computer

आपल्या आसपास आढळणाऱ्या अमृतवल्ली गुळवेलीचे आयुर्वेदप्रमाणित ७ अत्यंत महत्त्वाचे औषधी उपयोग!!

गुडूची किंवा Tinospora cordifolia या लॅटीन नावाने ओळखली जाणारी वनस्पती आयुर्वेदात औषधी गुणांनी युक्त म्हणून हजारो वर्षांपासून ओळखली जाते. या वनस्पतीच्या नेहमी हिरव्यागार दिसणा-या, बदामासारख्या सुंदर पानांमुळेच नाही तर तिच्या सहज करता येण्याजोग्या औषधी वापरामुळेही ही गुडूचीची वेल आपल्याकडे परसबागेमध्ये लावण्याची परंपरा आहे. आपल्याला ती गुळवेल म्हणून माहित असते आणि अनेकदा आपण उन्हाळ्यामध्ये गुळवेल-सत्त्व उष्णतेच्या विकारांमध्ये वापरलेलेही असते. पण आपल्याला गुळवेल आणि गुडूची एकच हे ठाऊक नसते म्हणून वाचकांसाठी हा लेखन-प्रपंच!

आयुर्वेदाने गुडूचीला तिच्या गुणकारीपणामुळे प्रत्येक गुणासाठी तिला एक नाव दिलं आहे. ती करू शकत असणाऱ्या कामांनुसार ही वेल गुडूची (देहाचं रक्षण करणारी), अमृता (अमृताप्रमाणे गुणकारी), रसायनी (शरीराचं योग्य पोषण करणारी), वयस्था (वाढत्या वयाचे परिणाम आटोक्यात ठेवणारी) इ. अशा अनेक  नावांनी ओळखली जाते. गुडूचीला हिंदीमध्ये गिलोय किंवा गुरच, बंगालीमध्ये गुलञ्च, गुजरातीमध्ये गुलो, तामिळमध्ये शिण्डिलकोडी, तेलुगूमध्ये टिप्पाटिगो आणि कानडीमध्ये अमृतवल्ली म्हणतात.

गुडूची ही सदाहरित वेल आहे. ती आंबा, कडुनिम्ब इ. झाडांवर किंवा अगदी आपल्या घरच्या खिडकीतल्या ग्रिलवरही सहज वाटोळी चढते. तिची पाने बदामाच्या आकाराची आणि टोकदार असतात. हिला पिवळसर रंगांची छोटी-छोटी गुच्छांमध्ये फुलं येतात. या वेलीला मटारासारखी दिसणारी फळे येतात आणि ती पिकल्यावर लालचुटूक होतात. गुडूचीची पानं, वेल, मुळं हे सगळंच औषध म्हणून वापरता येतात. गुडूची चवीला कडू असली तरी तिचे औषधी उपयोग आता समजून घेऊ – 

१. भूक वाढणे 

गुडूची आपल्या अंगच्या गुणधर्मांमुळे पाचकाग्नीची शक्ती वाढवते. अन्नाच्या पचनामध्ये साहाय्यक होते. अन्नपचन व्यवस्थित झाल्यामुळे माणसाला कडकडून भूक लागते. यामुळे अग्निमान्द्य, अपचन, उलटी होणे, पोटाचे विकार आणि जंत यामध्ये गुडूचीचा चांगला उपयोग होतो.

२. आम्लपित्त दूर करणे 

गुडूची चूर्ण + तूप हा योग सर्वप्रकारच्या आम्लपित्ताच्या तक्रारींवर गुणकारी होतो. घशात जळजळ, पोटात आग, तोंड आंबणे, घशाशी आंबट पाणी येणे अशा लक्षणांमध्येही याचा चांगला परिणाम दिसतो.

३. श्वसन-विकारांवर परिणाम करणे 

गुडूची श्वसन-मार्गात वाढलेल्या कफावर फार चांगला परिणाम करते. गुडूची + मध हा योग सर्दी-पडसे, खोकला, दम लागणे अशा त्रासांमध्ये फार गुणकारी होतो.

४. रक्त-विकारांमध्ये गुणकारी होणे 

गुडूची रसायन असल्यामुळे योग्यप्रकारे सेवन केल्यावर रक्तामध्ये फार लवकर पोहोचते. त्यामुळे यकृताचे विकार, हृदय-दौर्बल्य, कामला (काविळ), अंगाची आग-आग होणे, अशा रोगांमध्ये फार चांगल्याप्रकारे काम करते आणि यांची तीव्रता कमी करते, हे विकार बरे होण्यास हातभार लावते. प्लीहेसंबंधीच्या रोगांमध्ये वर सांगितलेले गुळवेल सत्त्व फारच गुणकारी होते.

५. मधुमेहामध्ये उपयुक्त होणे 

गुडूची मूत्रवह संस्थान आणि मेद धातूवर कार्यकारी होणारी औषधी आहे. हे दोन्ही घटक मधुमेहामध्ये बिघडलेले असतात. मधुमेहावस्थेमध्ये गुडूची, आवळा आणि हळद यांच्याबरोबर मधातून घेतल्यास उपयुक्त होऊ शकते. 

६. तापामध्ये गुणकारी होणे 

गुडूची सामान्य तापामध्ये खूपच चांगले काम करते. मुदतीच्या तापामध्येही गुडूचीचा रस देता येतो. यामुळे ताप, अंग-दाह कमी होतो, भूक वाढते आणि तापामुळे आलेला अशक्तपणाही कमी होतो.

७. सांध्यांच्या दुखण्यांत उपयोग होणे 

गुडूची काही प्रमाणात वेदनाशामक आहे आणि त्याबरोबरच ती रसायन आणि विषघ्नही आहे. इथे विषघ्न म्हणजे सापासारख्या प्राण्याच्या विषाचा तसा संबंध नाही, तर शरीरामध्ये विविध रोगांच्या अनुषंगाने जी विषारी पदार्थांची निर्मिती होते त्याच्याशी आहे. आमवात, संधिगतवात, वातरक्त, या सांध्यांशी संबंधीत रोगांमध्ये शरीरात असे विषार निर्माण होत असतात. गुडूची अशा विषारांचा परिणाम दूर करते आणि सोबतच वेदनाशमनाचेही काम करत असल्यामुळे सांध्यांच्या दुखण्यातही गुडूची चांगले काम करते.

बाजारामध्ये गुडूचीचे अनेक योग उपलब्ध आहेत. गुडूची चूर्ण, गुळवेल सत्त्व, गुडूची घन वटी, अमृतारिष्ट ही त्यांपैकी काही नावं आहेत. आपण यापैकी योग्य त्या योगांचा वापर करून आयुर्वेदाने हजारो वर्षांच्या अभ्यासाने निश्चित केलेल्या ज्ञानाचा लाभ घ्यावा, हे उत्तम!

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर
[email protected]

सबस्क्राईब करा

* indicates required