computer

जगात सर्वत्र कुठेही सहज खपून जाणाऱ्या या खुर्चीनं आख्खं जग कसं जिंकलं हे ही जाणून घ्या!

कुठल्याही सार्वजनिक सभेला किंवा कार्यक्रमाला जा, तिथे प्लास्टिकच्या खुर्च्या ओळीने मांडलेल्या असतात. साधीसुधी दिसणारी पण आरामदायी अशी ही मोनोब्लॉक‌ खुर्ची आपण कधी ना कधी तरी नक्कीच वापरलेली असते.

आपल्याकडे या खुर्चीसाठी मोनोब्लॉक हा शब्द फारसा प्रचलित नाही.आपण तिचं नीलकमलची खुर्ची असं सर्रास बारसं करून टाकलंय.वास्तविक सुप्रीम इंडस्ट्रीज,विमप्लास्ट असे इतरही काही ब्रॅंड्स या प्रकारची खुर्ची तयार करतात, पण प्लॅस्टिक उत्पादनांच्या बाजारपेठेत नाव असलेल्या नीलकमलवरून ही खुर्ची अनेक ठिकाणी नीलकमलची खुर्ची म्हणून ओळखली जाते.या प्रकारच्या खुर्चीमध्ये इतर रंग असले तरी जास्त करून आपल्या डोळ्यासमोर पांढऱ्या, ऑफ व्हाईट, फिकट पिवळ्या, किंवा बदामी रंगाची खुर्ची येते. लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत कोणीही सहजपणे इकडून तिकडे ढकलत नेईल अशी ही खुर्ची वजनाला हलकी असली तरी प्रत्यक्षात धातूपेक्षाही मजबूत आहे.

एकीकडे आजही या खुर्चीचा जगातली सर्वोत्तम, स्वस्त नि मस्त खुर्ची म्हणून नावलौकिक कायम आहे, आणि दुसरीकडे तिच्या डिझाईनवर टीका करणारे अनेकजण आहेत. काही देशांमध्ये तर ही खुर्ची आजूबाजूच्या लँडस्केपची शोभा कमी करत असल्याचा आरोप करत ती रेस्टॉरंट वगैरेच्या बाहेर ठेवायला मनाईही आहे. मग या खुर्चीचं डिझाईन चांगलं म्हणायचं की वाईट?

ही खुर्ची सर्वत्र आढळते. कॅफेच्या बाहेर, ऑफिसमध्ये, एखाद्या सभेत, व्यासपीठावर असा कुठेही दिसणारा मामला आहे हा. डिझाईन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी खुर्चीचं डिझाईन हे नेहमीच इंटरेस्टिंग काम असतं. एखाद्याला असं वाटू शकतं, की एकदा खुर्चीत एक विशिष्ट डिझाईन तयार केलं की झालं! त्यात फारसे बदल होत नाहीत. परंतु खुर्चीच्या डिझाइनमध्येही गरजेनुसार बदल होत राहतात. बसणं हा खुर्चीचा बेसिक उपयोग असला, तरी आपण नक्की कशासाठी बसतोय त्यानुसार आपली बैठक बदलते आणि खुर्चीचं डिझाईनही. आपण आरामात बसून पेपर वाचत आहोत, की कॉम्प्युटरवर काम करत आहोत, की भाज्या चिरत आहोत यानुसार आपली शारीरिक स्थिती बदलते आणि त्याच्या शारीरिक स्थितीला सपोर्ट करणारं खुर्चीचं डिझाईन असावं लागतं. खुर्ची डिझाईन करताना तिची उपयुक्तता, गरज, आणि एकंदरीत रुपडं या सगळ्यांचीच विचारपूर्वक सांगड घालावी लागते. इतकंच नाही तर खुर्चीच्या डिझाईनमध्ये त्या त्या काळातल्या चालू फॅशनदेखील प्रतिबिंबित होतात. उदाहरणार्थ मार्सल बॉईर या डिझायनरने तयार केलेली वासिली चेअर ही त्यात वापरलेल्या स्टीलच्या नळ्यांमुळे बरीचशी सायकसारखी दिसते. वर्तुळाकार आणि अंडाकृती डिझाइन असलेल्या बॉल चेअर्समध्ये वापरलेले ठळक आणि उठावदार रंग हे साठ आणि सत्तरच्या दशकात वापरल्या जाणाऱ्या रंगांशी साधर्म्य दर्शवणारे आहेत. या काळातल्या अवकाश मोहिमांपासून प्रेरणा घेऊन त्यांची निर्मिती झाली होती.

