कथा गुप्तहेरांच्या - भाग ९ : ब्रिटिश साम्राज्य कंदाहार ते बोखारापर्यंत पसरवणारा परंतु इतिहासात हरवलेला भारतीय गुप्तहेर !!
गुप्तहेरांच्या मालिकेतला आजचा गुप्तहेर फार वेगळा आहे. हा गुप्तहेर महत्त्वाचा आहे, पण दुर्दैवाने यांची आठवण कोणत्याही प्रकारे जपली गेली नाहीय. हा गुप्तहेर आहे मोहनलाल झुत्शी उर्फ आगा हसन जान उर्फ मोहनलाल काश्मिरी उर्फ मिर्झा कुली काश्मिरी. हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं नसेल. कारण हा स्वातंत्र्यपूर्व काळातला भारतीय गुप्तहेर आहे. या मोहनलालने ब्रिटिश शासनाच्या कंदाहार ते बोखारापर्यंतच्या विकासामध्ये मोठी कामगिरी बजावली.
मोहनलालचा जन्म साधारण १८१२साली झाला असेल असे मानले जाते. ते जन्माने काश्मिरी हिंदू पंडित, पण हेरगिरी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळी नावे घेतली आणि प्रसंगी मुस्लिम असल्याची बतावणीदेखील केली. मोहनलाल ब्रिटिशांच्या संपर्कात कसे आले याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. पण एक मात्र नक्की की साधारण १८३८मध्ये त्यांनी ब्रिटिशांसाठी हेरगिरी करण्यासाठी पर्शिया-अफगाणीस्तानात दौरे केले होते.
सन १८३८ ते १८४२ या कालखंडात पहिले अँग्लो-अफगाण युद्ध लढले गेले. याला ब्रिटिशांच्या इतिहासात "डिझास्टर इन अफगाणिस्तान"म्हणजेच अफगाणिस्तानातले अरिष्ट म्हणून ओळखले जाते. हे युद्ध ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी आणि अफगाणिस्तानातल्या पश्तून आदिवासी टोळ्यांमध्ये लढले गेले. या युद्धादरम्यान मोहनलाल झुत्शींना ईस्ट इंडिया कंपनीच्या गुप्त खात्याकडून कॅप्टन अलेक्सण्डेर बर्न्स यांचा राजकीय अधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले.
कॅप्टन अलेक्सण्डेर बर्न्स हे अफगाण युद्धात दोन विरोधी टोळ्यांना एकमेकांसोबत लढवून ईस्ट इंडिया कंपनीला भारतावर सत्ता मिळवून देण्यात महत्वाचे शिलेदार होते. तिथले एक अधिकारी सर जॉन विल्यम यांच्या शब्दांत "रणनीती बनवण्यात धुरंदर" अशा ह्या झुत्शींनी लाचलुचपत आणि सौद्याची भाषा करून स्थानिक सरदारांना आपल्या ताब्यात घेतले. अगदी बिनविरोध काबूल काबीज करण्यात ते सफळ ठरत होते. पण मोहनलाल झुत्शींच्या साथीदारांनी या सरदारांना चांगली वागणूक दिली नाही. मोहनलालनी त्यांना ताकीद दिली. पण ही ताकीद झुगारून या साथीदार अधिकाऱ्यांनी तिथल्या लोकांविरोधात अमानुष आर्थिक धोरणे अंमलात आणली व तेथील स्त्रियांचा छळ मांडला. या सर्व युद्धात कळीची आणि इतर बरीच गुप्त माहिती मोहनलाल यांनी मिळवली.
(अँग्लो-अफगाण युद्ध)
हे युद्ध बिटिशांनी जिंकले, त्यांच्या बऱ्याचशा पलटणींना त्यांच्या कामगिरींबद्दल पुरस्कार आणि पदके दिली गेली. पण यातला एकही पुरस्कार किंवा पदक मोहनलाल यांच्या वाट्याला आले नाही. या पूर्ण युद्धातल्या त्यांची भूमिका आणि योगदान खूप महत्त्वाचं होतं. असं असताना डावललं गेल्याचं शल्य मोहनलालना खूप वाटलं आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला रामराम ठोकला. या काळातल्या घटनांवर मोहनलाल यांनी "लाईफ ऑफ द आमिर दोस्त मोहम्मद खान ऑफ काबूल विथ हिज पॉलिटिकल प्रोसिडिंग्ज टूवर्ड्स द इंग्लिश, पर्शियन अँड रशियन गव्हर्नमेंटस इंन्क्लुडिंग व्हिक्टरी अँड डिझास्टर्स ऑफ ब्रिटिश आर्मी इन अफगाणिस्तान" https://www.wdl.org/en/item/17705/view/1/11/ आणि "ट्रॅव्हल्स इन पंजाब, अफगाणिस्तान अँड तुर्कस्तान टू बाल्क, बोखरा अँड हेरत अँड व्हिझिट टू ग्रेट ब्रिटन अँड जर्मनी" https://archive.org/details/travelsinpanjab00llgoog/page/n6/mode/2up ही दोन खणखणीत पुस्तकंही लिहिली. दोन्ही पुस्तकं आंतरजालावर वाचण्यासाठी दिलेल्या दुव्यांवर उपलब्ध आहेत, इच्छुकांनी जरूर याचा लाभ घ्यावा.
