computer

'बाहुबली' चित्रपटात बिज्जलदेवची खलनायकी भूमिका साकारणारा बहुभाषी, बहुआयामी अभिनेता 'नास्सर

सिनेविश्वात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.त्यांना यशोशिखरावर पोहचण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले आहेत.हलाखीत दिवस काढावे लागले आहे.काहींना चित्रपटात येण्यासाठी रस्त्यावर झोपावे लागले तर काहींना बँक किंवा सोसायटीबाहेर सुरक्षारक्षक म्हणूनही काम करावे लागले आहे.अभिनय हे पहिले प्रेम असल्याने,अनंत अडचणींवर मात करुन यशोशिखरावर पोहचलेले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदी चित्रपटसृष्टी असा मोठा प्रवास करुन नावारुपाला येणारे अभिनेते मोहम्मद हनीफ उर्फ नास्सर यांचा आज दि. ५ मार्च जन्मदिवस.


गेल्या काही वर्षांपूर्वी आलेल्या 'बाहुबली' चित्रपटातील बिज्जलदेवच्या खलनायकी भूमिकेने संपूर्ण जगभरात चर्चेत आलेले अभिनेता नास्सर कायमच आपल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत राहतात. रोजा, वीरम, खुशी, चाची ४२०, रावडी राठोड, थलायवी आणि अखेरीस बाहुबली या चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या नास्सर यांचा बॉलिवूडमध्ये फार मोठा चाहतावर्ग आहे. नास्सर यांनी आपल्या सिनेकारकिर्दित, विविध प्रकारच्या भूमिका साकारत अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनात उमटवली. 


 

नास्सर यांचा जन्म ५ मार्च १९५८ रोजी तामिळनाडू  येथे मेहबूब बाशा आणि मुमताज यांच्या घरी झाला.त्यांनी सेंट जोसेफ उच्च माध्यमिक विद्यालय (चेंगलपट्टू) मध्ये शालेय शिक्षण घेतले. शालेय शिक्षणानंतर ते मद्रास (आताचे चेन्नई) येथे गेले, जिथे त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये प्री-युनिव्हर्सिटी पूर्ण केले.मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये ते ड्रॅमॅटिक सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.नंतर काही काळ त्यांनी भारतीय हवाई दलात काम केले. त्यांनी अभिनयाच्या साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सची फिल्म इन्स्टिट्यूट आणि तमिळनाडू इन्स्टिट्यूट फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्नॉलॉजी येथून प्रशिक्षण घेतले.
नास्सर यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने, नास्सर यांनी अभिनेता व्हावे अशी इच्छा त्यांच्या वडीलांची होती नास्सर यांना आपल्या चेहऱ्यावरून अनेकदा टीका सहन करावी लागली होती. नाकाच्या मोठ्या ठेवणीमुळे आणि रुंद कपाळामुळे नास्सर यांच्या चेहऱ्यावर कायम टीका झाली. यशस्वी अभिनेता होण्यासाठी दिसणं नाही तर, अभिनय महत्वाचा असतो. आपल्या अभिनयाने त्यांनी सर्वांचीच बोलती बंद केली.

नास्सर यांनी रुपेरी पडद्यावर वाटचाल सुरु केली पण हा मार्ग त्याच्यासाठी सोपा नव्हता. कोणत्याही चित्रपटात छोटी भूमिका मिळाली तरी ती करायचीच ह्या निर्धाराने त्यांनी अभिनय करणे सुरु ठेवले. सुरुवातीच्या दिवसांत मिळणाऱ्या छोट्या भूमिकांच्या तुटपुंज्या मानधनाने घरखर्च भागवता येत नव्हता.  त्यामुळे उदरनिर्वाहासाठी हॉटेलमध्ये वेटर आणि सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केले. या कठोर परिश्रम आणि जीवनातील चढ-उतारांमध्ये त्यांनी कधीही धीर सोडला नाही. उलट, आपली स्वप्ने साकारण्यासाठी सतत मेहनत करत राहिले.

