कथा गुप्तहेरांच्या - भाग ८ : देशाची गुप्त माहिती अमेरिकेला देणारा गुप्तहेर. तो कोण होता आणि त्याचं पितळ कसं उघडं पडलं?

सगळेच लोक काही सारखे नसतात. जिथं देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारे असतात, तिथेच स्वार्थासाठी फंदफितुरी करणारेही असणारच. आजवर तुम्ही देशासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या, स्वतःचे सर्वस्वावर पाणी सोडणाऱ्या गुप्तहेरांची कहाणी वाचली. पण आज अशा गुप्तहेराची गोष्ट आम्ही सांगणार आहोत ज्याने देशासोबत गद्दारी केली. या माणसाने काही पैशांसाठी देशाची महत्वपूर्ण माहिती विकली.
रबिंदर सिंग एक निवृत्त आर्मी अधिकारी होता. तिथे तो मेजरच्या हुद्द्यावर होता. त्याने स्वखुशीने रॉ (RAW)मध्ये काम मिळवले. तिथेही तो काही सिनियर एजंट्सपैकी तो एक होता. असं म्हणतात की १९९०मध्येच सीआयएच्या एका बाईने हा मासा गळाला लावला होता आणि तेव्हापासून तो भारताची गुप्त माहिती अमेरिकेला कळवत होता. त्याने तशी बरीच माहिती अमेरिकेला कळवली असावी. रॉचे बरेच अधिकारी त्याला रिपोर्ट करत. त्यातल्या कित्येकांना ही माहिती दुसऱ्या देशाकडे जात आहे हे ही माहित नव्ह्ते पण काहीजणांना याची कल्पना होती असं म्हणतात.
तर रबिंदरच्या बऱ्याच कामगिऱ्यांपैकी एक कामगिरी समजली जाते ती म्हणजे इराकची माहिती अमेरिकेला पोचवणे. साल २००३. तेव्हाअमेरिका आणि इराक या दोन देशांमधले संबंध प्रचंड तणावाचे झाले होते. अमेरिकेला शंका होती की इराककडे धोकादायक असे जैविक बॉम्ब आहेत. पण इराकवर थेट हल्ला करण्यापूर्वी इराकमधल्या अंतर्गत गोष्टींची पुरेशी माहिती गोळा करणे देखील गरजेचे होते. यासाठी भारत अमेरिकेस चांगली मदत करू शकत होता. कारण त्यावेळी भारत आणि इराकचे संबंध चांगले होते. तसेच रॉ(RAW)चे काही अधिकारीदेखील इराकमध्ये होते. यातलाच एक होता रबिंदर सिंग!!! तसेही रबिंदरला लालूच आणि प्रलोभने देऊन सीआयएने स्वतःकडे वळवले होते आणि अमेरिकेला हवी असलेली सगळी महत्वाची माहिती त्याने अमेरिकेपर्यंत पोचती केली.
काही दिवसांनी तो भारतात परतला. भारतात परतल्यावर तो रॉच्या मुख्य कार्यालयात त्याच्या कामासंबंधित नसलेल्या गोष्टींमध्येही रस घेऊ लागला. त्याची एकूण सगळी देहबोली बदललेली वाटत असे असे सांगण्यात येते. एकदा रॉच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान डिपार्टमेंटमध्ये काही कागदपत्रांचे फोटो काढताना काही अधिकाऱ्यांनी त्याला पाह्यले. सुदैवाने त्यांनी लागलीच रॉच्या काउंटर इंटेलिजन्स विंगला यासर्व प्रकाराबद्दल सांगितले. काउंटर इंटेलिजन्स विंगचे काम असते रॉच्या अधिकाऱ्यांवर नजर ठेवणे आणि रॉचा एखादा एजंट दुसऱ्या देशांपर्यंत आपली माहिती पोहोचवत आहे का हे पाहणे.
यानंतर रॉने रबिंदरवर करडी नजर ठेवायला सुरुवात केली. त्याचे फोन टॅप करण्यात येऊ लागले. त्याच्या ऑफिसमध्ये कॅमेरे लावण्यात आले. त्याच्या कारमध्ये माईक लावण्यात आला. यासर्व गुप्त कारवायांदरम्यान रॉकडून एक चूक झाली. रबिंदरच्या ऑफिसमधील एका क्लर्ककडून रॉचे अधिकारी माहिती गोळा करू लागले आहेत याचा रबिंदरला सुगावा लागला. आता रबिंदरला कळून चुकले होते की आपला खेळ संपला आहे. आज ना उद्या सत्य समोर येईल आणि तेव्हा रॉच्या तावडीतून सुटणे शक्य नाही हे ही त्याला माहित होते.
रबिंदरला माहीत होते की आता वेळ वाया घालणे योग्य नाही. त्याने लागलीच भारत सोडण्याची तयारी सुरू केली. अर्थातच या कामात सीआयएने त्याची चांगली मदत केली. एके दिवशी अचानक रबिंदर आपली पत्नी परमींदर कौरला घेऊन भारत सोडून नेपाळला निघून गेला. तिथे त्या दोघांचे बनावट पासपोर्ट तयार ठेवण्यात आले होते. या नव्या पासपोर्ट्समध्ये रबिंदर आणि त्याच्या पत्नीचे नाव राजपाल प्रसाद शर्मा आणि दीपा कुमार शर्मा असे होते.
रबिंदर देश सोडून पळून गेला ही गोष्ट तेव्हा प्रचंड धक्कादायक ठरली होती. सर्व वर्तमानपत्रांत ही बातमी आली. मीडियामध्ये त्याने देशाचे केलेले नुकसान आणि पुढे तो कशाप्रकारे धोकादायक ठरू शकतो या गोष्टी प्रचंड चर्चिल्या जात होत्या. त्याच्या पलायनाचा सरकारने धसका घेतला. परदेशांतल्या एजंटसच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या बदल्या केल्या, काहींना मायदेशी बोलावलं. रबिंदरला माहिती पुरवणाऱ्या रॉ अधिकाऱ्यांचय बदल्या करून त्यांना विनामहत्त्वाची साधी खाती देण्यात आली. अमेरिकेतून त्याची माहिती मिळावी म्हणूनही बरेच प्रयत्न करण्यात आले पण त्याची कुठलीच गोष्ट भारताला काढून घेण्यात यश मिळाले नाही. २००७साली भारताने रबिंदरची माहिती मिळवण्याचे प्रयत्न करणे बंद केले. शेवटपर्यंत अमेरिकेने तो त्यांच्या देशात आहे हे कबूल केलेच नाही.
भारत सरकारच्या सूत्रांनुसार २०१६ साली अमेरिकेतील मेरिलॅन्ड येथे तो एका रोड अपघातात मारला गेला. एक स्थलांतरित म्हणून तिथे तो दिवस काढत होता. अमेरिकेत पळून गेल्यावर त्याने राजकीय आश्रय मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचे अर्ज फेटाळण्यात आले होते. तिथे पोचल्यावर एकदोन वर्षांतच सीआयएने त्याला मदत करणे बंद केले होते. त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासत होती. त्याचे नोकरी मिळावी म्हणून केलेले अर्ज सुद्धा नाकारण्यात येत होते. अशाप्रकारे हलाखीचे जिवन जगत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
भारताच्या हेरगिरीच्या इतिहासात रबिंदर सिंगचं कुप्रसिद्ध आहे!!