कथा गुप्तहेरांच्या - भाग ५ : ऑपरेशन ब्ल्यू, एयरस्ट्राईक, कंदाहार अपहरण...एक ना अनेक मोहिमा यशस्वी करणारे अजित डोवाल !!
गेले काही दिवस अनेक साहसी गुप्तहेरांच्या कथा तुम्ही वाचल्या आहेत. पण सद्यस्थितीत धाडसी गुप्तहेर म्हटले म्हणजे कोण डोळ्यासमोर येते? बऱ्याच लोकांच्या डोळ्यांसमोर एकाच व्यक्तीचा चेहरा आला असेल, तो म्हणजे अजित डोवाल!!!
अजित डोवाल हे कदाचित भारताच्या इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध गुप्तहेर असतील. यामागील कारणे देखील तशीच आहेत. आजवर त्यांनी अनेक कठीण मोहिमा पार पाडल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईक आणि गेल्यावर्षी केलेल्या एयरस्ट्राईकमागे देखील त्यांचाच मेंदू असल्याचे सांगितले जाते.
सध्या भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार असलेल्या अजित डोवाल यांचा जन्म २० जानेवारी १९४५ रोजी उत्तराखंड येथील पौढी गढवाल येथे झाला. त्यांचे वडील सैन्यात असल्याने त्यांना देखील आर्मी स्कूलमध्ये टाकण्यात आले होते. १९६८ साली ते IPS झाले आणि इथून खऱ्या अर्थाने त्यांचे थरारक आयुष्य सुरू झाले.
अजित डोवाल ७ वर्षं पाकिस्तानात राहून आल्याचे सांगितले जाते. पण याबद्दल या गुप्त कारवाया असल्याने त्याबद्दल अजूनही विशेष माहिती उपलब्ध नाही. पण त्यांचे माहीत असलेल्या अनेक मोहिमा त्यांच्या साहसाची आणि हुशारीची ग्वाही देतात.
अमृतसर येथे १९८९ साली राबवल्या गेलेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. या मिशनसाठी त्यांनी चक्क एका रिक्षावाल्याची वेशभूषा केली होती. रिक्षावाल्याच्या वेषात डोवाल आत घुसले आणि मध्ये असलेल्या सगळ्या परिस्थितीची इत्यंभूत माहिती घेऊनच ते बाहेर आले होते. आत किती लोक आहेत, कोण कुठल्या ठिकाणी उभा आहे, कुणाकडे कुठले हत्यार आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी थांग लावला होता.
त्याआधी १९८४ साली सुवर्णमंदिरातच झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये देखील त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यावेळी त्यांनी स्वतःला पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून भासवले आणि खलिस्तानींचा विश्वास जिंकला होता. या विश्वासाच्या आधारावर त्यांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली होती.
१९९१ साली रोमानियाचा राजदूत लिव्हियू राडू यांचे अपहरण खलिस्तान लिबरेशन फ्रंटद्वारा करण्यात आले होते. त्याला अजित डोवाल यांनी आपल्या असामान्य मुत्सद्देगिरीच्या जोरावर सोडवून आणले होते.
काश्मिरात केलेले त्यांचे कार्य तर अतिशय कौतुकास्पद असे आहे. त्यांच्याबद्दल सांगितले जाते की त्यांनी फुटीरतावादी संघटनांमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी काही फुटीरतावादी लोकांचे त्यांच्यातच राहून मतपरिवर्तन केले होते. त्याचबरोबर एक मुख्य भारतविरोधी फुटीरतावाद्याला आपल्या बाजूने वळवून त्याच्याकडून महत्वाचे रहस्य त्यांनी जाणून घेतले होते.
१९९९ चं कंदाहार अपहरण तसेच गेल्या काही वर्षात झालेल्या मिशन्समध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याच त्यांच्या कारनाम्यांमुळे त्यांना भारताचा जेम्स बॉण्ड म्हटले जाते.
आणखी वाचा :
कथा गुप्तहेरांच्या - भाग १ : पाकिस्तानच्या अणू संशोधनाची हेरगिरी करणारे मोहनलाल भास्कर!
कथा गुप्तहेरांच्या - भाग ३ : फाशीची शिक्षा होऊनही मृत्युच्या दाढेतून सुखरूप परतलेले काश्मीर सिंग !!