की,तो आता व्यसनमुक्त झाला आहे.कोर्टाने त्याचे निवेदन स्वीकारून कलम ६४ (अ) NDPS अॅक्ट १९८५ ची तरतूद वापरून या खटल्यातून अभय दिले आणि मुक्त केले.
अंमली पदार्थाची केस -दहा वर्षांनी कोर्टासमोर यावी - अकराव्या वर्षी त्यातून अभय मिळावे.सगळं काही सोयीचं- सुरळीत आणि सुटसुटीत.
*****

ही बातमी वाचताना २०-२२ वर्षांपूर्वीची एक बातमी आठवली. मुंबईच्या एका मिल कामगाराची रात्रपाळी सुटल्यावर गेटवर झडती घेण्यात आली.त्याच्या खिशात पंधरा ग्राम टिनोपाल सापडले- टिनोपाल म्हणजे पांढरे कपडे झगमगीत कराण्याची एक साबणासारखी पावडर.त्याची रवानगी ताबडतोब पोलीस ठाण्यात झाली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याची रवानगी कोर्टात आणि कोर्टानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.त्या कामगाराची परिस्थिती जेमतेमच असल्याने सरकारतर्फे वकील मिळून खटला उभा रहायाला काही दिवस गेले.कोर्ट जामीन द्यायला तयार झाले,पण त्याचा जामीन कोणी देईना.सहा महिने तुरुंगात काढल्यावर खटला उभा राहिला आणि तीन महिन्यांची शिक्षा झाली.
अंमली पदार्थ बाळगले तर चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर अभय आणि १५ ग्राम टिनोपाल चोरलं तर सहा महिने जेलात !
आता तो कामगार कुठे असेल किंवा असेल की नाही काही माहिती नाही, पण असलाच कुठे तरी आणि फरदीनची केस त्यानं वाचली, तर एकच प्रश्न त्याच्या मनात उभा राहील, ‘भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे ?’