अदम्य साहस करणारे क्रांतिकारक उधमसिंह !!!

१३ मार्च १९४० ची संध्याकाळ लंडनच्या कॅक्सटन सभागृहात भरपूर गर्दी जमली होती. इस्ट इंडिया असोसिएशन आणि रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची बैठक होणार होती. सभागृहात बसलेल्या भारतीयांमध्ये एक व्यक्ती अशी होती की, तिच्या ओव्हरकोटमध्ये एक जाडजूड पुस्तक होते. हे पुस्तक एका खास विचाराने त्याने सोबत आणले होते. या पुस्तकातील पाने कुशलतेने कापून त्यात एक रिव्हॉल्वर ठेवले होते.
बैठक संपली, सगळे आपापल्या जागांवरुन उठून बाहेर जावू लागले. त्याचवेळेस त्या व्यक्तीने आपल्या हातातील पुस्तक उघडले आणि व्यासपीठावरील वक्त्यांपैकी मायकल ओड्वायर याच्यावर गोळ्या झाडल्या.या गोळीबारातील दोन गोळ्या ओड्वायरला लागल्या आणि पंजाबचा माजी गव्हर्नर असलेल्या मायकलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
गोळीबाराच्या आवाजाने सभागृहात पळापळ सुरु झाली. मात्र या भारतीय व्यक्तीने पळण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. ब्रिटनमध्येच या व्यक्तीवर खटला भरला गेला आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली गेली. १३ जुलै १९४० ला या व्यक्तीस फाशी देण्यात आले. हे अदम्य साहस करणारी व्यक्ती होती उधमसिंह !!
.

मात्र या गोळीबाराच्या घटनेमागे कारण होती, १३ एप्रिल १९१९ ला अमृतसरच्या जालियनवाला बागेत झालेल्या गोळीबाराची घटना. या दिवशी इंग्रज जनरल एडवर्ड हॅरी डायरच्या हुकुमावरून जालियनवाला बागेत जमलेल्या हजारो लोकांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. या घटनेतील मृतांचा इंग्रज सरकारने जाहीर केलेला आकडा होता ३७० मृत आणि १२०० जखमी. मात्र हे आकडे चुकीचे असल्याचे अनेकांच म्हणणे आहे. असे म्हटले जाते की, जनरल डायरने केल्लाय या गोळीबारा कमीतकमी १००० लोकांचा मृत्यू झाला होता. जालियनवाला बाग घटना घडली तेव्हा पंजाबचा गर्व्हनर होता मायकल ओड्वायर. त्याने जनरल डायरच्या या हत्याकांडाचे समर्थन केले होते.
ही घटना घडली तेव्हा उधमसिंहदेखील जालियनवाला बागेत होते. त्याचवेळी त्यांनी या नरसंहाराचा बदला घेण्याचा निर्धार केला होता. नामसाधर्म्यामुळे बऱ्याचजणाना वाटते की उधमसिंहांनी जनरल डायरलाच मारले. मात्र मायकल ओड्वायर मारले त्या घटनेआधीच म्हणजे १९२७ मध्येच जनरल डायर याचा पक्षाघात (पॅरालिसीस) व दुसऱ्या आजारांमुळे मृत्यू झाला होता. इतिहासकारांचे असेही म्हणणे आहे की, मायकल ओड्वायरचा वध करण्यामागे केवळ जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेणे हा एकमेव उद्देश नव्हता. तर ब्रिटीश सरकारला त्यांच्याच देशात कठोर संदेश देवून भारतीय क्रांतीची ज्वाला अजून प्रज्वलित करण्याचाही उधमसिंह यांचा हेतू होता.
उधमसिंहावर भगतसिंग यांचा प्रभाव होता. एका पत्रात तर त्यांनी भगतसिंग यांचा उल्लेख माझा प्रिय मित्र असाही केला आहे. भगतसिंग यांच्याबरोबर उधमसिंहांची पहिली भेट लाहौर जेलमध्ये झाली होती. दोघे पंजाब प्रांताशी संबंधित होते. दोघेही नास्तिक होते, दोघांच्याही जीवनाची दिशा जालियनवाला हत्याकांडाने बदलली होती. दोघांनाही फाशी देण्याआधी त्यांनी कोणत्याही धार्मिक ग्रंथाचे पठन करण्यास नकार दिला होता.
-योगेश शुक्ल