एका गमतीदार कोड्याचं उत्तर देणारी -प्रेग्नन्सी टेस्ट-नक्की कशी काम करते?
हे एक गमतीदार कोडं आहे..
अशी कोणती गोष्ट आहे जी काही जणांना सुखद धक्का देते
आणि काहींच्या पायाखालची जमीन सरकवते ?
विचार करा... तसा फार विचार करायची गरज नाही. तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतला असेल, किंवा खूप सिनेमे वगैरे पाहिले असतील तर दोन मिनिटात तुम्ही निदान अंदाज बांधू शकाल...
उत्तर: प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट!!!
अर्थातच, प्रेग्नन्सी हवी असणाऱ्यांसाठी, त्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी सुखद धक्का
आणि ती नको असलेल्यांसाठी किंवा 'प्रिपेअर्ड' नसणाऱ्यांसाठी जोर का झटका!
पण मुळात ही प्रेग्नन्सी टेस्ट नक्की कशी काम करते?
स्त्री गरोदर आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्टचा वापर केला जातो. त्यासाठी त्या स्त्रीच्या रक्तामध्ये किंवा लघवीमध्ये एचसीजी म्हणजे ह्यूमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉफीन नावाच्या हार्मोनचा अंश आहे की नाही याची तपासणी केली जाते. या हार्मोनची पातळी जास्त असणं हे गर्भधारणा झाल्याचं लक्षण आहे. विशेषतः फलित स्त्रीबीज गर्भाशयाच्या आतील अस्तराला चिकटल्यानंतर पहिल्या दहा आठवड्यांमध्ये या हार्मोनची पातळी जलद गतीने वाढते.
मासिक पाळीची तारीख चुकल्यानंतर साधारण एक ते दोन आठवड्यांच्या आत या युरीन टेस्टचे रिपोर्ट्स जास्त अचूक येण्याची शक्यता असते. कधीकधी गर्भधारणा होण्याच्या अगदी जवळपास ही युरीन टेस्ट केली जाते. त्यावेळी प्रत्यक्षात गर्भधारणा झालेली असतानाही प्रेग्नंसी टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. याचं कारण त्या वेळेपर्यंत शरीरातील एचसीजी हार्मोन्सचं प्रमाण टेस्टमध्ये दिसण्याइतपत वाढलेलं नसतं.
ही टेस्ट करायला अगदी सोपी आहे. ती स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन करता येते किंवा घरच्या घरी त्यासाठी मिळणार किट विकत आणूनही करता येते. या किटवरच्या सूचनांचं तंतोतंत पालन केल्यास टेस्टचा रिपोर्ट 97 ते 99 टक्के अचूक येतो. शिवाय अक्षरशः काही मिनिटात तुम्हाला रिपोर्ट मिळतो ते वेगळंच.
प्रेग्नन्सी आहे की नाही हे ब्लड टेस्ट मधूनही निश्चित करता येतं. अर्थात ही टेस्ट लॅबमध्ये जाऊन करावी लागते. रक्त तपासणीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रक्तात अगदी अत्यल्प मात्रेत असलेलं एचसीजी हार्मोनदेखील या टेस्टमुळे डिटेक्ट होतं. त्यामुळे ही चाचणी जास्त अचूक समजली जाते. परंतु प्रेग्नन्सी चेक करण्यासाठी सहसा ब्लड टेस्टचा वापर केला जात नाही. त्यासाठी स्वस्त, सोप्या आणि घरच्या घरी करता येण्यासारख्या युरीन टेस्टचाच आधार घेतला जातो.
