कथा गुप्तहेरांच्या - भाग ३ : फाशीची शिक्षा होऊनही मृत्युच्या दाढेतून सुखरूप परतलेले काश्मीर सिंग !!
आज आपण अशा गुप्तहेराबद्दल वाचणार आहोत ज्याला पाकिस्तानात फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. फाशीवर चढविण्यासाठी दोन तास बाकी असताना त्यांच्या फाशीवर स्थगिती आली. याला दैवाचा खेळ म्हणा की योगायोग, पण काश्मीर सिंग नावाचा हा लढवय्या गुप्तहेर मात्र मृत्यूच्या दाढेतून परत आला होता.
कश्मीर सिंग पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील नांगलचोरा गावाचे रहिवासी होते. १९६७ साली ते पोलीस दलात दाखल झाले होते. पाकिस्तानात गुप्तहेर म्हणून गेल्यावर ते कराची येथे गेस्ट हाऊसमध्ये राहून दिवसभर बसने प्रवास करून माहिती गोळा करत असत.
त्यांना सोपवलेले काम म्हणजे पाकिस्तान आर्मीच्या हालचालींवर नजर ठेवणे आणि सोबत पाकिस्तान आर्मीच्या सगळ्या हालचाली ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणांचे फोटो काढून भारतात पाठवणे. पण शेवटी परक्यावर दाखवलेला विश्वास आडवा आला!!! त्यांचा गाईड म्हणून भासवणाऱ्याने त्यांची माहिती पाकिस्तानला दिली. १९७३ साली कश्मीर सिंग यांना रावळपिंडी येथून अटक करण्यात आली.
कश्मीर सिंग पकडले गेले तेव्हा त्यांचं वय होतं फक्त ३२ वर्ष!! त्यानंतर त्यांना भारतात परतण्यासाठी ३५ वर्षं वाट पाहावी लागणार होती. ते परतले तेव्हा त्यांचं भारतातलं सारं जग बदललं होतं. त्यांच्या गावाचं नावसुद्धा बदलून नांगलखिलाडिया झालं होतं.
कश्मीर सिंग यांना अटक झाल्यावर त्यांना पाकिस्तानी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. २८ मार्च १९७८ ही फाशीची तारीखसुद्धा निश्चित करण्यात आली होती. सिंग यांना फाशी द्यायला फक्त २ तास बाकी असताना त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आली. पण त्यांची सुटका मात्र झाली नाही.
पुढे ३५ वर्षं पाकिस्तानमध्ये कश्मीर सिंग नरकयातना भोगत होते. पण एके दिवशी पाकिस्तानी मानवाधिकार मंत्री अन्सार बर्नी हे तुरुंगात पाहणी करत असताना काश्मीर सिंग यांच्याबद्दल त्यांना समजले. त्यांच्या पुढाकाराने सिंग यांची सुटका करण्यात आली. महत्वाची गोष्ट म्हणजे या कालावधीत सिंग यांनी चुकून देखील देशाबद्दल कुठलीही गोष्ट पाकिस्तानला सांगितली नाही.
काश्मीर सिंग भारतात परतले तेव्हा वाघा बॉर्डरवर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बॉर्डरवर त्यांचे कुटुंब त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांच्या मुलाला त्याप्रसंगी विचारण्यात आले की, तुम्ही तुमच्या वडिलांना ओळखणार का? तर त्यावर त्यांनी दिलेले उत्तर होते, "माझ्या शरीरात त्यांचे रक्त आहे, कसे नाही ओळखणार!!!" काश्मीर सिंगना अटक झाली होती तेव्हा त्यांच्या मुलाचे वय फक्त ४ वर्षं होतं.
बाहेर आल्यावर सिंग यांनी सांगितले की, "मृत्यूची शिक्षा सुनावल्यावर जिवंत राहाणे कठीण होते, पण शेवटी म्हणतात ना, 'उम्मीद पे दुनिया कायम है' आशा ही एकमेव गोष्ट होती जिने मला जिवंत ठेवले."
काश्मीर सिंग यांची सुटका झाल्यावर पाकिस्तानी दलाने टाळ्या वाजवल्या, भारतीयांनी त्यांना फुलं आणि मिठाई दिली. बर्नी यांनी त्यांना प्रेमवृक्ष संबोधले. बर्नी यांनी सांगितले की, 'असे पहिल्यांदा होत आहे की, पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या एखाद्या सरकारी गाडीत एका कैद्याने प्रवास केला आहे."
बाहेर आल्यावर सिंग यांनी सांगितले की ३५ वर्षांच्या शिक्षेपैकी तब्बल २५ वर्षं त्यांनी काळकोठडीत काढली. लोखंडी गजाने बांधलेल्या अवस्थेत ते १८ वर्षं राहिले. छळाचे हातापायावरील व्रण मी आयुष्यभर विसरू शकत नाही असेही ते म्हणाले होते.
काश्मीर सिंग पुढे सांगतात की, आपल्या लहान लहान मुलांना पुन्हा बघण्याची इच्छा मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. २०१८ साली दिलेल्या एका मुलाखतीत सिंग यांनी म्हटले होते की एवढे सगळे होऊनही जर आजही देशाने मला पुन्हा काम दिले तर मी देशासाठी बलिदान द्यायला नेहमी तत्पर आहे. यावरून समजून येते की असे देशप्रेमाने भारलेले हे लोक हे खूप वेगळे रसायन असतात.
आणखी वाचा :
कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!