ओसामाला ठार करण्याची कहाणी... वाचा ४० मिनिटांचा थरार!!!
२ मे, २०११. पाकिस्तानातील अॅबटाबाद मधल्या एका घरात लपून बसलेला ओसामा अखेर अमेरिकेच्या हातात सापडलाच. १० वर्षाच्या शोधानंतर अवघ्या ४० मिनिटात अमेरिकेने ओसामाला कंठस्नान घातलं.
लादेनला मारण्याची संपूर्ण कार्यवाही ओबामा आणि त्यांचे सहकारी व्हाइट हाउस मधल्या ‘सिच्युएशन रूम’ मध्ये लाईव्ह बघत होते. यावेळी त्यांच्या मनावर आलेलं दडपण ओबामा यांनी म्हटलेल्या या वाक्यावरून दिसून येतं : ‘ते ४० मिनिट म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा काळ होता.’
पण तुम्हाला एक प्रश्न नक्कीच पडत असणार, कि ओसामा तिथेच आहे याचा पत्ता कसा लागला? मारली गेलेली व्यक्तीच ओसामा होती याचा पुरावा काय? किंवा हे घडलं तरी कसं ?
आज या सर्व प्रश्नांचा आढावा घेऊया मंडळी.
अॅबटाबादमधल्या घरावर संशय !
ओसामाच्या शोधात असताना अमेरिकेनं त्याच्याशी संबंधित सर्व माणसांची गुप्तपणे चौकशी केल्यानंतर ओसामाचा हळू हळू सुगावा लागत गेला. चौकशीच्या दरम्यान एक ठिकाण अमेरिकेच्या नजरेत आले. हे घर होतं इस्लामाबादपासून अवघ्या ६५ किलोमीटरवर असलेल्या अॅबटाबादमध्ये.
एवढा प्रशस्त बंगला असूनही इथं साधं इंटरनेट कनेक्शन तर सोडा पण टेलिफोन कनेक्शनही नव्हतं. या संशयास्पद गोष्टी तर होत्याच. पण काही ठोस हाती लागत नव्हतं. पण ओसामा आपल्या साथीदारांशी ज्या कुरियरच्या माध्यमातून संपर्क ठेवत असे त्या कुरियरनं संशय १०० पटीने वाढवला.
घरात राहणारा इसम हाच ओसामा कसा ?
अधूनमधून बंगल्याच्या गॅलरीत एक इसम दिसत होता. पण तोच ओसामा आहे याची खात्री करून घेण्यासाठी अमेरिकेनं त्याचा डीएनए तपासण्याचं ठरवलं. त्यानुसार बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करून एक खोटी लसीकरण मोहीम राबवली गेली. मोहिमेची पूर्ण जबाबदारी पाकिस्तानातले डॉक्टर शकील आफ्रिदी यांच्यावर होती.
मोहिमेत त्या घरात राहणाऱ्या माणसांचा डीएनए नमुना मिळवून ओसामाच्या बहिणीच्या डीएनएशी तपासून बघितला गेला आणि हे उघड झालं कि तोच ओसामा आहे.
अखेरची कार्यवाही
पाच वेळा अमेरिकेच्या सुरक्षा दलांसोबत झालेल्या चर्चेनंतर ओबामा यांनी लादेनला ठार मारण्याच्या वॉरंटवर सही केली आणि सुरु झाली अखेरची कार्यवाही.
स्थानिकवेळेनुसार रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला अमेरिकन लष्कराचे हेलीकॉप्टर्स अॅबटाबाद मधल्या त्या घरावर घिरट्या घालू लागले. सर्व काही प्लॅननुसार चाललेलं असताना ज्या हेलीकॉप्टर्समधून सील कमांडो घरात उतरणार होते, त्यातल्याच एकाला काही अडचणींमुळं जमिनीवर उतरावं लागलं आणि ते हेलीकॉप्टर क्रॅश झालं. यावेळी काही क्षणांसाठी ऑपरेशन फेल तर होणार नाही ना अशी शंका ओबामा यांना येऊन गली. यावेळी ओबामा आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर किती मोठ्ठ प्रेशर आलं असावं हे खालील फोटो बघितल्यावर तुम्हाल कळेल.
या बाक्याप्रसंगीही ऑपरेशन पूर्णत्वास नेत नेव्ही कमांडो घरात घुसले आणि लादेनच्या डोक्यात गोळ्या झाडून त्याला ठार केलं. त्यानंतर त्याच अवस्थेततला लादेनचा फोटो अमेरिकेत पाठवला गेला. तज्ञांनी तातडीने तो फोटो तपासला आणि मेलेली व्यक्ती ओसामाचं असल्याच्या दुजोरा कमांडोंना दिला.
लादेन हा मृत्युनंतर दहशतवाद्यांसाठी प्रेरणास्थान बनू नये म्हणून त्याला जमिनीवर दफन न करता अरबी समुद्राच्या तळाशी विधिवत दफन केले गेले. ती जागा कोणती हे अजूनही गुप्तच आहे.
(शेवटच्या मिशनचा तपशीलवार लेखाजोखा तुम्ही 'नो इझी डे' या मार्क ओवेन यांच्या पुस्तकात वाचू शकतात. मार्क ओवेन हे स्वतः त्या नेव्ही सील कमांडोचा एक भाग होते.)
जगाला हादरे देणाऱ्या या क्रूरकर्मा दहशतवाद्याची इच्छा होती की त्याला युद्धात वीरमरण यावे पण त्याची अखेर ही भयानक झाली.
शेवटी आपल्याला माहित नसेल, पण ओसामा बिन लादेन हा सनी लियोनीचा मोठा फ्यान होता बरं का...का ? ते सांगायला नको !