कथा गुप्तहेरांच्या - भाग १० : एकाचवेळी ५ देशांना ठकवून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचं योगदान देणारा गुप्तहेर !!
स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या रॉ या भारतीय गुप्तचर संस्थेने अनेक धाडसी आणि पराक्रमी गुप्तचर देशाला दिले. त्यापैकी काही लोकांबद्दल आपण या लेखमालेत वाचले आहे. पण स्वातंत्र्यापूर्वीदेखील बऱ्याच गुप्तहेरांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. आज आपण ज्या गुप्तहेराबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी एकाचवेळी पाच देशांना टोपी घातली. प्रसंगी खुद्द हिटलरलासुद्धा मामा बनविले. हे होते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रमुख साथीदारांपैकी एक - भगत राम तलवार!!
भारतात स्वातंत्र्यलढा ऐन भरात होता. इंग्रज काहीही करून चळवळ दडपण्याच्या मागे लागले होते. त्याचाच एक भाग म्हणून सुभाषबाबूंना त्यांच्याच घरात नजरकैद करून ठेवण्यात आले होते. नेताजी वेष बदलून तेथून निसटले. पण त्यांना एका माणसाने ओळखले. तो इंग्रज नव्हता, तर नेताजींवर प्रेम करणारा देशभक्त होता. नेताजी माणसे ओळखायला कधी कमी पडत नसत. त्यांनी त्याच्यातले गुण ओळखले. तेव्हापासून त्याला नेताजींनी महत्वाच्या कामी पाठवायला सुरुवात केली. त्याचे नाव होते, भगत राम तलवार!!! पुढे हेच भगतराम तलवार गुप्तहेर जगतात सिल्व्हर म्हणून ओळखले गेले.
नेताजी वेषांतर करून काबूलपर्यंत तर पोहोचले होते. पण त्यांना तिथून सोडवून सोव्हियत रशियामार्गे जपान आणि जर्मनीपर्यंत पोहोचविण्याचे काम भगत राम यांच्याकडे सोपविण्यात आले होते. विना पासपोर्ट आणि विना कागदपत्रांचे कसे बाहेर पडायचे याचा शोध घ्यावा लागणार होता. भगत राम तलवार यांच्या आयुष्यावर मिहीर घोष नावाच्या लेखकांनी : द इंडियन स्पाय' नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी या घटनेचा उल्लेख पुढीलप्रमाणे केला आहे.
२२ फेब्रुवारी १९४१ रोजी दुपारी एक बुटकासा मनुष्य काबूमधल्या इटालियन दूतावासात गेला. अफगाणी टोपी घातलेल्या या माणसाचा वेष बघून त्याचा कुणाला संशय आला नाही. त्याला इटालियन राजदूताला भेटायचे होते. पण तो राजदूत कुणाही सोम्यागोम्याला कसा भेटेल? या बुटक्याशा माणसाने तो एक स्वयंपाकी आहे आणि राजदूताचा स्वयंपाक बनविण्यासाठी तो येथे आला आहे असे सांगितले. राजदूतासमोर गेल्यावर त्याने सांगितले की त्याला हेर थॉमस यांनी पाठविले आहे. इटालियन राजदूताने खात्री करण्यासाठी थॉमस यांना फोन केला. या फोननंतर राजदूतसाहेब या आपल्या माणसाशी चांगले वागू लागले. या बुटक्या माणसाने तिथे स्वतःचे नाव रहमत खान आहे असे सांगितले. असेही सांगितले की ते पेशावरहून २०० किलोमीटर पायी चालून काबूलपर्यंत आले आहेत. आपल्या साथीदाराला बर्लिनमार्गे जर्मनीला पाठवायचे आहे, तेथे तो भारताला इंग्रजांपासून स्वतंत्र करण्याचे काम करणार आहे. शेवटी नेताजी काबूलहून निसटले. नेताजींना बाहेर काढणारा हा रहमत खान दुसरा कुणी नाही,तर नाव बदलून राहणारा भगवान राम तलवार होता.
