जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी!! या जिल्ह्याची खासियत तर जाणून घ्या!!
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एक म्हण म्हणजे जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी!! अर्थात ही कुणा परभणीकराच्याच सुपीक डोक्यातून आलेली म्हण असेल ते सोडा. पण परभणीचे असलेले वेगळेपण सांगण्यासाठी ही म्हण वापरली जाते. मराठवाडाच नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात या जिल्ह्याची काहीएक विशेषता आहे. आजच्या लेखात आपण याच गोष्टी जाणून घेणार आहोत.
हा जिल्हा एकेकाळी प्रभावतीनगर नावाने ओळखला जात असे. आधी हैदराबाद, मग मुंबई राज्य आणि १९६० साली महाराष्ट्र राज्याचा भाग असा प्रवास परभणी जिल्ह्याने केलेला आहे. परभणी जिल्ह्याने संतांची भूमी ही आपली ओळख दीर्घकाळापासून टिकवून ठेवली आहे. गंगाखेड येथील जनाबाई, नर्सीचे नामदेव महाराज, बोरी येथील गणपती, संत भोजलिंग काका (पोहंडुळ) भास्कराचार्य या महान प्रभूतींनी हा जिल्हा समृद्ध केला आहे.
भौगोलिकदृष्ट्या या जिल्ह्याला दोन भागात विभागता येईल. एक म्हणजे उत्तरेचा अजिंठा डोंगरात येणारा भाग, तर दुसरा दक्षिणेला असलेला बालाघाट डोंगराचा भाग. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासून उंची ४५७.६० मीटर इतकी आहे. गोदावरी हीच या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. नदीच्या पात्रात बरोबर मध्यभागी महादेवाचे मंदिर आहे. पूर्णा आणि दुधना या सुद्धा महत्वाच्या नद्या आहेत.
परभणी जिल्ह्यात धरणे आणि प्रकल्पांनी समृद्ध आहे. जिल्ह्यात येलदरी धरण, लोअर दुधना धरण, गोदावरी नदीवर असलेला मुदगल बांध, मासोळी नदीवरील मासोळी मध्यम प्रकल्प, कर्परा नदीवरील कर्परा प्रकल्प इतके जलप्रकल्प आहेत.
वाहतुकीच्या बाबतीत सांगायचं तर जिल्ह्यात अजूनही विमानतळ नाही.सध्यातरी नांदेड येथील विमानतळावर जिल्हावासी अवलंबून आहेत. पण भविष्यात येथे विमानतळ होण्याची शक्यता आहे. परभणी रेल्वेस्थानक हे मनमाड- सिकंदराबाद आणि परभणी-लातूर-परळी मार्गावरील प्रमुख जंक्शन आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ हा या जिल्ह्यातून गेला आहे.
महाराष्ट्रात असलेल्या चार कृषी विद्यापीठांपैकी एक वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीत आहे. जिल्ह्यातील प्रमुख पिके कापूस आणि ज्वारी हेच आहेत. साखर तसेच इतर पिकांच्या आयात-निर्यातीसाठी परभणी हे प्रमुख केंद्र मानले जाते.
भाविकांसाठी निमगिरी संस्थान जिंतूर येथील दिगंबर जैन तीर्थक्षेत्र श्रद्धास्थान आहे. निमगिरी आणि चंद्रगिरी या दोन पर्वतांवर हे क्षेत्र वसले आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य हे अतिशय मनमोहक आहे. तर परभणीपासून १८ किलोमीटरवर दूर पोखर्णी येथे भगवान नृसिंहाचे मंदिर आहे. येथे फक्त महाराष्ट्रच नाही, तर राज्याबाहेरूनही भक्त दर्शनाला येतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ आणि परभणी जिल्ह्यात होते. पण जिल्हा विभागणी झाल्यावर ते हिंगोली जिल्ह्यात गेले.
तुम्हाला परभणी जिल्ह्याची ही माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना जरूर शेयर करा.
उदय पाटील