computer

लोकशाहीच्या ३९० वर्षांनंतर उपराष्ट्राध्यक्षपती पोचणाऱ्या पहिल्या महिलेबद्दल जाणून घ्या!!

जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि तर कमला हॅरीस त्या सरकारमधल्या उपराष्ट्राध्यक्ष असतील. अमेरिकेत लोकशाहीची सुरुवात १६३०मध्ये झाली, पण आज तब्बल ४००वर्षांनंतर एक बाई उपराष्ट्रपती पदापर्यंत पोचू शकल्या आहेत हाही एक विरोधाभासच. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर काम करणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरतील. आज सर्वत्र पाहावे तिथे कमला हॅरीस ह्यांच्या नावाची चर्चा चालू आहे. या बाईंनी बऱ्याच गोष्टींत इतिहास घडवला आहे असे म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार हाती घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय-अमेरिकन वंशीय, पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन वंशीय आणि पहिल्या आशियाई वंशाच्या महिला ठरल्या आहेत. असो, चला तर मग ह्या प्रभावशाली बाईंबद्दल अजून थोडं जाणून घेऊयात.

कमला हॅरीस ह्यांचा जन्म कॅलिफोर्नियामधल्या ओकलँडचा. त्यांचं पूर्ण नाव कमला देवी हॅरीस आहे. त्यांचे आई वडील दोघेही अमेरिकेतले स्थलांतरित आहेत. आई श्यामला गोपालन ह्या भारतातील तामिळनाडू राज्यातल्या होत्या आणि त्या अमेरिकेत कॅन्सर संशोधक म्हणून काम करत होत्या. त्यांचे वडील डोनाल्ड हॅरिस मूळचे जमैकाचे. अर्थशास्त्रातील शास्त्रज्ञ म्हणून ते आजही कार्यरत आहेत. त्यांच्या आई वडिलांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आई श्यामला ह्यांनी एकटीनेच कमला आणि त्यांच्या बहिणीला लहानाचं मोठ केलं.

(कमला हॅरीस यांचे आईवडील)

आपल्या आत्मचरित्रात (The Truths We Hold) आई विषयी लिहिताना कमला हॅरिस म्हणतात  की, “माझ्या आईला ह्या गोष्टीची जाणीव होती की तिच्या दोन्हीही मुलींना अमेरिकेमध्ये वर्णद्वेषाचा सामना करावा लागणार. पण अशाही परिस्थितीत आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या जोरावर आयुष्यात उभं राहण्याची शिकवण माझ्या आईने मला दिली आहे. समाजातून वर्णद्वेष नष्ट होण्यासाठी कोणतीही लस अजून तयार झाली नाहीये, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन वर्णद्वेषाविरुध्द काम केले पाहिजे." कमला हॅरिस यांना वर्णद्वेषाचे दु:ख माहित आहे, कदाचित त्यामुळेच त्यांनी कॅलिफोर्नियाच्या सिनेटर  काम करत असताना कोविड १९ च्या काळात संस्थात्मक वर्णद्वेषाविरुद्ध लढण्यासाठी कायदेही लागू केले होते.

कमला हॅरीस ह्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या करियरची सुरुवात १९९० मध्ये अल्मेडा काउंटी, कॅलिफोर्निया येथील Deputy District Attorney म्हणून काम पाहण्यापासून सुरु झाली. २००३ साला पर्यंत त्या कॅलिफोर्नियातील सर्वात प्रभावशाली सरकारी वकील म्हणून ओळखल्या जात होत्या.

त्यांची राजकीय कारकीर्द पाहायची झाली तर सॅनफ्रान्सिस्कोच्या District Attorney म्हणून २००४ साली त्यांनी पहिली निवडणूक जिंकली. २०१० मध्ये कॅलिफोर्निया Attorney General म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या होत्या.

ह्या दोन दशकांत त्यांनी केलेल्या कामाचा आवाका हा बराच मोठा होता. कैद्यांना दिल्या जाणाऱ्या मृत्युदंडाच्या शिक्षेला त्यांनी विरोध केला होता. मृत्यूदंडाऐवजी आजीवन कारावासाची शिक्षा कैद्यांना द्यावी असं त्यांचं मत होतं. समलिंगी विवाहाबाबतही त्यांचे मत डावीकडे झुकणारे होते. कॅलिफोर्नियामधील  Attorney General म्हणून त्यांच्या कामावर बरीच टीकादेखील होत असते. त्यांनी घेतलेल्या बऱ्याच निर्णयांवर त्यांच्याच पक्षातील काहींनी त्यांच्यावर सतत  टीकाही केली आहे.

२०१७ साली कॅलिफोर्नियाच्या ज्युनिअर सिनेटर म्हणून त्या निवडून आल्या. एक प्रभावी वकील आणि नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा दिवसेंदिवस प्रबळ होतच होती. २०१९ साली टीव्हीवरील वादविवाद चर्चेदरम्यान त्यांनी जो बायडन ह्यांच्यावर कडकडून टीका केली होती. जो बायडन ह्यांची काही तत्वे वर्णभेदी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आर्थिक अडचणींमुळे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढायचे त्यांचे स्वप्न मात्र अपुरे राहिले. पण राजकीय वर्तुळातील त्यांचे वाढते वजन पाहून आणि लेडी बराक ओबामा ह्या त्यांच्या प्रतिमेला पाहून जो बायडन यांनी त्यांना डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचे रनिंग मेट म्हणून घोषित केले. आणि बाकी इतिहास तर आपल्या सर्वांसमोर आहेच. आज त्या अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. 

असे असले तरी कमला हॅरिस यांनी भारत सरकारच्या बऱ्याच निर्णयांवर वेळोवेळी आपली विरोधी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आगामी काळात भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध कसे असतील हे पाहणे खूप गरजेचे आहे.

 

लेखक: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required