 

१९८५ मध्ये आलेल्या 'कल्याणा अगाथिगल' या तमिळ चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका जरी छोटी असली तरी नास्सर यांच्यासाठी ते पात्रही फार मोठं होतं. एका छोट्या भूमिकेमुळे  का होईना अभिनय करायला मिळाल्यामुळे, त्यांना प्रचंड आनंद झाला होता. त्यानंतर एसपी मुथुरमन यांच्या 'वेलाकरण' आणि 'वन्ना कानवुगल' मध्ये नास्सार यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. 
कठोर परिश्रमानंतर एक वेळ अशी आली की त्यांना मोठमोठ्या बॅनर्सकडे काम मिळू लागले. नवीन चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमावले. चित्रपटांसोबतच त्यांनी अभिनयातूनही लोकांना वेड लावले. नास्सर यांनी तामिळ सोबतच तेलगू, मलयालम, हिंदी चित्रपटातही भूमिका केल्यात.अंगरक्षक (१९९५) मधील सनी देओलच्या चित्रपटातून हिंदीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हिंदीत फिर मिलेंगे (२००४), निःशब्द (२००७), राउडी राठौर (२०१२), साला खडूस (२०१६) आणि सिरीयस मॅन (२०२०) या चित्रपटांमध्ये  तसेच जगभरात गाजलेल्या बाहुबली: द बिगिनिंग (२०१५) आणि बाहुबली २: द कन्क्लूजन (२०१७) या चित्रपटांमध्ये त्यांनी बिज्जलदेवाची भूमिका साकारली आहे.  पोन्नियिन सेलवन (२०२१) व २०२२ मध्ये आलेल्या तामिळ चित्रपट हॉस्टलमधील फादर कुरियाकोसच्या भूमिकेत ते होते. हा त्यांचा ५५० वा चित्रपट होता.

 

नास्सर यांनी 'टेल्स ऑफ द कामसूत्र: द परफ्यूम्ड गार्डन' (२०००), 'नथिंग बट लाइफ' (२००४), 'मॉर्निंग रागा' (२००४), आणि 'फेयर गेम' (२०१०) या हॉलिवूडपटात काम केले असून,  करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दूरचित्रवाहिनी हिन्दू व सन टीव्ही…वरील मालिकातून छोट्या भूमिका केल्या आहेत.  त्यांच्या गाजलेल्या मालिकात  'चिन्ना चिन्ना आसाई' (१९९७), 'बूम बूम शाकलाका' (२०००) और 'जोथी' (२०२१) या मालिकांचा समावेश आहे. ओटीटी चॅनलवरदेखील नास्सर यांनी आपले पाय रोवले असून,  सोनी LIV वरील व्हिक्टीम (२०२२), ॲमेझॉन प्राइमवरील  'वधांधी: द फैबल ऑफ वेलोनी' (२०२२) या वेबसिरीजमध्ये अभिनय केला आहे.
२०१८ मध्ये, त्यांनी  प्रसिद्ध भारतीय अभिनेता कमल हासन यांच्या मक्कल निधि मैयम या राजकीय पक्षात प्रवेश केला.  जाहिरात क्षेत्रात  व्होल्गाटेक वॉटर टँक, अग्नी स्टील आणि बँडवॅगन यासारख्या विविध ब्रँडसाठी त्यांनी जाहिराती केल्या आहेत. 
आजवरच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून, दुबई युएईचा गोल्डन व्हिसा असणारे पहिले दक्षिण भारतीय कलावंत आहेत. नास्सर यांनी युनिसेफचे राजदूत म्हणूनही कार्य केले आहे. उघड्यावरील शौचास जाण्याविरोधात त्यांनी मोठी मोहीम राबवली असून, या मोहिमेअंतर्गत दक्षिणेतील अनेक गावांतील शाळांना भेट देवून पाणी, स्वच्छतेसंबंधित विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधून जनजागृती केली आहे. हिंदी, तामिळ, उर्दू, इंग्रजी, अरबी, तेलगू, कन्नड, मलयालम भाषा सहजतेने बोलणाऱ्या व आपल्या विविध भूमिकांतून प्रसिध्द असणाऱ्या बहुभाषी, बहुआयामी अभिनेता नास्सर यांचे जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक अभीष्टचिंतन !


- योगेश जगन्नाथ शुक्ल, जळगाव

सबस्क्राईब करा

* indicates required