हे युद्ध संपल्यावर दोन वर्षांनी १८४४ मध्ये युरोपच्या दौऱ्यावर असताना मोहनलालना राणी व्हिक्टोरियाकडून निमंत्रण आले. या सोहळ्यात मोहनलाल यांनी पर्शियाच्या फ्रेडरिक विल्यम सहावे यांच्यासोबत शाही भोजन केले आणि त्यानंतर त्याला अब्बास मिर्झा यांच्या हस्ते 'पर्शियाच्या शूर सिंहांतील एक' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना चक्क ज्या देशाविरोधात हेरगिरी केली होती त्यांच्याकडूनच मिळाला होता. हा पुरस्कार तसा लहानसहान नव्हता. दुर्रानी साम्राज्याचा शाह शूजा मुल्ककडून देण्यात येणारा तो राष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार होता.
मोहनलाल झुत्शींच्या बाबतीत एक किस्सा वाचायला मिळतो. सन १८३३च्या फेब्रुवारी महिन्यात आगा हसन जहाँ नावाच्या माणसाला पर्शियातल्या मेशाद प्रांतातील न्यायालयात उभं करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा काश्मीरमध्ये राज्य करणाऱ्या राजा रणजित सिंग यांच्या सामर्थ्य आणि आर्थिक बळकटीबद्दलच्या प्रश्नांची सरबत्ती केली जात होती. पर्शियाचा अब्बास मिर्झा काश्मीर जिंकण्याची अपेक्षा घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत होता. पण हा आगा हसन जहाँ नावाचा भारतीय तरुण सहजासहजी झुकत नव्हता. तो ताठ मानेने अभिमानाने म्हणाला, "अरे, रणजित सिंग महाराजांच्या राजभवनाची जमीनसुद्धा काश्मिरी शालीने आच्छादित आहे. एवढे ते आर्थिकरित्या श्रीमंत आहेत. आणि जर आमच्या सेनापती हरीसिंग यांना त्यांच्या सैन्याच्या रक्षणासाठी सिंधू नदी जरी ओलांडून जावी लागली तरी ते त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील एवढे ते सामर्थशाली आहेत."
असल्या उर्मट उत्तराची त्या युवराजाने अपेक्षा नव्हती. तोही क्षणभर बिथरला आणि त्याच्या भवनातील सदस्यांना मिश्कीलपणे हसत आणि त्या गुप्तहेराला त्याच्या धर्माची आठवण करवून देत तुच्छतेनेच म्हणाला, "हा पाहा इंग्रजी शिक्षणाचा दुष्प्रभाव!! या शिक्षणामुळे एका मुस्लिमाला एक काफिरसुद्धा आपला देव वाटायला लागला." त्या युवराजाला हे ठाऊक नव्हते की शियापंथीय मुसलमानाच्या वेशात त्याच्यासमोर उभा हा गुप्तहेर तरुण खरंतर हिंदू पंडित मोहनलाल झुत्शी आहे.
असा हा लढवय्या, जगभर प्रवास केलेला, मुत्सद्दी, परराष्ट्रनीतीमध्ये निपुण असलेला, आपल्या अनुभवांवरती पुस्तके लिहिणारा गुप्तहेर १८७७मध्ये मृत्यू पावला. त्याचं पार्थिव आझादपुरमधल्या तेव्हाच्या दिल्ली-पानिपत महामार्गावरच्या एका बगिच्यात पुरण्यात आले. तेव्हा तो मिर्झा कुली काश्मिरी या नावाने ओळखला जात असे. त्याची हैदरी बेगम नावाची एक आणि इतर १७ पत्नींनाही तेथेच पुरण्यात आले. मात्र तेव्हापासून आजवर ह्या महान गुप्तहेराची कबर दुर्लक्षित राहिली आहे. मोहनलाल झुत्शी नावाच्या या काश्मिरी तरुणाने ब्रिटन साम्राज्याच्या कंदाहार ते बुखारा विस्तारात मोलाची भूमिका बजावली, त्याच्या नावे कोणते स्मारक किंवा कोणताही सन्मानही नाही. ब्रिटिशांनी केवळ मोहनलाल यांच्यावर अन्याय केला असे नाही. मोहनलाल यांची पत्नी हैदरी बेगम या मुस्लिम स्कॉलर होत्या. १८५७ च्या बंडावेळी त्यांनी घडलेल्या घटनांची नोंद करणारी त्यांनी डायरी लिहिली होती. पण इंग्रजांनी ती डायरी जप्त केली. शेवटचे काही दिवस या कुटुंबाला अत्यंत हालाखीत काढावे लागले.
अशा परिस्थितीत इंटरनेट आणि विविध वेबसाईट्स यांचे उपकार मानावे तितके थोडके वाटतात. https://www.wdl.org/ आणि https://archive.org/ सारख्या संस्था दुर्मिळ पुस्तके आणि संदर्भ घरबसल्या उपलब्ध करून देतात आणि अशा विस्मरणात गेलेल्या महान लोकांच्या कार्याची महती कळते.
कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!