परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ७: देशासाठी मृत्यूच्या दारातून परतलेले मेजर धनसिंग थापा!!
भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली असा प्रसंग म्हणजे १९६२ साली चीनविरुद्ध झालेले युद्ध!! अनेक वर्ष कुरबुर केल्यावर शेवटी चीनने भारतावर हल्ला केला होता. त्या युद्धात जरी देशाला पराभव बघावा लागला तरी त्याआधी आणि त्यानंतर अनेक वेळा भारताने चीनला पाणी पाजले आहे. चीनी ड्रॅगनला जागा दाखवणाऱ्या अशाच एका शूर सैनिकाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत.
२० ऑक्टोबर १९६२. चीनी सैनिकांनी चुशूल एयरफील्डवर कब्जा मिळवण्यासाठी लडाखच्या एका पोस्टवर तोफेच्या माध्यमातून बॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. चीनच्या या घुसखोरीचा सामना करण्यासाठी पॅगोंग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर गोरखा रायफल्सचे काही जवान तैनात करण्यात आले होते. या सैनिकांनी आपल्या शौर्याने चीन्यांना एकदा नाहीतर तीन वेळा माघार घ्यायला लावली.
दुर्दैवाने ते सैनिक ही पोस्ट वाचवू शकले नाहीत. या पोस्टवरील सर्व सैनिक शहीद झाले असे भारताने मानले होते. पोस्टचे नेतृत्व करणारे मेजर धनसिंग थापा हे देखील शहीद झाले असे समजून त्यांचा अंत्यविधी देखील करण्यात आला होता. पण मेजर धनसिंग थापा चीनला आणि मृत्यूला मात देत देशात परतले.
यावेळी मेजर थापा आपल्या सैनिकांना सोबतीला घेऊन चीनी सैन्याविरुद्ध जोरदारपणे लढले. कित्येक सैनिकांना मारत चीन्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. शत्रू मेजर थापांचे शौर्य बघून प्रचंड चिडले, त्यांनी पूर्ण पोस्ट पेटवून दिली.
पण मेजर थापा काय रसायन आहे हे त्यांना माहीत नव्हते. मेजर थापा यांनी आपल्या तुकडीसमवेत हॅन्ड ग्रेनेड्सचा मोठा मारा सुरू केला. चीनला शेवटी माघार घ्यावी लागली. एकाच पोस्टवर चीनला दोनदा माघार घ्यावी लागली होती.
सोबतीला फक्त तीन सैनिक घेऊन मेजर थापा यांनी चिन्यांना रोखून धरले होते. तेवढ्यात चीन्यांनी एक बॉम्ब थापांच्या दिशेने फेकला, त्यांचा निशाणा चुकवत थापांनी दुसऱ्या बाजूला उडी घेतली. पण शेवटी लढता लढता ते शत्रूंच्या हाती सापडले.
देशात सगळ्यांना वाटले थापा शहीद झाले. तशी बातमी त्यांच्या कुटुंबाला देण्यात आली. त्यांचा अंत्यविधी पार पडला. देशात त्यांना परमवीर चक्र पदक घोषित करण्यात आले. पण मेजर थापा यांची गोष्ट इथे संपली नाही. 'पिच्चर अभी बाकी थी'.
जेव्हा युद्ध संपले तेव्हा चीनी सैनिकांनी युद्धबंदी असलेल्या सैनिकांची यादी भारताला दिली. त्या यादीत मेजर थापा यांचे नाव बघून सर्वाना सुखद धक्का बसला. मेजर थापा भारतात परतले. त्यांना या काळात प्रचंड हालअपेष्टांचा सामना करावा लागला. पण त्यांनी देशाबद्दल कुठलीही माहिती दिली नाही.
भारतात परत आल्यावर त्यांनी देशाच्या सैन्यात अनेक वर्ष कर्तृत्व गाजवले. पुढे ते सन्मानाने निवृत्त झाले. शेवटी ५ सप्टेंबर २००५ रोजी भारत मातेच्या या वीर सुपुत्राने शेवटचा श्वास घेतला.
उदय पाटील