computer

कथा गुप्तहेरांच्या - भाग ६ : 'रॉ'ची स्थापना, सिक्कीम विलीनीकरण, बांगलादेशची निर्मिती....आर एन काव यांची कामगिरी थक्क करणारी आहे !!

रॉ!!! हे नाव वाचता बरोबर कित्येकांच्या अंगावर काटा उभा राहतो. गेली ७० वर्षे भारताच्या अंतर्गत आणि बाहेरील अशा दोन्ही शत्रूंशी दोन हात करणारी ही संस्था. ह्या संस्थेने घडवलेल्या काही महान गुप्तहेरांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या. पण आज अशा अफलातून माणसाची कथा आपण वाचणार आहोत ज्यांनी रॉ घडवली.

१९६२ साली भारताचा चीनसोबतच्या युद्धात पराभव झाला, त्याला कारण होते आपल्याला शत्रूराष्ट्रांच्या हालचाली व्यवस्थित टिपता आल्या नव्हत्या. हीच गोष्ट बऱ्यापैकी १९६५ च्या युद्धातसुद्धा नजरेत आली होती. म्हणून तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी एक पूर्णपणे स्वतंत्र अशा संस्थेची स्थापना करायचे ठरवले. हे काम त्यांनी सोपवले एका अत्यंत प्रभावशाली अशा अधिकाऱ्यावर, त्यांनी या संस्थेची ब्ल्यू प्रिंट बनवली आणि त्यांनाच या संस्थेचे पहिले डायरेक्टर करण्यात आले. सोबतच त्यांनी Aviation research centre ची देखील स्थापना केली होती.

रामेश्वर नाथ काव हे त्या अधिकाऱ्याचे नाव. १० मे १९१८ रोजी त्यांचा जन्म काश्मिरी स्थलांतरित कुटुंबात वाराणसी येथे झाला. १९३९ साली ते ब्रिटिश पोलिसदलात दाखल झाले आणि १९४७ साली त्यांची नियुक्ती आयबी या संस्थेत करण्यात आली. काव यांच्या चपळपणाचा एक किस्सा सांगितला जातो. भारत स्वतंत्र झाल्यावर १९५० साली इंग्लंडच्या राणीचा भारतात पहिला दौरा होता. मुंबईत एका समारंभात एक बुके राणीकडे फेकण्यात आला होता. तो बुके काव यांनी हवेतल्या हवेत पकडला होता, त्यावर राणीने कौतुक करताना गुड क्रिकेट अशी टिप्पणी देखील केली होती.

रॉ साठी एजंट निवडण्याचे काम काव स्वतः करत असत. त्यांनी निवडलेल्या अजेंट्सना कावबॉईज म्हटले जात असे. एवढी त्यांची मजबूत पकड संस्थेवर होती. खऱ्या अर्थाने काव यांच्या कर्तृत्वाची महती पटली ती १९७१ च्या युध्दावेळी.

रॉची स्थापनाच मुळी युद्धात आलेल्या अपयशाने झाली होती. साहजिकच रॉच्या स्थापनेनंतर होणाऱ्या युद्धात रॉला महत्वपूर्ण कामगिरी बजावणे भाग होते. बांगलादेश युध्दावेळी बांगलादेशातील मुक्तवाहिनी सक्रिय होती. तिला वेळोवेळी ताकद देण्याचे काम त्यावेळी रॉ करत होती. त्याचाच परिणाम म्हणून तिथे पाकिस्तान आर्मी कमकुवत ठरू लागली. आणि भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे पाडून जगाचा नकाशाच बदलला.

इस्राईलची मोसाद आणि भारताच्या रॉचे संबंध आज सलोख्याचे आहेत. याची सुरुवातच मुळात काव यांनी केली. रॉ च्या सुरुवातीच्या काळात म्हणजे ७० च्या दशकात काव यांनी मोसादकडे मदत मागितली होती. त्यावेळी या दोन्ही संस्थांच्यापुढे दहशतवाद हा मोठा शत्रू होता.

१९७५ साली घडून आलेल्या सिक्कीम विलीनीकरणात काव यांनी बजावलेली भूमिका ही महत्वपूर्ण होती. चीन पाय पसरेल त्याआधी भारताने काहीतरी करणे गरजेचे होते. अगदी तसेच झाले आणि सिक्कीम भारतात सामील करण्यात आले.

काव यांनी नॅशनल सिक्युरिटी गार्डची देखील स्थापना केली होती याचा उद्देश पंजाबमधील दहशतवाद आटोक्यात आणणे हा होता. देशांतर्गत दहशतवादसुद्धा तेवढ्याच क्रूरपणे मोडून काढला पाहिजे याचे महत्व त्यांनी आपल्या कृतीतून पटवून दिले होते.

(नॅशनल सिक्युरिटी गार्ड)

काव यांनी केलेले कार्य हे निश्चित मोठे आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभले त्याचा पूर्ण उपयोग त्यांनी देशप्रेमासाठी केला. २००२ साली वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तब्बल तीन पंतप्रधानांसोबत काम करून देशसेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. आयुष्यभर ते प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यांचे फक्त दोन फोटो आहेत यावरून त्यांच्या निस्पृह स्वभावाची कल्पना येते.

आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या त्यांच्या आयुष्यावर बेतलेली वेबसिरीज येऊ घातली आहे. साजिद नाडीयादवाला हा त्या सिरीजची निर्मिती करणार आहे. त्यात नाना पाटेकर काव यांची भूमिका साकारण्याची शक्यता आहे. तसेच करण जोहरनेसुद्धा काव यांच्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा जानेवारीत केली होती.

 

आणखी वाचा :

कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!

कथा गुप्तहेरांच्या - भाग २ : चक्क पाकिस्तानी आर्मीत मेजरच्या पदावर पोचलेला 'ब्लॅक टायगर' रवींद्र कौशिक !!

कथा गुप्तहेरांच्या - भाग ३ : फाशीची शिक्षा होऊनही मृत्युच्या दाढेतून सुखरूप परतलेले काश्मीर सिंग !!

कथा गुप्तहेरांच्या - भाग ४ : भारताची वयाने सर्वात लहान गुप्तहेर, तिच्या कामासाठी जपानच्या राजानेही तिचा सन्मान केला होता!!

कथा गुप्तहेरांच्या - भाग ५ : ऑपरेशन ब्ल्यू, एयरस्ट्राईक, कंदाहार अपहरण...एक ना अनेक मोहिमा यशस्वी करणारे अजित डोवाल !!

सबस्क्राईब करा

* indicates required