नोबेल पुरस्कारांसंबंधी महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !!
नोबेल पुरस्कार जगातला सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो. यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरु झालेली आहे. त्यानिमित्ताने आजच्या लेखातून काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
नोबेल पुरस्कारासाठी योग्य मानकरी कसा निवडला जातो.
तुम्हाला तर माहित असेलच की आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या संपत्तीतून नोबेल पुरस्कारांची सुरुवात केली. त्यांच्या मृत्युनंतर हे पुरस्कार देण्यात येऊ लागले. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात पुरस्कारासाठी संस्था उभारल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्ती केली होती. त्याप्रमाणे प्रत्येक पुरस्कारासाठी एक वेगळी संस्था काम करते.
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार : रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस
शरीरविज्ञान किंवा औषध औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार : कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट
साहित्यतील नोबेल पुरस्कार : स्वीडिश अकॅडमी
शांततेचा नोबेल पुरस्कार : नॉर्वेच्या संसदेने निवडून दिलेल्या ५ जणांच्या समितीकडून.
वरती नमूद केलेल्या संस्था त्या त्या क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तींना आणि जाणकारांना पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीचं नाव सुचवण्यास सांगते. त्यासाठी फॉर्म्स पाठवले जातात. हे काम दरवर्षी सप्टेंबरमध्ये केलं जातं. फेब्रुवारीपर्यंत फॉर्म्स परत करण्याची सूचना दिलेली असते. एकदा का फॉर्म्स परत आले की संस्थांकडून नावं चाळली जातात. त्यानंतर सर्वसहमतीने एक नाव निवडलं जातं.
नोबेल पुरस्कारासाठी जी नामांकनं असतात त्याची माहिती लोकांना दिली जात नाही. ती अत्यंत गुप्त ठेवली जातात. याशिवाय नामांकनासाठी पाठवण्यात येणारे फॉर्म्स पण अत्यंत गुप्त ठेवले जातात. सामान्य माणूस किंवा कोणतीही संस्था पुरस्कारासाठी स्वतःचं आणि इतरांचं नाव सुचवू शकत नाही.
गणितासाठी नोबेल पुरस्कार का देण्यात येत नाही?
हा प्रश्न सर्वाधिक विचारला जातो. भौतिकशास्त्र, शरीरविज्ञान, साहित्य, शांतता या क्षेत्रात पुरस्कार आहेत पण गणितात नोबेल पुरस्कार नाही. या प्रश्नाला एक फारच गाजलेलं उत्तर आहे. असं म्हणतात की आल्फ्रेड नोबेल यांनी ज्या मुलीला मागणी घातली होती तिने एका गणितज्ञासाठी त्यांना नाही म्हटलं होतं. काही वेळा असाही दावा केला जातो की ती मुलगी आल्फ्रेड नोबेल यांना सोडून एका गणितज्ञासोबत गेली होती.
मंडळी, या फक्त दंतकथाच आहेत, यांना कोणताही आधार नाही. एक तथ्य इथे सगळे विसरतात. फक्त गणित नाही तर अभियांत्रिकी, जीवशास्त्र, पर्यावरण विज्ञान अशा महत्वाच्या क्षेत्राला देखील नोबेल पुरस्कार दिला जात नाही. त्याचं कारण असं, की आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या मृत्युपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील दिग्गाजांनाच नोबेल पुरस्कार देण्यात येतो.
(अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार)
आता कोणी म्हणेल की अर्थशास्त्रात पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तर अनेक वर्षांनी नव्याने सामील करण्यात आला. त्याचं असं आहे की अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार तसा खऱ्या अर्थाने नोबेल पुरस्कार नाही. स्वीडनच्या स्हेरिगेस रिक्सबँक या सेन्ट्रल बँकेने आल्फ्रेड नोबेल यांच्या आठवणीत अर्थशास्त्रासाठी ‘स्हेरिगेस रिक्सबँक पुरस्कार’ सुरु केला होता. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यातर्फे दिला जातो. हा पुरस्कार कोणाला द्यायचा याचे नियम देखील नोबेल पुरस्कारांसारखेच आहेत. तरीही त्याला पूर्णपणे नोबेल पुरस्कार म्हणता येत नाही. ही माहिती तुम्हाला नोबेल पुरस्काराच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
नोबेल पुरस्कार रद्द करता येतो का ?
नोबेल पुरस्कार रद्द करता येत नाही. जरी नोबेल पुरस्कार विजेत्याचं संशोधन किंवा काम काही काळाने अपयशी ठरलं तरी नोबेल पुरस्कार काढून घेता येत नाही.
सामान्य माणसाला नोबेल पुरस्कार सोहळ्यात सामील होता येतं का ?
मंडळी, नोबेल पुरस्काराने अनेक वर्षांपासून आपली अदब राखली आहे. नोबेल फाउंडेशनतर्फे निमंत्रित केलेल्या लोकांनाच पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहता येतं. इतर पुरस्कारांप्रमाणे नोबेल पुरस्काराची तिकीट विक्री केली जात नाही.
मंडळी, नोबेल पुरस्काराची सुरुवात करणारे आल्फ्रेड नोबेल यांच्याबद्दल माहिती वाचण्यासाठी आमचा खालील लेख वाचायला विसरू नका.