आता मुळात ही प्रेग्नंसी टेस्ट करायची कशासाठी? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.याचं कारण गर्भधारणा झाल्याची लक्षणं बऱ्यापैकी सर्वसाधारण असतात. पाळी चुकणं, सकाळी उठल्यावर मळमळणं, वारंवार लघवीला जाण्याची भावना होणं ही लक्षणं सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये सामान्यतः आढळून येतात. या प्राथमिक लक्षणांवरून बहुतेकदा गर्भधारणेचा अंदाज बांधला जातो. मात्र याच काळात अन्य कुठल्या कारणासाठी- एखादी टेस्ट, एक्स-रे, एमआरआय इत्यादी करायची झाल्यास त्यामुळे- गर्भावस्थेतल्या बाळाला धोका उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीला काही प्रकारची औषधं देता येत नाहीत. त्यामुळे कुठल्याही विकारांवर उपचार करताना आधी प्रेग्नन्सी प्रेग्नंसी नसल्याची खात्री करून घेणं आवश्यक असतं. त्यासाठीही प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते.
घरच्या घरी प्रेग्नन्सी किट वापरून प्रेग्नन्सी टेस्ट करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. उदा. टेस्ट करण्याआधी किटचीएक्सपायरी डेट चेक करा
अचूक परिणाम दिसण्यासाठी शक्यतो सकाळच्या वेळचं युरीन सॅम्पल घ्या, कारण सकाळच्या वेळी लघवीमध्ये एचसीजीचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं.
शक्यतो टायमर वापरा. केवळ अंदाजाने वेळ मोजल्यास टेस्ट रिझल्ट चुकीचा येऊ शकतो.
या टेस्ट साठी फारशी तयारी करावी लागत नाही. फक्त टेस्टच्या आधी जास्त प्रमाणात पाणी पिऊ नका, कारण पाण्यामुळे लघवीमधलं एचसीजी डायल्यूट होण्याची शक्यता असते.
रिझल्टचा अर्थ
निगेटिव्ह/पॉझिटिव्ह ???
निगेटिव्ह
निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे लघवीमध्ये एचसीजीचा अंश आढळलेला नाही. अर्थात प्रत्येक वेळी निगेटिव्ह रिझल्ट म्हणजे प्रेग्नन्सी नाही असं नसतं. प्रेग्नन्सी असेल तरीदेखील टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. ही टेस्ट खूप लवकर म्हणजे शरीराने पुरेसं हार्मोन तयार करण्याच्या आधीच केली गेली तर लघवीमध्ये या हार्मोनचा अंश आढळत नाही. प्रेग्नन्सी च्या सुरुवातीच्या काळात एचसीजी हार्मोनचं प्रमाण दररोज वाढत जातं. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह आली तर परत आठवडाभराने ती करून पाहावी.
पॉझिटिव्ह
टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ लघवीमध्ये एचसीजी हार्मोनचा अंश आहे. याचा अर्थ प्रेग्नन्सी आहे. अशावेळी लवकरात लवकर स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला.
या प्रेग्नन्सी टेस्टवरून शरीरात एचसीजी हार्मोन्सचा अंश आहे की नाही हे ठरवता येतं, परंतु एचसीजी किती आहे हे पाहणाऱ्याही काही टेस्ट्स आहेत. या टेस्ट्सना क्वांटिटेटिव्ह एचसीजी टेस्ट असं म्हणतात. बहुतेक वेळा या ब्लड टेस्ट्स असतात.
या टेस्ट्स एचसीजी हार्मोन्सचं प्रमाण किती आहे हे मोजतात. एचसीजीच्या प्रमाणावरून डॉक्टरांना गर्भावस्थेबद्दल आणि अद्याप जन्माला न आलेल्या बाळाच्या शारीरिक प्रकृतीबद्दल अंदाज बांधता येतात. याशिवाय आणखी काही गोष्टी शक्य होतात. उदा.
१. गर्भाचं वय निश्चित करता येतं.
२. गर्भपाताचा धोका असेल तर अशा स्त्रीच्या प्रेग्नंसीवर देखरेख ठेवता येते.
३. गर्भावस्थेतील गुंतागुंत किंवा बाळामध्ये जन्मतः काही व्यंग असणं यांसारख्या समस्यांबद्दल आधीच माहिती मिळते.
लेख वाचून प्रेग्नन्सी टेस्टचं महत्त्व तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल.लेख कसा वाटला हे नक्की कळवा
-स्मिता जोगळेकर