वर्दीतल्या दुर्गा: शीना बोरा, जिया खान अशी महत्त्वाची प्रकरणे सांभाळलेल्या IPS नीना सिंग
राजस्थान पोलिसात नीना सिंग यांचे नाव खूप अदबीने घेतले जाते. आयपीएस अधिकारी नीना सिंग या राजस्थान पोलिस खात्यातल्या पहिल्या महिला आयपीएस आहेत आणि त्यांच्या कामगिरीने नुकतेच त्यांना डीजी पदही मिळाले आहे. राजस्थान पोलिसांच्या इतिहासातील पहिल्या महिला डीजी म्हणून त्यांनी काम सुरू केले आहे. त्या काळात पोलीस दलात येऊन पुरुषांच्या बरोबरीने काम करताना त्यांना अनेक आव्हाने आली. पण त्यांची कामात जिद्द आणि चिकाटी पाहून खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांचे कौतुक केले. इतक्या मोठ्या पदावर पोहोचणाऱ्या नीना सिंग यांची यशोगाथा अनेकांना प्रोत्साहन देणारी आहे. त्यांच्या कारकिर्दीची ओळख आज थोडक्यात करून घेऊयात.
राजस्थानमध्ये नीना सिंग या कार्यरत असल्या तरी त्या मूळच्या बिहारमधल्या पाटणाच्या आहेत. त्यांचा जन्म ११ जुलै १९६४ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटणा येथे झाले. पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्या दिल्लीला गेल्या. त्यांनी जेएनयू, दिल्ली येथून मास्टर्स केले.
नीना सिंग यांनी १९८९ साली यूपीएससी पूर्ण केले. १९८९ च्या बॅचमधून आयपीएस अधिकारी नीना सिंग यांना मणिपूर केडर मिळाले होते. लग्नानंतर त्यांना राजस्थान केडर मिळाले. त्यानंतर त्या मास्टर्स डिग्रीसाठी यूकेमधील हार्वर्ड विद्यापीठात गेल्या. नीना यांचे पती रोहित कुमार सिंग हे राजस्थानचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.
नीना सिंग यांनी एसपी अजमेर रेंज आयजीसह विविध पदांवर काम केले आहे. सीबीआयमध्ये सहा वर्षे सहसंचालक पद भूषवले. सीबीआयमध्ये काम करणे हे अतिशय कौशल्याचे काम असते. देशातल्या खळबळजनक आणि खूप चर्चा असणाऱ्या संवेदनशील केसेस सीबीआयमध्ये हाताळाव्या लागतात. नीना सिंग यांनीही या आव्हानांना सामना करत अनेक महत्त्वाची प्रकरणे यशस्वीपणे सोडवली आहेत. सीबीआयमध्ये असताना शीना बोरा हत्या प्रकरण, जिया खान प्रकरण, जेके क्रिकेट घोटाळा, बॉम्बे स्फोट प्रकरण, मायावतींचा एनआरएचएम भ्रष्टाचार इत्यादी प्रकरणे त्यांच्या समोर आली. या केसेसचे गूढ सोडवण्यात नीना सिंग यांची महत्वाची भूमिका होती.
नीना सिंग यांना राष्ट्रपती पोलीस पदकासह अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांची कर्तव्यनिष्ठा आणि काम करण्याची तत्परता यामुळे राजस्थानमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांना राजस्थान पोलिसांकडून राष्ट्रपती पोलीस पदकासह सन्मानित करण्यात आले आहे. नीना सिंह या राजस्थानसह संपूर्ण देशात त्यांच्या उत्कृष्ट कार्यशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची कामगिरी पाहून मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
नीना सिंग त्यांच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याव्यतिरिक्त त्या एक अभ्यासक ही आहेत. पोलिस आणि सर्वसामन्य यांचे संबंध, पोलीस ठाण्यात अजून कोणत्या सुधारणा करता येतील यासाठी त्यांनी एक व्यापक शोधनिबंध लिहिला आहे. यासाठी त्यांनी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यासह २५० पोलीस ठाण्यांचा अभ्यास केला. राजस्थान विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा करताना गेहलोत यांनी नीना सिंग यांच्या या संशोधनाचे वर्णन पोलीस खात्यासाठी खूप क्रांतिकारक विचाराचे असल्याचे म्हटले होते.
नीना सिंग महिलांच्या बाबतीत खूप संवेदनशील आहेत. राजस्थानमधील राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव असताना नीना सिंह यांनी महिलांसाठी अनेक सुरक्षा व्यवस्था केल्या. राजस्थानच्या महिला आयोगाची प्रशासकीय व्यवस्था तयार करण्याचे श्रेय आयपीएस नीना सिंग यांना जाते.
नीना सिंग यांचे कर्तृत्व अनेकांना प्रेरणा देणारे आहे. आज वयाच्या ५६ व्या वर्षी ही त्या तितक्याच तत्परतने काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की पोलीस दलात अधिकाधिक मुली आणि महिलांनी पुढे जाऊन मोठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्याही या क्षेत्रात अनेक महत्वाची पदे सक्षमपणे सांभाळू शकतात. त्यांना विश्वास आहे की भविष्यात पूर्ण देशात महिला पोलिस या क्षेत्रात आल्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडतील.
शीतल दरंदळे
वर्दीतल्या दुर्गा: १५ महिन्यांत १६ दहशतवाद्यांना मारणारी लेडी दबंग ऑफिसर 'संजुक्ता पराशर' !
वर्दीतल्या दुर्गा: उत्तर प्रदेशची पहिली महिला आयपीएस ऑफीसर 'कांचन चौधरी भट्टाचार्य'