computer

व्हॅक्सिन्सचा इतिहास : फ्ल्यू विषाणू, त्याचे प्रकार आणि ते शोधणारे संशोधक थॉमस फ्रान्सिस ज्यूनिअर यांच्या संशोधनाची गोष्ट!!

इन्फ्लुएंझा किंवा सोप्या भाषेत फ्ल्यू हा विषाणूंमुळे (व्हायरसमुळे) होणारा श्वसनसंस्थेचा संसर्गजन्य आजार आहे. वर्षभरात कधीही फ्ल्यू होऊ शकतो, पण हिवाळ्यात तो जास्त प्रमाणात होतो. म्हणूनच त्याला सीझनल फ्ल्यू असंही म्हटलं जातं. या रोगाची लागण प्राण्यांना, पक्ष्यांना आणि माणसांना होते. फ्ल्यूच्या विषाणूचे अ, ब, क, आणि ड असे चार प्रकार (स्ट्रेन्स) आहेत. हे प्रकार उतरत्या क्रमाने हानीकारक आहेत. म्हणजे इन्फ्ल्यूएंझा ‘अ’ विषाणू सगळ्यात जास्त धोकादायक आहे. फ्लूची जागतिक साथ ही या 'अ' प्रकारच्या विषाणूमुळे आली होती. तुलनेने ‘ब’ व ‘क’ प्रकारचे विषाणू सौम्य असतात. 'ब' गटातल्या विषाणूंमुळे विशिष्ट प्रदेशात स्थानिक पातळीवर फ्ल्यूच्या साथी येतात. 'क' प्रकारच्या विषाणूमुळे माणसाला सौम्य स्वरूपाचं इन्फेक्शन होतं. विषाणूचा 'ड' प्रकार माणसांत रोग निर्माण करत नाही. तो मुख्यतः डुकरं आणि गुरं यांच्यामध्ये आढळून येतो.
 

तर फ्ल्यू विषाणूचे 'अ' आणि 'ब' हे प्रकार शोधण्याचं आणि इन्फ्ल्यूएंझा व्हॅक्सिनचा शोध लावण्याचं श्रेय जातं थॉमस फ्रान्सिस ज्यूनियर या शास्त्रज्ञाला. हा अमेरिकन फिजिशियन, विषाणूशास्त्रज्ञ आणि साथीच्या रोगांचा तज्ञ होता. इन्फ्ल्यूएंझाचा विषाणू वेगळा करण्यात यश मिळवणारा अमेरिकेमधला पहिला मनुष्य म्हणून फ्रान्सिसची गणना होते.

थॉमस फ्रान्सिस ज्यूनियर तसा शिस्तीच्या वातावरणात वाढला. पण शिस्तप्रिय असलं तरी त्याचं कुटुंब आनंदी होतं. आईवडिलांविषयी आदरयुक्त धाक होता, पण तरी त्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्याची मुभा होती. यातूनच तो लहानपणी मासेमारी, बेसबॉल यांत रस घेऊ लागला. हायस्कूलमध्ये त्याला नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली. मात्र भविष्य काही वेगळंच होतं. असं म्हणतात, की त्याच्या डॉक्टर मेहुण्याचा त्याच्यावर प्रभाव पडला. त्यातून त्याने १९२५ मध्ये येल युनिव्हर्सिटीतून वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर त्याने रॉकफेलर इन्स्टिट्यूट येथील रिसर्च टीमसोबत संशोधन करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचं संशोधन मुख्यतः बॅक्टेरियल न्युमोनियावर व्हॅक्सिन निर्माण करण्यासाठी होतं. त्यानंतर त्याने इन्फ्ल्यूएंझा विषयीच्या संशोधनात रस घेतला.

जुलै १९३४ मध्ये प्युर्टो रिको बेटावर फ्लूची साथ आली होती. फ्रान्सिसने हा विषाणू वेगळा करण्यासाठी या बेटाला भेट द्यायचं ठरवलं. बोटीने तिथे जायचं आणि वेगळा केलेला विषाणू घेऊन परत यायचं असा त्याचा प्लॅन होता. पण यात एक धोका होता. या प्रवासाला लागणारा वेळ लक्षात घेता तो परत येईपर्यंत तो विषाणू जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी होती. मग त्याने एक युक्ती केली. सलाईन सोल्युशन आणि ग्लिसरीन असलेल्या काही बाटल्या त्याने प्युर्टो रिको बेटावर पाठवल्या आणि त्यात रुग्णांच्या थुंकीचे नमुने गोळा करून त्या बाटल्या परत न्यूयॉर्कला मागवल्या. ग्लिसरीनने व्हायरस 'प्रीझर्व्ह' करण्याची आयडिया काही आठवड्यांपूर्वीच शोधली गेली होती आणि पोलिओ विषाणूंसाठी वापरली गेली होती. तिचा आता फ्रान्सिसने असा वापर केला.
 

त्याचं प्रयोग करणं आणि फ्लू वरचं संशोधन सुरूच राहिलं. फेरट(Ferret) नावाच्या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केले. पुढे त्याने मिशिगन युनिव्हर्सिटी मध्ये व्हायरस लॅबोरेटरी स्थापन केली आणि एपिडेमिओलॉजी डिपार्टमेंट उघडलं. हा विभाग मुख्यतः जंतूसंसर्गामुळे होणाऱ्या विविध आजारांवर अभ्यास व संशोधन करत असे. पोलिओ व्हॅक्सिनची निर्मिती करणाऱ्या जोनास साल्क याचाही तो मार्गदर्शक होता. मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये फ्रान्सिस आणि साल्क यांनी इतर संशोधकांच्या मदतीने इन्फ्ल्यूएंझा व्हायरसने अनेक रुग्णांना संक्रमित केलं. यावेळी ते सरळसरळ पेशंटच्या नाकाच्या पोकळीत स्प्रेच्या साह्याने व्हायरस सोडत असत.

फ्रान्सिसने आणि त्याच्या टीमने विकसित केलेलं व्हॅक्सिन इन्फ्ल्यूएंझाच्या 'अ' आणि 'ब' या दोन्ही विषाणूंवर प्रभावी ठरलं. पुढे ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशस्वीपणे वापरण्यात आलं.
आजचं आपलं आरोग्यदायी जगणं हे आजवरच्या अशा अनेक संशोधनांचं आणि त्या संशोधकांचं कायमचं ऋणी आहे!!

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required