मधुमेहींना HbA1c ची टेस्ट वारंवार का करावी लागते ?
पॅथॉलॉजीची HbA1c ही टेस्ट मधुमेहींना दर तीन ते चार महिन्याला डॉक्टर करायला सांगतात. यामुळे रोग्याचा मधुमेहावर किती ताबा आहे किंवा मधुमेहानी रोग्याचा किती ताबा घेतला आहे ते कळतं .पण या टेस्ट बद्दल अनेकांना माहितीच नसतं .ही टेस्ट कधी करायची ? का करायची ? किंवा तीन महिन्यांनीच का करायची ? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात त्याची उत्तरं देण्यासाठी हा आजचा लेख आहे.
चला तर मग सर्वात प्रथम HbA1c या टेस्ट बद्दल जाणून घेऊया ..
Hb म्हणजे हिमोग्लोबीन (Haemoglobin) हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
Haemoglobin आपल्या रक्त पेशींचा तो एक भाग आहे .खरंतर आपल्या रक्ताला लाल रंग प्राप्त होतो तो या हिमोग्लोबीनमुळेच !
आणि हे हिमोग्लोबीन प्राणवायूची देवाण घेवाण करायला मदत करत असते..हे आपण जाणतोच मग याचा रक्तातल्या शुगरशी काय संबंध ?..
तर या हिमोग्लोबीनचे काही प्रकार आहेत.त्यातला HbA हा जो प्रकार आहे त्यात त्याचे उपप्रकार देखील आहेत HbA1 हा त्यापैकीच एक जो रक्तातल्या ग्लुकोजला म्हणजेच रक्ताच्या साखरेला जोडतो.आणि तयार होतो HbA1c ! ! ही एक सर्वसाधारण जैविक प्रक्रिया आहे नॉर्मल माणसांच्या शरीरामध्ये सुद्धा रक्तातील साखर हि HbA1c शी जोडली गेली असते .. आणि सगळ्यांच्याच शरीरातील HbA1c च मापन केलं जाऊ शकतं.
पण जेंव्हा मधुमेह असतो तेंव्हा रक्तातील साखर प्रमाणापेक्षा जास्त वाढते आणि अर्थातच ही साखर HbA1c ला चिकटून बसते .रक्तातल्या साखरेचं प्रमाण जितकं जास्त तितकी या A1 ला चिटकलेली साखर जास्त आणि HbA1c चा आकडा जास्त.
थोडक्यात काय HbA1cही तपासणी मधुमेहाच्या विकाराची तीव्रता निदान करण्यासाठी वापरता येते किंवा मधुमेहाच निदान झाल्यानंतर त्याचा शरीरावर असलेला ताबा किती आहे हे समजत.
आता याचे 'कट -ऑफ' काय असतात ते समजून घेऊ या. जेंव्हा आपण ही टेस्ट निदान करण्यासाठी वापरतो तेंव्हा HbA1c हे जर ५.७ च्या खाली असेल तर ते नॉर्मल समजलं जातं .. जर ५.७ ते ६.४ च्या मध्ये असेल तर प्री डायबेटिक म्हणतात .. प्री डायबेटिस म्हणजे नॉर्मल आणि डायबेटिस च्या मधली स्टेज थोडक्यात यामध्ये मधुमेह होण्याची शक्यता आहे पण मधुमेह अजून झाला नाही .. अशी जी फेज आहे त्याला प्री डायबेटिस म्हणतात.HbA1c ची पातळी ६.४ पेक्षा जास्त HbA1c असणं मधुमेहाच्या निदानासाठी वापरली जाते.ज्यांचा HbA1c (६.४) पेक्षा जास्त असतो त्यांना मधुमेह झाला आहे हे म्हणायला हरकत नाही .याचे निदान झाल्यानंतर आहारामध्ये , जीवनशैलीमध्ये बदल केले जातात.औषध उपचार केले जातात यानंतर HbA1c ची पातळी किती असायला हवी हे मागर्दर्शन डॉक्टर करतात .सर्वसाधारण मधुमेहाने HbA1c हे ७ पेक्षा कमी ठेवावं .हे प्रमाण वयानुसार बदललं जातं. लहान मुलानं मध्ये जो मधुमेह असतो त्यांच्याबाबती मध्ये व जे वयस्कर लोक आहेत यांच्यामध्ये HbA1c लेव्हल थोडी जास्तीची ठेवली जाते.पण ज्यांना तरुण वयामध्ये मधुमेह होतो त्यांनी HbA1c कंट्रोल मध्ये ठेवावा.
तुमच्या मनात प्रश्न आला असेल की HbA1c या तपासणीमुळे मागच्या तीन ते चार महिन्यांचा ब्लड शुगरची सरासरी समजते पण मग तीन ते चार महिन्यांचाच अवधी का ? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही ? तर या मागे एक कारण आहे.आपल्या रक्तातल्या लाल पेशींचं आयुष्य हे साधारणतः तीन ते चार महिने असतं.त्यामुळे ग्लुकोज किती चिटकलेली आहे याच प्रमाण HbA1c मध्ये बघू शकतो.
तर ही झाली या टेस्टची सर्वसाधारण माहिती पण तुम्हाला अधीक मोलाचा सल्ला तुमचे डॉक्टरच देऊ शकतील !
अभिषेक मिनाक्षी कोकरे