computer

आपल्या रोजच्या वापरातल्या हळदीचे हे ७ आयुर्वेदिक औषधी गुणधर्म माहित आहेत का?

हळद माहित नाही असा भारतीय सापडणे अशक्यच म्हणावे लागेल. लहानपणापासूनच आपली हळदीशी ओळख होते. हळद घातलेले दूध पीत भारतीय मुलं मोठी होतात. सर्दी झाली, घसा खवखवतोय, भारतीय आई ताबडतोब गरम गरम दुधात हळद टाकून प्यायला देते. मूल धडपडले, पडले आणि त्यास खरचटले की भारतीय आई ताबडतोब त्यावर चिमूटभर हळद दडपते. पडापडीमध्ये मुका मार बसला, सूज आली की भारतीय आई त्यावर हळदीचा लेप घालते. त्याशिवाय आवडत्या भाज्यांमध्ये सोनपिवळ्या रंगासाठीही मूल आईला त्यात हळद टाकताना बघते. शाळेमध्ये ‘पी हळद अन् हो गोरी!’ यासारखे वाक्प्रचारही शिकणार. यातूनच ही ओळख पक्की होत जाते. हळदीचा समावेश मांगलिक द्रव्य म्हणून सौभाग्य द्रव्यांमध्ये केलेला आहे. कुंकूही हळदीपासूनच बनवतात. आज एकूणच हळदीच्या औषधी गुणधर्मांची माहिती करून घेऊ.

हळदीची नावे – 

इंग्लिशमध्ये टर्मरीक आणि लॅटीनमध्ये कुरकुमा लाँगा या नावांनी ओळखल्या जाणा-या हळदीला संस्कृतमध्ये फारच अर्थगर्भ नावे आहेत.
त्यापैकी काही नावांची माहिती करून घेऊ – 

हरिद्रा – (हरिं वर्णं द्राति|) त्वचेचा रंग सुधारते ती हरिद्रा. या त्वचेचा रंग सुधारण्याच्या कार्यामुळे हळदीला याच अर्थाची आणखीही नावे मिळालेली आहेत.

कांचनी – त्वचेला सोन्यासारखा रंग देते ती.

हरिता – हरित म्हणजे पिवळ्या रंगाची.

वर्णदायी – उत्तम असा वर्ण प्रदान करणारी ती.

वरवर्णिनी – जिचा स्वतःचा वर्ण खूप चांगला आहे अशी.

योषितप्रिया – महिलांना प्रिय असणारी ती.

निशा – चांदण्या रात्रीप्रमाणे सुंदर असलेली अशी.

जयन्ति – जिच्या गुणांचा जयघोष होतो अशी.

कृमिघ्ना – त्वचेवरील आणि पोटातील कृमींना नष्ट करणारी ती.

हट्टविलासिनी – हट्ट म्हणजे बाजार. बाजाराला शोभा आणणारी ती किंवा बाजारात जी कुठेही असली तरी लक्ष वेधून घेणारी अशी.


याशिवाय हळदीला हिंदीमध्ये हलदी, बंगालीमध्ये हळुद, पंजाबीमध्ये हरदल, कन्नडमध्ये लेदिर, तमीळमध्ये मज्जल, तेलुगूमध्ये पसुपु, अरबीमध्ये ऊरुकुस्सफर आणि फारसीमध्ये जरद चोब (पिवळी छडी) अशी नावे आहेत.

वनस्पतीचे स्वरुप –

हळदीचा आल्याप्रमाणे किंवा अळूप्रमाणे कंद असतो. कंदाला कोंब फुटून हळदीचे झुडूप वाढते. हळदीची पाने साधारण ३० ते ४० सेंमी लांब आणि ६ ते ८ सेंमी रुंद असतात. त्यांना एक आंब्यासारखा सुवास असतो. पानाचा देठही पानांप्रमाणेच लांब - रुंद असतो. हळदीच्या पानांच्या झुपक्यामधून पावसाळ्याच्या सुमारास फुलाचा दांडा निघतो. हा दांडाही चांगला १२ ते १६ सेंमी लांब असतो. या दांड्याला हळदीच्याच रंगाचे ५ ते ७ सेंमी लांबीचे फूल फुटते. हळदीचे फळ लांबट गोल आणि गाठदार असते. फळाचा आतला भाग गडद पिवळा असतो. हळदीचे रानहळद आणि आंबेहळद असे प्रकार मानतात.

हळद संपूर्ण भारतभरामध्ये होत असली तरीही महाराष्ट्रामधल्या सांगली जिल्ह्यातील हरिपूर इथे हळदीची मोठी बाजारपेठ आहे. परंपरेमध्ये हळदीचा तळघरामध्ये साठा करायची पद्धत आहे. यामुळे हळद खूप काळ टिकून राहते असे म्हणतात.

हळदीचे गुणधर्म –

हळद काहीशी रुक्ष, पचायला हलकी, चवीला तिखटसर कडू आणि उष्ण असते. गुणाने उष्ण असल्यामुळे हळद कफ-वाताच्या विकारांमध्ये उपयोगी होते. कडू चवीमुळे ती पित्तशामकही आहे. म्हणजेच हळद तिन्ही दोषांसंबंधी रोगांमध्ये उपयुक्त आहे.

हळदीचे औषधी उपयोग – 

औषधी प्रयोगांमध्ये सामान्यपणे हळदीचा कंद वापरतात. काही व्यंजने म्हणजेच पदार्थ बनवताना सुवासासाठी हळदीची पाने वापरतात. हळदीचे कंद सावलीत ठेवून वाळवतात आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांचे चूर्ण, भरड चूर्ण, अख्खं अशा रुपांमध्ये वापर होतो. अख्खी हळद उगाळून लेप करताना वापरतात.