काबुलमध्ये आता त्यांची ओळख रहमत खान अशीच होती. भगवान राम खऱ्या अर्थाने भारतीय होते, पण त्याचवेळी त्यांना दुसऱ्या महायुद्धाचा फायदा घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या सुभाष बाबूंच्या योजनेसाठीदेखील काम करायचे होते. या कामी अर्थातच युद्धात गुंतलेल्या सर्व देशांशी जवळीक वाढवून आतल्या गोटातल्या बातम्या मिळवणे गरजेचे होते. म्हणूनच नाझींना त्यांनी विश्वास दिला की ते नाझींसोबत आहेत. जपानला सांगितले की आपण त्यांच्यासोबत आहोत. रशियाला पण भासवले की आपण तुमचेच आहोत. इटलीसोबत देखील भगवान तलवारांनी मैत्री केली. यानंतर रहमत खान इटली आणि जर्मनी या दोघांसोबत काम करू लागले. सोबतच इंग्रजांसाठी गुप्तहेर म्हणून काम सुरू केले. यावरून भगवान राम किती "पोहोचलेले" होते हे तुमच्या लक्षात येईल. इंग्रज गुप्तहेर म्हणून काम करताना त्यांना नविन नाव मिळाले- सिल्व्हर!!! विशेष म्हणजे हे नाव त्यांना जेम्स बॉण्डचे जनक इयान फ्लेमिंगचे भाऊ पीटर फ्लेमिंग यांनी दिले होते.
जर्मनीनेही त्यांचा सर्वात मोठा सैन्य सन्मान आयर्न क्रॉसने सन्मानित केले. भगवान राम इटली, जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन या देशांसोबत गुप्तहेर म्हणून काम करत होते, पण त्यांचे लक्ष निश्चित होते- भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे!! या सर्व देशांचा उपयोग ते याच ध्येयासाठी करत होते. एकाच वेळी इतक्या देशांसोबत गुप्तहेर म्हणून काम करणारे भगवान राम हे जगाच्या इतिहासात पहिले असे गुप्तहेर असू शकतील.
१९०८साली एका श्रीमंत पंजाबी परिवारात भगत राम तलवारांचा जन्म झाला होता. सध्या पाकिस्तानात असलेल्या उत्तर-पश्चिम सीमेवरच्या भागात त्यांचा जन्म झाला होता. जन्माने पंजाबी असले तरी ते स्वत:ला अभिमानाने "हिंदू पठाण" म्हणवत असत. सुरुवातीला त्यांच्या वडिलांचे इंग्रजांबद्दल चांगले मत होते, पण जालियनवाला बाग येथील नृशंस हत्याकांडानंतर ते इंग्रजांच्या विरोधात गेले. त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजांविरुद्ध तयार केले. त्याचाच परिणाम म्हणजे भगवान राम आणि त्यांचे भाऊ इंग्रज सरकार घालविण्यासाठी मेहनत घ्यायला लागले. भगवान राम यांच्या भावालाही एका गव्हर्नरच्या खुनाच्या आरोपाखाली १९३१ साली फाशी देण्यात आली होती.
(मधोमध - भगत राम तलवार)
धड इंग्लिश न येणाऱ्या आणि फक्त १० वी पास असलेल्या या माणसाने जगातल्या सर्वात शक्तिशाली देशांना एकाच वेळी मूर्ख बनविले. पुढे नेताजींचा अपघाती मृत्यू झाल्यावर ते गायब झाले आणि स्वातंत्र्यानंतर देशात परतले. भगवान राम तलवारांसारख्या हजारो धाडसी आणि पराक्रमी लोकांची भिस्त नेताजींवर होती. पण त्यांच्या अपघाती मृत्यूने या सर्वांना पोरके केले. १९८३ साली उत्तर प्रदेशातल्या पिलीभीती येथे त्यांचे निधन झाले. एवढा पराक्रमी गुप्तहेर आज खूप कमी लोकांना माहीत आहे दुर्दैवाची गोष्ट आहे.