अर्थशास्त्रात नोबेल मिळवणाऱ्या अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल ५ महत्वाच्या गोष्टी !!
भारतीयांना अभिमान वाटेल अशी एक बातमी काल आली. जगातलं दारिद्र्य कमी करण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयोगाबद्द्ल माईकेल क्रेमर, एस्थर डूफ्लो आणि भारताचे अभिजित बॅनर्जी यांना एकत्रितपणे २०१९ चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. नोबेल पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरेल.
(अभिजित बॅनर्जी यांच्या आई निर्मला बॅनर्जी)
१. अभिजित बॅनर्जी यांच्या रक्तातच अर्थशास्त्र आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांची आई निर्मला बॅनर्जी या कलकत्याच्या 'सेंटर फोर स्टडीज इन सोशल सायन्स'मध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या, तर वडील दीपक बॅनर्जी हे कलकत्याच्या प्रेसिडेन्सी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.
२. अभिजित बॅनर्जी यांनी आपलं शिक्षण कलकत्ता विद्यापीठातून पूर्ण केलं. हार्वर्डमधून त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. Essays in Information Economics हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता.
३. अभिजित बॅनर्जी हे सध्या मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नोलॉजीमध्ये फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. २०१५ साली त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या सल्लागार समितीत काम केलं.
४. त्यांनी केलेलं महत्वाचं काम आणि ज्यासाठी त्यांना नोबेल मिळाला त्या ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’ (J-PAL) ची स्थापना त्यांनी २००३ साली केली. ही एक जागतिक दर्जाची संशोधन संस्था आहे. जगातलं दारिद्र्य कमी करण्याच्या दृष्टीने या संस्थेत संशोधन होतं. सरकार, सामाजिक संस्था इत्यादींच्या सहाय्याने दारिद्र्यावर मात करण्याचे प्रयत्न ही संस्था करते.
(अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो)
J-PAL स्थापन करण्यात अभिजित बॅनर्जी यांच्यासोबत सेंतील मुल्लीनाथन आणि अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी एस्थर डूफ्लो यांचाही महत्वाचा वाटा आहे. एकत्रितपणे नोबेल मिळालेल्या मोजक्या दाम्पत्यांपैकी अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डूफ्लो हे दोघे आहेत.
५. अभिजित बॅनर्जी यांनी आपल्या अर्थशास्त्राच्या संशोधनातून काही पुस्तकेही लिहिली आहेत. "What the "Poor Economics" (२०११) आणि Making Aid Work (२००७) ही दोन पुस्तके त्यापैकी महत्वाची आहेत. यावर्षी त्याचं “Economy Needs Now" (२०१९) हे नवीन पुस्तक प्रकाशित झालं आहे.
मंडळी, भारतीय नागरिकाला मिळालेलं हे दुसरं अर्थशास्त्रातील नोबेल आहे. यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळालं होतं. ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.