हळदीचे बाह्य उपयोग – 

हळद, विशेषतः आंबेहळदीचा किंवा आंबेहळदीसोबत तुरटी घेऊन तयार केलेला लेप सूज कमी करणारा, वेदनाशमन करणारा आहे. केवळ हळदीचा लेप त्वचेच्या रोगांसाठी, जखमा भरण्यासाठी आणि त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

हळदीचे सेवन करून उपयोग – 

नाडीसंस्थान (Nervous System)

उष्ण गुणामुळे वातावर नियंत्रण मिळवून हळद वेदनांचे शमन करते. यासाठीच वर आंबेहळद + तुरटीचा लेप सांगितला आहे. मार लागून होणा-या वेदना कमी करण्यासाठी हळदीचे चूर्ण गुळासोबत खायला देतात. मार लागलेल्या भागातील सूज कमी करण्याच्या परिणामातूनही हिच्याद्वारे वेदनाशमन होते. 

पचनसंस्थान (Digestive System)

हळद रुची वाढवणारी, वायुला गुदमार्गाने बाहेर टाकणारी, पित्ताचे (मलावाटे) विरेचन करवणारी, जंतांना नष्ट करणारी असल्यामुळे ती तोंडाची चव जाणे, पोटाला बांध बसणे, कावीळ, जंत होणे अशा रोगांमध्ये उपचारासाठी उपयोगी पडते. काविळीमध्ये त्वचा, डोळे, नखे यांना पिवळेपणा येतो आणि हळदही पिवळीच असते, यामुळे काविळीमध्ये हळद खाऊ नये, असे म्हणतात पण तो एक गैरसमज आहे.

श्वसनसंस्थान (Pulmanary System)

कडू चवीमुळे आणि उष्ण गुणामुळे हळद कफनाशक आहे. हळदीमुळे कफ निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते. दुधामध्ये हळद टाकून घेण्याने दुधामुळे कफ वाढ होणे कमी होते. दूध पिण्याची सवय असणाऱ्यांमध्ये वाढणारा कफ आणि त्यातून निर्माण होणारे खोकला, दमा, सर्दी यासारखे रोग हळदीच्या योग्य वापराने कमी होतात. यामध्ये हळदीच्या धूमाचे (धुराचे) सेवन केल्यास फार चांगला परिणाम दिसतो. तीव्र खोकल्याच्या विकारामध्येही हळदीची विडी पिण्याने तीव्रता कमी होते. मात्र हळदीचा धूप काही प्रमाणात तीक्ष्ण असतो त्यामुळे वैद्यांच्या देखरेखीखाली त्याचे सेवन करावे.

रक्तवहसंस्थान (Circulating System)

हळद रक्तशुद्धी करते. रक्तामधल्या चांगल्या गुणांची वाढ करते. रक्ताचे प्रमाण आणि त्याची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने हळद फार उपयुक्त आहे. यामुळे निरनिराळे रक्तविकार, त्वचाविकार, खाज, पाण्डुरोग, रक्ताल्पता आणि रक्तस्राव या विकारांमध्ये हळद उपयोगी पडते. हळद पोटात घेता त्वचेचा वर्ण सुधारते. रसरक्तावर कार्यकारी असल्यामुळे आणि आमपाचक गुणामुळे हळद तापामध्येही गुणकारी आहे.

मूत्रवहसंस्थान (Urinary System)

हळदीमध्ये अधिक प्रमाणात होणा-या मूत्रप्रवृत्तीला आळा घालण्याची क्षमता असते. ती आम, कफ आणि मेदाचे पचन करते. यामुळे प्रमेह किंवा मधुमेहामध्ये हळदीचा काढा आणि त्याबरोबर आवळ्याचे चूर्ण किंवा उत्तम गुणवत्तेचे वंग भस्म वापरतात. (कोणत्याही प्रकारच्या भस्मादि रसौषधींचे सेवन वैद्यांच्या देखरेखीखालीच करावे.)

प्रजननसंस्थान (Reproductive System)

गर्भाशय स्वच्छ राखणे, गर्भिणींमध्ये दुधाचा स्राव आणि प्रमाण योग्य राखणे, या हळदीच्या कार्यांमुळे प्रसवानंतर हळदीचा वापर केला जातो. या काळामध्ये हरिद्राखण्डपाक नावाचा औषधी योग वापरतात. प्रमेहाचा, शुक्रमेह या नावाचा एक प्रकार आहे. यामध्येही हळद उपयोगी पडते. धातुशैथिल्य कमी होण्यासाठीही हळदीचा वापर होतो. 

विषघ्न परिणाम (Antivenom Effect)

हळदीचा लेप विषघ्न आहे. विषारी परिणामामध्ये हळदीचा धूपही देतात. विंचवाच्या डंखामध्ये हळदीच्या धूपाने (धूर दिल्याने) दंशाची वेदना कमी होते.

आयुर्वेदातील वनौषधींपैकी, घरोघरी सहजगत्या उपलब्ध असणारी, हळद ही अनेक व्याधींमध्ये निश्चितपणे एखाद्या कल्पवृक्षाप्रमाणे उपयोगी पडते. आरोग्य प्राप्तीसाठी तिचा अधिकाधिक उपयोग घेणे हे आजची परिस्थिती बघता फारच आवश्यक आणि उपयुक्त होईल.

घराघरातल्या मसाल्याच्या डब्यात असणारी ही हळद इतकी गुणकारी असेल असा विचार तरी केला होता का? 

 

लेखक : डॉ. प्रसाद अकोलकर

सबस्क्राईब करा

* indicates required