computer

ठंडा ठंडा कूल कूल वाळा म्हणजे नक्की काय असतो, त्याचे इतर फायदे काय? जाणून घ्या कृषितज्ज्ञ काय म्हणतात!!

विदर्भात तापमान वाढायला लागले की सगळ्यांना आठवण होते वाळ्याच्या तट्ट्यांची! तो वाळ्याचा सुखद गारवा 'तारणहार' म्हणावा असाच असतो. एरव्ही वर्षभर दुर्लक्षित असणाऱ्या वाळ्याची उन्हाळ्यात आठवण आल्याशिवाय राहतच नाही.  चला तर आज वाचा बोभाटावर वाळ्यावरचा गारगार लेख!

गवताच्या प्रजातीत मोडणार्‍या वाळ्याचं शास्त्रीय नाव Vetiveria Zizanioides असं आहे. १००% भारतीय असलेला वाळा प्रथमदर्शनी दिसायला गवती चहासारखा दिसतो. वाळ्याची पाने बुडापासून वरपर्यंत अगदी समांतर असतात. चकचकीत हिरवीगार अशी ही पाने भरपूर लांब, रुंदीला कमी  आणि टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. तसेच काहीशी खरखरीतही असतात. झाडाची ऊंची जास्तीत जास्त दीड मीटर असते. हे गवत सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी भरपूर प्रमाणात वाढते. पोषक हवामान, उत्तम हवा आणि पाणी मिळाल्यास वाळ्याची मुळे साधारणपणे ३०/३५ सेंमी पर्यंत वाढतात. वाळ्याचं गवत रूजून ते मोठं होऊन काढणीसाठी तयार व्हायला जवळपास दोन वर्षे लागतात. 

पण आपण ज्याला वाळा असं संबोधतो, तो वाळा म्हणजे या वनस्पतीची मुळं! या गवताचे मूळ हाच याचा सर्वात महत्त्वाचा भाग समजला जातो. ही मुळं अतिशय बहुगुणी असतात. मुख्यत्वे करुन उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी याचा उपयोग करतात. ही मुळं एप्रिल महिन्यात काढली जातात. झाडाची माती सावकाश बाजूला करून, शक्यतो तुटू न देता जितकी लांब निघतील तितकी लांब हे मुळं काढली जातात. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन जाड मुळं कापून ती वापरतात किंवा साठवून ठेवतात. 

उन्हाळ्यात दाह कमी होण्यासाठी माठातल्य पाण्यात एक वाळ्याची जुडी टाका आणि अनुभवा मंदमधुर मृदगंधासारखा सुगंध! हा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाही. वाळा पाण्यात टाकल्यावरच हा आनंद घेता येतो. 'मेलडी खाओ, खुद जान जाओ' असंच काहीसं हे प्रकरण आहे. वाळ्यामुळे पाण्यातले दोष कमी होतात हा अतिरिक्त फायदा सोबत आहेच. 

वाळ्याचे आणखी काही उपयोग:

* विदर्भात अक्षय तृतीयेला वाळ्याच्या मुळांपासून " चिंचवणी" हा आंबटगोड पदार्थ करतात.
* वाळ्याचा उपयोग फेसपॅक, शिकेकाई, आयुर्वेदिक औषधे, साबण, अगरबत्ती, अत्तर इ .साठी, तसेच तेल बनवण्यासाठीही होतो.
* ऊन्हामुळे अंगाचा दाह होत असेल तर वाळ्याची मुळं पाण्यात टाकून प्यायल्यास उष्णतेचा त्रास होत नाही. अंगात गारवा राहतो.
* मुळांची टोपी आणि गोल रिंग करून बोटात घातल्यास ऊन बाधत नाही.
* विदर्भात या मुळांपासून कूलरची ताटी अथवा उन्हाळ्यात दारे-खिडक्यांना पडदे बनवतात.

* पाने बारीक व सरळ असल्यामुळे दोर बनवता येतात.
* डोंगर उतारावरील माती नदी नाल्यात वाहून जाऊ नये म्हणून बांधावर, तसेच उताराच्या शेतजमिनीवर जवळजवळ लागवड करुन माती अडवण्यासाठी वाळा लावतात.
* गुरांना हिरवा चारा म्हणून पानांचा उपयोग होतो.
* पानांपासून छोट्या टोपल्या , चटई व इतर अनेक शो पिसेस बनवता येतात.
* वाळा मुळातच गुणाने शीतल असल्याने तीव्र उन्हामुळे होणाऱ्या अनेक रोगात उपयोगी पडतो.

पूर्वी भंडारा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात वाळ्याची लागवड होत असे. हल्ली हे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पण दुर्मिळ होत चाललेल्या वाळ्याची मागणी मात्र वाढली आहे. वाळ्याच्या पांढऱ्या जाड मुळांचा वास खूप दिवस टिकतो. काही ठिकाणी मात्र दुकानदार कमी वासाच्या फिक्या खाकी रंगाची मुळं देऊन ग्राहकांची फसवणूक करतात.  
 
वाळ्याची लागवड आपल्या घरच्या बागेत करणं सहज शक्य आहे.  मुळं कापल्यानंतर उरणाऱ्या वरच्या गवती भागाला 'थोंब' असे म्हणतात. अगदी किरकोळ दरात गावरान रोपे/थोंब मिळतात. हे थोंब मातीमध्ये रुजवून पुढील वर्षी आपल्याला घरचा बहूमूल्य वाळा मिळू शकतो.

तर वाचकहो, वाळ्याच्या दोन जुड्या घेऊन आलटून पालटून माठात आणि उन्हात ठेवा आणि वाळ्याच्या पाण्याचा घोट घोट आस्वाद घेत म्हणा..

गारवा….. गारवा.. वाऱ्यावर भिरभिर पारवा…. प्रियेssssss नभाsssतही …

गारवा….. गारवा.. वाऱ्यावर भिरभिर पारवा…. नवा नवा …

प्रियेssssss नभाsssतही… चांदवा, नवा नवा.. गारवा…

 

लेखक-  मिलिंद काळे 
M.Sc.(Agri)
कृषितज्ञ 
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required