आयडियाफोर्ज -ड्रोन बनवणार्या या कंपनीचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध ! अर्ज करावा का ?
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची-२६ नोव्हेंबर २००८-ची ती काळरात्र आपण कधीच विसरू शकत नाही.ताज हॉटेल वरच्या मजल्यांवर लपून बसलेल्या अतिरेक्यांना नेमके हेरून संपवण्यासाठी रात्रभर नौदलाची हेलीकॉप्टर आकाशात भिरभिरत होती. आपण सर्वजण जेव्हा हे घडताना टिव्हीवर बघत होतो त्याच वेळी मुंबईच्या आयआयटी होस्टेलमध्ये काही विद्यार्थी पण हे बघत होते. सर्वांच्या मनात एकच विचार घोळत होता.या हेलीकॉप्टरच्या ऐवजी आपल्याकडे 'ड्रोन' असते तर हे काम फारच सोपे झाले असते.त्यावेळी मानविरहित -सुटसुटीत- चपळ - दूरसंपर्कावर काम करणारे ड्रोन असते तर आणखी काही निष्पाप लोकांचे प्राण वाचू शकले असते. त्याचवेळी काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण ड्रोन बनवणारी कंपनी सुरु करूया आणि जन्म झाला 'आयडियाफोर्ज'या कंपनीचा !
कंपनीचे अपेक्षित मूल्य आजच्या तारखेस २५०० कोटी आहे.
आता थोडा वेळ कंपनीच्या प्रेरणादायी सुरुवातीचा भाग बाजूला ठेवून व्यवहाराच्या गोष्टी करू या.आजपासून या कंपनीचा -आयडियाफोर्जचा- पब्लिक इश्यू बाजारात दाखल झाला आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे -२९/०६/२०२३. लॉट साइज म्हणजे कमीतकमी समभागाची संख्या (२२) आहे.तुम्ही एकापेक्षा जास्त लॉटसाठीअर्ज करू शकता. एका समभागाची किंमत ६३८-६७२ च्या दरम्यान आहे.नव्या गुंतवणूकदारांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची ती अशी की ६३८-६७२ या टप्प्यातल्या तुम्हाला रुचेल त्या भावात समभाग घेण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता पण ज्या भावाचे जास्त अर्ज येतील त्याप्रमाणे समभाग वाटले जातील.तेव्हा ६७२ या भावात अर्ज करणे हितावह असेल.थोडक्यात या कंपनीचे अपेक्षित मूल्य आजच्या तारखेस २५०० कोटी आहे.
या कंपनीची आर्थिक बाजू कशी आहे
१ 'ड्रोन'सारख्या उत्पादनाला सर्वात जास्त मागणी संरक्षण खात्याची आहे. त्यामुळे सध्या कंपनीच्या एकूण उत्पादनापैकी ७५% उत्पादन संरक्षण खाते खरेदी करते. २०२१च्या ड्रोन हल्ल्यानंतर मागणी वाढली आहे.सिमावर्ती भागात गस्त घालण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात आहे.
२ संरक्षण क्षेत्र वगळता इतर अनेक क्षेत्रात ड्रोनची आवश्यकता आणि मागणी वाढते आहे. काही उदाहरणे बघू या.
-जवळजवळ ६६०००० खेड्यातील जमीनीचे नकाशे बनवणे ज्यामुळे महसूल खात्याचे काम सुरळीत चालेल.
- अमरनाथ यात्रेसारख्या ४० दिवसांच्या प्रवासाला जाणार्या भाविकांवर लक्ष ठेवणे.
- जंगलातील एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणार्या हत्तींसारख्या कळपावर लक्ष ठेवणे किंवा नरभक्षक वाघावर निगराणी करणे
-आणि सगळ्यात महत्वाचे अचानक येणारे पूर - दरडी कोसळणे अशा नैसर्गिक अपघातांच्यावेळी एनडीआरएफ सारख्या मदत दलांना मार्गदर्शन करणे.
थोडक्यात सांगायचे तर ही ड्रोन कंपनी मिरवणुकी आणि लग्नात वापरले जाणारे 'ड्रोन' बनवत नाही.
३ गेली १५ वर्षे या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. संरक्षण खात्याच्या unmanned aircraft systems (UAS) च्या ५०% किंवा अधिक ऑर्डर या कंपनीकडे असतात.production-linked incentive (PLI) scheme चा पूर्ण फायदा या कंपनीला मिळतो.
कंपनी पब्लिक इश्यूतून पैसे का गोळा करते आहे ?
आता प्रश्न असा आहे की खातेवही इतकी भरभक्कम असताना कंपनी पब्लिक इश्यूतून पैसे का गोळा करते आहे ?
१ आयडियाफोर्जला खाजगी गुंतवणूक कंपन्यावर अवलंबून रहायचे नाही. सध्या दोनच खाजगी कंपन्यांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. या कंपन्या म्हणजे इन्फोसिस आणि क्वालकॉम. या कंपनींचा दर्जात्मक सहभाग आवश्यक आहे. पण सर्व गुंतवणूक कंपन्या या दर्जाच्याच असतील असे नाही म्हणून पब्लिक इश्यू आणण्याची गरज आहे.
२ या कंपनीची स्पर्धा अदानींच्या ड्रोन कंपनी सोबत आहे. अदानींच्या कंपनीला इस्राएलसारख्या देशाचे तंत्रज्ञान मिळते आहे. इस्राएल या क्षेत्रात १९७४ पसून कार्य करते आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अधिक पैशाची गरज भासणार आहे.
३ भारतात ड्रोन आयात करण्यास बंदी आहे पण ही बंदी सरकारी संरक्षन खात्याला लागू नाही.संरक्षण खाते येत्या काळात काही अमेरिकन कंपन्यांकडून ४००० कोटी रुपयांचे काही खास ड्रोन खरेदी करणार आहे. हे ड्रोन बनवणे सध्या तरी आयडियाफोर्जला शक्य नाही.
आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या कामकाजाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही भाग समजावून सांगीतले आहेत. पब्लिक इश्यूत अर्ज टाकायचा की नाही हा निर्णय तुमच्या सल्लागाराला विश्वासात घेऊन तुम्ही ठरवा.