वर्दीतल्या दुर्गा: मुख्यमंत्र्याच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्या गेलेल्या पहिल्या महिला IPS -सुभाषिनी शंकरन!!
कुठल्याही राज्याचे सर्वोच्च जबाबदारीचे पद म्हणजे मुख्यमंत्रीपद! आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे हे त्यापेक्षाही जबाबदारीचे काम. हे काम अजिबात सोपे नाही. आसामसारख्या संवेदनशील राज्यात जिथे गुंडगिरी, अतिरेकी कारवाया, सांप्रदायिक तणाव, तस्करी, ड्रग्जची ,जनावरांची हत्या यासारख्या अनेक समस्या आहेत अशा भागात तर ते आणखीच अवघड होते. या अशा भागात ही मोठी जबाबदारी एका स्त्रीच्या हातात येणे ही खूप मोठी बाब आहे. पण सुभाषिनी शंकरन या IPS अधिकाऱ्यानी ही जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून ती यशस्वीरीत्या पूर्णही केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येण्याच्या सुभाषिनी या देशातील पहिल्या महिला आयपीएस आहेत. आजच्या भागात सुभाषिनी शंकरन यांच्याविषयी जाणून घेऊयात.
सुभाषिनी यांचा जन्म तमिळनाडूच्या तंजावर येथे झाला. त्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील एका खाजगी फर्ममध्ये काम करतात आणि आई गृहिणी आहे. सुभाषिनीचे आई-वडील १९८० मध्ये मुंबईला आले. त्यामुळे त्यांनी आपले शालेय शिक्षण ठाणे, कल्याण आणि मुंबई येथून केले. सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात त्यांनी पदवी घेतली आहे. शिक्षणाची खूप आवड असल्याने त्या शाळा-कॉलेजात नेहमी अव्वल राहिल्या. कॉलेजमध्ये २००५-०६ साली त्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी ठरल्या होत्या. पुढील शिक्षणासाठी सुभाषिनी दिल्लीला आल्या. तिथे त्यांनी जेएनयूमधून समाजशास्त्रात मास्टर्स आणि एमफिल केले. तसेच यूपीएससीची तयारी केली. २०१० मध्ये त्यांनी यूपीएससी उत्तीर्ण केले. त्यांचा रँक होता २४३!!
त्यानंतर त्यांनी सरदार वल्लभभाई पोलिस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतले. आसाम येथे आयपीएस अधिकारी म्हणून कार्यभाग स्वीकारला. एका महिलेला इतक्या मोठ्या पदावर काम करताना पाहणे अनेकांना खुपत होते. पण सुभाषिनी म्हणतात, पोलिसात कर्तव्य करताना स्त्री पुरुष असा भेदभाव करु नये. हे अशी अवघड जबाबदारी आहे जिथे चुकीला जागा नाही. कामाची वेळ ठरलेली नसते. घरची कारणं, वैयक्तिक जबाबदाऱ्या बाजूला ठेवाव्या लागतात. १५-१८ तास काम करावे लागते.
जुलै २०१६ मध्ये सुभाषिनी शंकरन यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची सुरक्षा प्रभारी बनवण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर सोपवल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा अनुभव सांगताना त्या म्हणतात, “प्रत्येकासाठी ही एक नवीन गोष्ट होती. एका महिलेने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा टीमचे नेतृत्व करणे विचित्र होते, पण लोकांनी हळूहळू ते स्वीकारले. कारण मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचे काम सोपे नाही. पहिले पोलीस पथकाला जाऊन पाहावे लागते की मुख्यमंत्री जिथे भेट देणार आहेत ते स्थान सुरक्षित आहे. आजूबाजूच्या परिसराची चौकशी करावी लागते. त्या जागेची पूर्ण तपासणी करावी लागते. मुख्यमंत्र्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग जाणून घेणे, त्यांच्या जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधणे, त्यांच्या रक्षकांना सूचना देणे, हे पूर्णवेळ काम आहे. ब्रेक घेता येत नाही." पण तरीही ही अवघड जबाबदारी सुभाषिनीने अतिशय चोखपणे पार पाडली.
ही जबाबदारी मिळण्यापूर्वी शंकरन यांनी आसाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केले. प्रथम त्यांना गुवाहाटीमध्ये एएसपी म्हणून पोस्टिंग मिळाले. यानंतर त्यांनी विश्वनाथ, सिलचर आणि तेजपूर येथे अतिरिक्त एसपी म्हणून काम केले. तिथे त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. २३ डिसेंबर २०१४ साली नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या विभाजित गटाने सोनितपूर जिल्ह्यात ३० आदिवासींची हत्या केली. ही खळबळजनक घटना घडली तेव्हा पोलिसांना अनेक प्रश्न विचारले गेले. पण सुभाषिनी यांनी परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात घेऊन सर्व हाताळले. त्या टीमसोबत २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. परिस्थिती बिघडण्यापूर्वी मृतदेह ताब्यात घेतले. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी रात्रभर चाललेल्या फायरिंग मध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांनी ऑपरेशन 'ऑल आउट' सुरू केले. ज्यामध्ये आसाम पोलीस देखील सहभागी झाले होते, सुभाषिनी देखील त्यात सहभागी होत्या.
अजून मोठे काम त्यांनी केले ते म्हणजे विश्वनाथ चारली येथे राहत असताना, सुभाषिनी आणि त्यांच्या टीमने काझीरंगाजवळ गेंडा मारणाऱ्या आणि तस्करी करणाऱ्या गोळीला मोठया शिताफीने पकडले. २०१६ मध्ये आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान शांततापूर्ण मतदान होण्यासाठी त्यांना पोलीस अधीक्षक म्हणून हैलाकांडी जिल्ह्यात पाठवण्यात आले होते. त्यांचा कामाचा अनुभव व धाडसी निर्णय घेण्याची क्षमता पाहून त्यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. कठीण परिस्थितींना तोंड देत असताना नेहमी कुठे बोलावे, किती बोलावे आणि कधी बोलावे हे त्यांना खूप व्यवस्थित माहीत आहे. त्या म्हणतात, “जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बोला, जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच कृती करा. होय, परंतु कायद्याच्या कक्षेत."
सुभाषिनी यांना वाचनाची खूप आवड आहे, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या चरित्रे वाचतात. त्याला जाझ आणि लोकसंगीत ऐकायलाही खूप आवडते. सुभाषिनीच्या कुटुंबात पोलिसांची पार्श्वभूमी नाही. पण असे असूनही त्यांनी अनेक स्टिरिओटाइप तोडून करीयरच्या या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यांची कर्तव्यनिष्ठा पाहून आसाममधील सर्वसामान्य जनततेला सुरक्षित वाटते.त्यांनी आपल्या कामाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे.
अशा या IPS अधिकाऱ्याला सलाम!
शीतल दरंदळे