वेदनेतून जन्म झाला बहुगुणी अॅस्पिरिनचा !

आर्थ्रायटीसच्या वेदनांनी त्रस्त झालेल्या एका पित्याने आपल्या संशोधक मुलाला सांगीतलं 'बाबा रे.काहीतरी औषध शोधून काढ आणि मला वेदनांतून मुक्ती दे 'मुलगा बायर या सुप्रसिध्द कंपनीत शास्त्रज्ञ होता.तो ताबडतोब कामाला लागला आणि जन्म झाला वेदनानाशक औषधाचा - अॅस्पिरिनचा !
हा मुलगा म्हणजे बायर फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारा फेलिक्स हॉफमन ! त्याने कामाला सुरुवात केली.जुनी रेकॉर्ड तपासल्यावर त्याच्या लक्षात आलं की वेदनेवर आधी सॅलिसिलीक अॅसिड हे एकच औषध उपलब्ध होतं.त्यामुळे वेदना थांबायच्या पण पोटाचे त्रास वाढायचे.नंतर एका संशोधकाने सॅलिसिलीक अॅसिड ऐवजी सोडियम आणि अॅसिटिल क्लोराइडचे संयुग वापरून बघीतले.पण या प्रयोगाची फारशी दखल घेतली गेली नाही.

फेलिक्स हॉफमन एक पाऊल पुढे गेला आणि त्याने अॅसेटिक अॅसिड आणि सॅलिसिलीक अॅसिडचे नवे संयुग बनवले. अॅसिटिल-सॅलिसिलीक अॅसिडच्या पावडरमुळे त्याच्या वडलांच्या वेदना कमी झाल्या.आपल्या वडीलांसाठी काहीतरी केल्याचे समाधान हॉफमनला मिळाले. पण तो शास्त्रज्ञ म्हणून काम करत होता बायर कंपनीसाठी त्यामुळे पेटंट कंपनीच्या नावानेच घेतले गेले आणि बायरने 'अॅस्पिरिन' या नावाने ब्रँडचा ट्रेडमार्क नोंदवला.
अॅस्पिरिन हेच नाव घेण्यामागे पण एक कथा आहे ती अशी: A” अॅसिटिल क्लोराइडचा,सॅलिसिलीक अॅसिड ज्या वनस्पतीतून मिळायचे त्या 'स्पिरिआ अल्मारिआ' या वनस्पतीचा “spir” आणि “in”शब्द सगळ्याच औषधात असतो. या तिन्हीचे एकत्रीकरण करून नाव झाले अॅस्पिरिन ! पुढची ७ वर्षे बायर कंपनीला मोनोपली मिळाली आणि कंपनी पैसे छापत राहिली.

नंतरच्या काळात वान्स नावाच्या संशोधकाने अॅस्पिरिनवर केलेल्या काही संशोधनासाठी त्याला नोबेल मिळाले.डॉ. लॉरेन्स क्रेव्ह या संशोधकाने हे सिध्द केले की अॅस्पिरिन नियमित घेतल्याने रक्त पातळ होते आणि अचानक येणारा हृदयविकाराचा झटका टळतो. त्यामुळे हृदयरोग असलेल्या सर्व रुग्णांना आजही नियमित अॅस्पिरिन दिले जाते.
फक्त अमेरिकेचा विचार केला तर आजच्या तारखेस दिड कोटी गोळ्या दरवर्षी खपतात.भारतात किती खपत असतील याचा अंदाज तुम्हीच करा !
हे असे बहुगुणी औषध शोधून काढणार्या फेलिक्स हॉफमनला वडीलांसाठी काहीतरी केल्याचे समाधान वगळता आणखी काहीच मिळाले नाही.
आजच्याच दिवशी बायरला अॅस्पिरिनचे पेटंट अमेरिकेत मिळाले आणि ही कथा आठवली इतकेच !