अश्रूंचे फोटो? त्यांचे प्रकार आणि त्यांतला फरक आपल्याला काय सांगतो?
फोटोत दिसणारा प्राणी कोणता आहे? अमिबा किंवा कोणता तरी सूक्ष्मजीव वाटतो की वेगळंच काही? खरं तर हा फोटो मधमाशांचा आहे. अत्याधुनिक अशा ‘हाय रेझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोप’ या सूक्ष्मदर्शकाखाली ठेऊन मधमाशांचा हा फोटो घेण्यात आला आहे. हे काम केलंय फोटोग्राफर रोझलीन फिशर यांनी. २०१० साली बी (Bee) नावाच्या त्यांच्या पुस्तकात हा फोटो सामील केला गेला होता. या पुस्तकात मधमाशांच्या शरीराच्या अत्यंत सूक्ष्म पद्धतीने घेतलेल्या फोटोंचा साठा आहे.
तर, २०१३ साली रोझलीन फिशर यांनी नवीन प्रकल्प हातात घेतला. पण यावेळी प्रकल्पाचा विषय कोणी प्राणी किंवा कीटक नव्हता, तर चक्क एका थेंबावर आधारित प्रकल्प होता. हा थेंबही पाण्याचा नाही, तर मानवी अश्रूचा थेंब आहे. या प्रकल्पाचं नाव होतं Topography of Tears. हा प्रकल्प काय होता, अश्रूच्या एका लहानशा थेंबातून कोणती आश्चर्यकारक दृश्यं आणि माहिती समोरआली ही सारं आजच्या लेखातून जाणून घेऊया.
फिशर यांचं म्हणणं आहे की, "आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं ते फक्त भल्यामोठ्या हिमनगाचं लहानसं टोक आहे." म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मधमाशांचा प्रकल्प हातावेगळा केल्यानंतर एके दिवशी त्यांच्या डोक्यात विचार आला की अश्रूचा एक थेंब कसा दिसत असेल? आपल्या डोळ्यांनी दिसणारे अश्रू वेगळे आणि फिशर यांच्या रेझोल्युशन ऑप्टिकल मायक्रोस्कोपमधून दिसणारे अश्रू खरंच वेगळे!!
सुरुवातीला त्यांनी स्वतःच्याच अश्रूचा थेंब सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला. फिशर म्हणतात की, "हा अनुभव म्हणजे विमानातून खालची जमीन बघण्यासारखा होता." फिशर इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी त्यापलीकडे जाऊन विचार केला की "दुःखाचे अश्रू, आनंदाश्रू आणि कांदा चिरताना निघालेले अश्रू यांत फरक असावा का?" हा विचारच भन्नाट होता. इथूनच या प्रकल्पाची सुरुवात झाली. त्यांनी जवळजवळ अश्रूंचे १०० थेंब पडताळून पाहिले. यात त्यांचे स्वत:चे अश्रू तर होतेच, पण इतरांचेही अश्रू त्यांनी तपासून पाहिले.
फिशर यांना पडलेल्या प्रश्नात खरंच तथ्य होतं? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आधी आपण अश्रूचे प्रकार जाणून घेऊया? अश्रूंचे पण प्रकार असतात? हो नक्कीच असतात.
१. सायकिक टियर्स
आनंदाने किंवा दुःखाने डोळ्यात येणाऱ्या पाण्याला शास्त्रीय भाषेत सायकिक टियर्स म्हणतात. हे अश्रू फक्त टोकाच्या भावना आवेगात येतात. म्हणजे खूप आनंद झाल्यावर किंवा अत्यंत दुःखद प्रसंगी असे अश्रू येतात.
२. बेसल टियर्स
या प्रकारातील अश्रुचे थेंब नेत्रपटलाला (कॉर्निया) वंगण म्हणून सोडण्यात येतात. हे अश्रू नियमितपणे वाहात असतात, फक्त ते वाहात आहेत हे आपल्याला जाणवत नाही..
३. रिफ्लेक्स टियर्स
तिसऱ्या प्रकारचे रिफ्लेक्स टियर्स हे एखाद्या गोष्टीची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून येतात. डोळ्यात धूळ गेली, डोळ्यांना इजा झाली किंवा कांदा कापत असताना जे अश्रू वाहतात त्यांना रिफ्लेक्स टियर्स म्हणतात. अचानक घडलेल्या प्रकाराला प्रतिक्रिया म्हणून हे अश्रू येतात.
(कांदा कापल्यावर येणारे अश्रू.)
(दुःखाचे अश्रू)
(आनंदाश्रू)
(वंगण म्हणून येणारे अश्रू)
अश्रूंचे प्रकार जाणून घेतले, आता मुलभूत फरकही जाणून घेऊया. तिन्ही प्रकारातील अश्रूंत मीठ हा पदार्थ समान आहे. मात्र त्यासोबत येणारे इतर पदार्थ समान नसतात. एवढंच नाही तर त्यांचे अणुरेणूही वेगळे असतात. फिशर यांच्या प्रकल्पातून त्यांच्या रेणूंची संरचना कशी वेगळी असते हे दिसून आलं. उदाहरणार्थ, दुःखात येणाऱ्या अश्रूंमध्ये leucine enkephalin सारख्या रसायनाचा समावेश असतो. वैज्ञानिक भाषेत leucine enkephalin रसायनाला नैसर्गिक पेनकिलर म्हणतात. ज्यावेळी शरीरावर ताण असतो तेव्हा शरीराला आराम मिळावा म्हणून हे रसायन स्त्रवू लागतं. leucine enkephalin रसायन खरं तर neurotransmitter प्रकारातील आहे. neurotransmitter हे चेतातंतूच्या टोकाला असणाऱ्या रसायनांना दिलेलं नाव आहे. या रसायनांवर आपल्या शरीराचं बरंचसं काम अवलंबून असतं.
अश्रूंची वर्गवारी झाली, त्यांच्यातील रासायनिक फरक समजून घेतले. तरी प्रत्येक अश्रू वेगळा दिसतो. याचं कारण असं की प्रत्येक थेंब वेगवेगळ्या पद्धतीने कोरडा होतो. या कारणाने एकाच प्रकारातील अश्रूंचे दोन थेंब अगदी निराळे दिसतात. फिशर यांनी घेतलेल्या फोटोंची हीच खासियत आहे. फिशर यांच्या भाषेत ही दृश्यं म्हणजे ‘भावनांच्या भूप्रदेशाचे हवाई दर्शन आहे.’
पाचहून अधिक वर्षे अश्रू सूक्ष्मपणे पाहिल्यानंतर फिशर यांच्यासाठी अश्रू म्हणजे पाणी आणि मीठाचं मिश्रण राहिलेलं नाही. फिशर यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, "अश्रू हे भूक, मृत्यू यांच्यासारखेच अत्यंत मुलभूत आहेत. अश्रूचा प्रत्येक थेंब आपल्यामध्ये मानवी अनुभवांना घेऊन आलेला असतो."
वाचकहो, फिशर यांनी केलेलं काम तुम्हाला कसं वाटलं? हा लेख आवडला का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा!!