पण मोनोब्लॉक खुर्ची वेगळी आहे. काहीशी अतिपरिचयात अवज्ञा प्रकारातली. साधं सोपं डिझाईन असल्यामुळे तिचा काही विशेष उपयोग असेल असं वाटत नाही. 'जिसमे मिलाए उसके जैसा' हे या खुर्चीच्या बाबतीत खरं आहे. ती जिथं ठेवाल तो तिचा हेतू. त्या अर्थाने ती स्टडी टेबलबरोबरही चालून जाते आणि कॉफी टेबलाच्या बाजूलाही शोभते. ती इतकी कॉमन आहे की एखाद्या बीचवर ती दिसली तर ती मुद्दाम कोणी आणून ठेवली आहे की पाण्याच्या एखाद्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहत आली आहे हेही समजणार नाही. स्वतःचं असं खास व्यक्तिमत्त्व नसलेली ही खुर्ची आहे. शिवाय टीकाकारांच्या मते या खुर्चीचं डिझाइन टिकाऊ नाही. पण ही खुर्ची सर्वसामान्यांना परवडण्यासारखी आहे. त्यामुळेच ही खुर्ची आम जनतेचे प्रतिनिधित्व करते. सामाजिक समता आणि आर्थिक प्रगती यांचं प्रतीक असलेली ही खुर्ची खऱ्या अर्थाने सर्व प्रकारच्या लोकांना सहजपणे हाताळता येण्याजोगी आणि म्हणूनच लोकशाहीवादी आहे.

तशी ही खुर्ची अलीकडची. १९४६ मध्ये कॅनडियन डिझायनर डी. सी. सिंपसन याने ही खुर्ची सर्वात प्रथम बनवली. या काळात अशा वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी मोल्डिंगची पद्धत विकसित झालेली नव्हती. शिवाय ही कल्पना त्या काळाच्या थोडीशी पुढची होती. पण साठच्या दशकात या प्लास्टिक मोल्डेड चेअरमध्ये डिझायनर्सना रस निर्माण झाला. यांची सुरुवातीची व्हर्जन्स म्हणजे हेल्मट बाट्झनरने तयार केलेली बॉफिंगर चेअर आणि जो कोलंबोचं चेअर युनिव्हर्सेल. या खुर्च्यांमध्ये अनेक मोल्डेड भागांचा वापर केलेला होता.

परंतु या खुर्चीच्या इतिहासातली सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे व्हेरनर पँटन याने तयार केलेली एकसंध अशी कॅन्टीलिव्हर ही खुर्ची. आज हा नमुना क्लासिक डिझाईन म्हणून वाखाणला जातो. आज वापरात असलेल्या प्लास्टिक मोल्डींगचा वापर करून तयार केलेली ही पहिली मोनोब्लॉक खुर्ची होती. याशिवाय पँटन खुर्चीचं डिझाईन असं आहे की या खुर्च्या एकावर एक अशा रचून ठेवता येतात. या खुर्चीला यश मिळाल्यावर जगभरात अशा अनेक खुर्च्या बनवल्या गेल्या. पुढे थर्मोप्लास्टिक हा स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आणि या खुर्च्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता यायला लागलं.

१९७२ मध्ये मॅसोनेट नावाच्या डिझाईनरने अजून एक डिझाईन तयार केलं. १९८३ मध्ये गार्डन चेअर बाजारात आली तोपर्यंत ही स्वस्तातली मोनोब्लॉक मोठ्या प्रमाणावर विकली गेली होती.

ही खुर्ची इंजेक्शन मोल्डिंग या तंत्राचा वापर करून बनवतात. यात पॉली प्रोपिलिन नावाच्या पॉलिमरच्या कणांना २२० डिग्री सेंटीग्रेड तापमानापर्यंत उष्णता दिली जाते आणि नंतर ते एका साच्यात ओतले जातात. त्यामुळे त्याला विशिष्ट आकार प्राप्त होतो. ही खुर्ची एकाच तुकड्यापासून बनवलेली असल्यामुळे तिला मोनोब्लॉक म्हटलं जातं. हे साचे अर्थातच महाग असतात. पण कच्चा माल, वेळ, मनुष्यबळ या सगळ्याचा विचार करता या प्रकारे उत्पादन घेऊनही ते आर्थिक दृष्ट्या परवडतं. मोनोब्लॉक प्रकारात असंख्य डिझाइन्स उपलब्ध आहेत. त्यांचे आकार, रंग, हॅंडल्स, पाठीचं डिझाईन या सगळ्यांमध्ये भरपूर पर्याय आहेत. काळानुरूप या डिझाईन्समध्ये देखील बदल होत आहेत. आज कमी जाडीच्या, आणि स्वस्त अशा खुर्च्याही बघायला मिळतात. वजनाला हलकी, तरी टिकाऊ आणि मजबूत अशी ही खुर्ची जागतिक स्तरावर अपील असलेली आहे. तुम्हाला ती आवडत असो वा नसो; तिला असलेली डिमांड कायम राहणार हे नक्की.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required