व्हॅक्सिन्सचा इतिहास : ४० व्हॅक्सिन्स शोधणारा मॉरिस हिलमन!!
खऱ्या अर्थाने जग बदलणाऱ्या संशोधकांची यादी केली तर त्यात मॉरिस हिलमनचं नाव अग्रस्थानी असेल. या संशोधकाचे जगावर फार फार उपकार आहेत. याने एक-दोन नाही, तर तब्बल ४० प्रकारच्या लसींची निर्मिती केली आहे. ज्या रोगांच्या साथी पूर्वी जगभर धुमाकूळ घालायच्या ते रोग आता प्रादुर्भाव होण्याआधीच दूर ठेवता येतात, हे आपल्यासाठी केवढं मोठं वरदान आहे! त्यासाठी मॉरिससारख्या शास्त्रज्ञांचं ऋण मान्य करायलाच हवं.
मॉरिस हा जगातल्या सर्वात महान सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांपैकी( मायक्रोबायॉलॉजिस्ट) एक समजला जातो. त्याने या क्षेत्रात जवळपास सहा दशकं काम केलं आणि यातला बराच काळ तो एकाच कंपनीत होता. ती म्हणजे मर्क अँड कंपनी. त्याने आशियाई फ्लू, गोवर, गालगुंड, हिपॅटायटीस ए व बी, कांजिण्या, मेनिंजायटिस, न्यूमोनिया या रोगांवरच्या लसींवर संशोधन केलं आहे. त्यातल्या अनेक लस आजही वापरात आहेत आणि अनेक जीव वाचवत आहेत.
या लेखात या महान संशोधकांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ -
गालगुंड या आजारावरचं व्हॅक्सिन मॉरिसने विकसित केलं. त्यात जिवंत पण कमी ताकदीचा विषाणू वापरला जातो. आपल्या संशोधनासाठी मॉरिसने आपल्या स्वतःच्याच गालगुंड झालेल्या मुलीपासून हा विषाणू वेगळा केला. या व्हायरस स्ट्रेनलाही त्याच्या मुलीचंच नाव आहे. त्याला म्हणतात जेरील लिन स्ट्रेन. आज वापरल्या जाणाऱ्या एम. एम. आर. म्हणजेच मीझल्स (गोवर) - मम्प्स(गालगुंड)- रुबेला व्हॅक्सिनचा हे व्हॅक्सिन एक भाग आहे.
त्याचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं. सुरुवातीला त्याने घरच्यांना मदत करण्यासाठी गावातल्या दुकानांमध्ये काम केलं. पुढे आपल्याच थोरल्या भावाचा त्याच्यावर प्रभाव पडला आणि शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवलं. मोन्टाना स्टेट युनिव्हर्सिटीची त्याला स्कॉलरशिप मिळाली. ग्रॅज्युएशनला पहिला आल्यावर त्याला दहा विद्यापीठांनी स्कॉलरशिप देऊ केली होती.
शिक्षण पूर्ण होताच त्याने नोकरी धरली आणि ताबडतोब लसींवरच्या संशोधनाला सुरुवातही केली. त्याने विकसित केलेलं जॅपनीज बी एनसिफॅलायटीसवरची लस दुसऱ्या महायुद्धात जपानशी लढणाऱ्या सैनिकांसाठी वापरली गेली
इन्फ्लुएंझा ए व्हायरस किंवा त्या विषाणूचा अ प्रकार यांत हळूहळू घडत जाणाऱ्या जनुकिय बदलांविषयी त्याने महत्त्वाचं संशोधन केलं. या प्रकाराला 'ड्रिफ्ट अँड शिफ्ट' म्हणतात आणि ही घटना आधुनिक इन्फ्लुएंझा लसीच्या विकासाचा पाया मानली जाते.
लहानपणी आपल्या काकांच्या शेतात काम करत असताना, परिपक्व झालेली अंडी लस बनवण्यासाठीचा विषाणू वाढवायला वापरली जातात हे त्याला माहिती झालं. त्या अर्थाने शेत ही त्याची पहिली प्रयोगशाळा होती. पुढे यशस्वी झाल्यावरही त्याने या यशाचं श्रेय त्याने लहानपणी कोंबडीच्या पिल्लांवर केलेल्या कामाला दिलं आहे.
एवढं मोठ्या प्रमाणावरचं संशोधन करूनदेखील अगदी शेवटपर्यंत तो संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर बारीक लक्ष ठेवत असे. असं म्हणतात की त्याची प्रयोगशाळा म्हणजे जणू एखादं मिलिटरी युनिट होतं. तिथे मॉरीसची सत्ता चालत असे.
हा महान संशोधक २००५ मध्ये ख्रिस्ताघरी गेला. गंमत म्हणजे त्याने संशोधन केलेल्या कुठल्याही व्हॅक्सिनला त्याचं नाव नाही. पण असं असूनही त्याच्या कामाची दखल घेतली गेली आहे.
लेखिका: स्मिता जोगळेकर